राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाट्यपरिषद मालवण शाखेचं पाहण्याचा योग आला. दिग्दर्शक हेमंत कदम आणि मित्र अभिनेता सुशांत पवार यांच्या ताकदीने साकार झालेली ही गोष्ट पडदा उघडता क्षणी कोणी कितीही सांगूनही काल्पनिक वाटतच नाही हेच या नाटकाचे यश आहे. साधारण पहिल्या पाच मिनिटात नाटकाची कथा समजत जाणाऱ्या लेखकीय मानसिकतेत प्रेक्षक म्हणून या नाटकात बॅकड्रॉपला असलेले जाळे रंगमंचावरुन निसटून तुमच्या खुर्चीभोवती आवळलं जाते आणि मग ओएसिस तुम्हाला वाहवत नेत.. इरफान मुजावरच्या या गोष्टीला श्रीराज बादेकर आणि पार्थ मेस्त्रीचे नेपथ्य गहिरं बनवतं. आणि मग पडदा उघडल्यापासून एक ठसठशीत आरसा उभा राहतो.
सुंदर दिग्दर्शनातील सुंदर संहितेचं सुंदर सादरीकरण अशा एका शब्दात या प्रयोगाचा मी उल्लेख करेन. मुळात पोलीस खात्यातला सुशांत पवार हा मित्र आणि मित्राचे नाटक बघताना कथानकात नायक मोठा झाला आणि सुशांत वेगळा राहिला हे विशेष.. नाटकातला सांडलेला बिर्याणीच्या डब्यातला भात कोणीतरी तिसराच खाताना त्या डब्याचा तेलाचा तवंग मध्यमवर्गीय मानसिकतेला धुता धुवून जात नाही.. मुळात हे नाटक चारचौघं काय म्हणतील आणि आपण त्या चारचौघांसाठी का जगतोय का धावतोय या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाला खुटी मारुन बळकट करते.. मी माझ्या अनेक मित्रांची पाहिलेली त्यांच्या संसारातील गोष्ट मित्र म्हणून सुशांत सादर करतो तेव्हा या दोन मित्रांपासून आपल्याला लांब पळून एकटे राहायला भाग पाडते.
सुखाची गोष्ट ही तुम्हाला हवी आहे तशी मिळावी की तुमच्याकडे आहे तीच सुखाची गोष्ट आहे या आदिम प्रश्नाची आहे. बाकी गरजा प्रत्येकाला असल्याच पाहिजे. पैसे प्रत्येकाला मिळायलाच हव्या हे कितीही मान्य केलं तरी त्या सगळ्यानाच नाही मिळत हेही प्रत्येकाने स्विकारायल हवं.. तरी बरं आहे, आता सुख म्हणजे मोबाईल फोन घेणे.. एवढं कमी झालय..
शुभदा टिकम, सचिन टिकम, अभय कदम, प्रथमेश सामंत आणि श्रीराज बादेकर अशा ओळखीच्या कलावंताचा पात्र म्हणून सुंदर अभिनय, उत्तम नेपथ्य, उत्तम संगीत , उत्तम पार्श्वयोजना यातला एक छान प्रयोग पाहताना मन अस्वस्थ करुन गेला. मला नाटक करता येतं की नाही, अभिनय करता येतो की नाही मला ठाऊक नाही, पण मला जी दाद देता येते तशी कुणालाच देता येत नाही एवढ्या मारिचाला मात्र मी नेहमी माझ्यासोबत जगवतो.. पण खरं सांगतो मारिच समजलं पाहिजे मग घर तुटत नाही की तुम्ही घरापासून तुटत नाही.. नाटक सादरीकरण पाहताना गावचं नाटक म्हणून मस्तच.. मुंबईत स्पर्धेत जबरदस्त सादरीकरण म्हणूनच मस्तच मस्त.. पुन्हा पुन्हा असे प्रकार झालेत तर मस्तच मस्तवाला मस्त..
आता यातली एकच राहिलेली बाजू पण त्यालाही आमच्या मर्यादा आहेत.. आम्हा कलावंताना एक सफाईदारपणा म्हणून वावरताना पुण्या मुंबईच्या आर्टीस्टने दिलेला खोटा सफाईदारपणा नाही दाखवता येत.. आम्ही कलाकार म्हणून पाठांतर, पॉझ, ब्रेथ, लूक , कॉन्फीडंटपणाचा इझ दाखवू शकतो.. पण स्पर्धेला हवा असलेला टिपीकल सफाईदारपणा हा स्पर्धेला हवा असतो तो कसा आणायचा.. तो नाट्यशास्त्रात नाही.. प्रामाणिकपणे कलावंत म्हणून कला सादर करणे आणि स्पर्धेसाठी यंत्रवत कृत्रिम रंगखेळ ही स्पर्धा आहे.. या अशा स्पर्धेसाठी खुप मेहनत घ्यावी लागेल.. आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्ही तसे वागा म्हणून एक कलावंत म्हणून मी कधीच तुम्हाला शुभेच्छा देणार नाही.. आपण आहोत तसे वागूया.. आहोत तसे नाटक करुया.. आणि जसे नाटक करताय त्यालाही बघणारे चार माणसं तुम्हाला तुम्ही खुप खरे खरे नाटक करता ही शाबासकी कायम देत राहतील याच शुभेच्छा.. आणि त्या एका क्षणी गावच्या कलावंतानी आपली मुठ उघडून पाहावं.. एक एक खरं ओऍसिस दिसेल.. तुम्हाला चिंब भिजवणारं..
Comments
Post a Comment