दृश्यम 3



“साहेब आत येऊ का” ?

“अहो विचारताय काय, या की राव”.. हेड कॉन्स्टेंबल सुशांत पवार त्याला बघून त्यांच्या नेहमीच्या शैलीत हसत हसत म्हणाले.. “आज खुप दिवसांनी.. ?” 

“खुप दिवसांनी कुठे , तेवीस वर्षांनी भेटायला येतोय.. नशीब माझं.. ओळख तशीच ठेवलीय”.. तो माणूस शांतपणे बोलला.

सुशांत ने हातातला पेन बाजूला ठेवला. एसीचे बटण ऑन केलं. त्याला पाण्याचा ग्लास दिला.. आणि दररोजसारखा खळीत हसला. “तू ओळख ठेवलीयस अजूनही हे विशेष, आणि तुझी ओळख जपायला मग मीही बनतो अजूनही तुझ्यासारखा”..

सुशांत त्याच्यासमोर पाठमोरा होत खिडकीतून येणारी मालवण पोलीस स्टेशनची कचेरीतील खारी हवा चेहऱ्यावर घेऊ लागला..

खरतर त्या दोघांना ते दोघेच ओळखत होते. पण आज पंधरा मेची तारीख शोधून तो माणूस सुशांत साहेबांना भेटायला आला होता. तसा तो सुशांतला जन्मापासून ओळखत होता पण तेवीस वर्षांपूर्वी भेटली ती ओळख मात्र खरी.. त्या माणसांना त्या दिवसांपासून ह्या पोलीसासोबत जो चोर पोलिसाचा खेळ खेळलाय ना तो आजतागायत आहे. 

सुशांत शांतपणे हवा खात मागे फिरला, पुन्हा तसाच हसला.. आणि त्याला विचारलं 
“काय मग आज इकडे का येणे केले, तेही पोलिस स्टेशनमध्ये” ?
तो म्हणाला “होय एक सही हवी होती तुझी, तू सध्या ठाणे अंमलदार आहेस ना”.. 

सुशांत म्हणाला “हा तसा स्टेशन इनचार्ज मीच आहे, पण कसली सही हवीय ?”..

“तुझ्या ताब्यात काही माणसं आहेत त्याना सोडून द्यायला एक सही हवी होती रे”.. समोरचा उत्तरला !

सुशांत आतापर्यंत मराठीत बोलत होता.. आता त्याच्या स्टाईलने मागे खूर्चीवर रेलत हसला.. “रे बाबा जाशील तू.. मजाक आपल्या जाग्यावर आणि रजाक आपल्या जाग्यावर..” 

सुशांतच्या हसण्याचा त्या व्यक्तिच्या ना चेहऱ्यावर परिणाम झाला ना त्याच्या नजरेवर.. त्याची नजर दररोज आग खायची, त्यांचा कानांना कवटी फुटणाऱ्या आवाजाची सवय होती.. त्याला असल्या हसण्याची किमत त्यांच्या हातात सरावाने असणाऱ्या आग कमी झाल्यावर फेकणाऱ्या लाकडाच्या फाट्यासारखीच होती.. सुशांतच्या पोलीस स्टेशनच्या रुबाबाचा त्याला कसलाच फरक पडला नाही.

तो शांतपणे सुशांतला म्हणाला, “मला माणसं हवीयत.. तूला सही द्यायची आहे.. मी आर्जव वैगेरे करत नाही.. मी फक्त वाट बघतो.. आणि जेव्हा मी वाट बघतो, तेव्हा मी हरत नाही.. प्रत्येकाला यावचं लागत माझ्याकडे”…

त्याच्या बोलण्यातला करडेपणा वाढला होता. सुशांतने एसी फास्ट केला. पायाखालची ब्रिसलेरी उचलून घटाघटा प्यायला.. त्या माणसांने शांतपणे विचारलं.  “अजून पाणी हवंय का.. “

सुशांत नको म्हणाला.. “तूला नेमकं काय हवंय.. मला माझ्या मर्यादा आहेत. मी कसे कोणाला मोकळं सोडू..” 

समोरच्याचाही आवाज आता वाढला होता, 
“मग तू काय करणार आहेस त्या माणसांचे.. किती दिवस रिमांडच्या नावाखाली त्यांना ताब्यात ठेवणार आहेस.. आणि काय करणार आहेस त्यांना” ? 

सुशांतला त्याचं पटत होतं. पण एक एकाला पकडून आज जे ताब्यात ठेवलं होतं त्यावरुन त्याचे झालेलं कौतूक, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची मेहनत अशी कशी वाया जाऊ द्यायची या प्रश्नांचे उत्तर त्याला मिळत नव्हते.

आवंढा गिळत त्यांने शांतपणे होकार दिला.. का कोण जाणे त्यावेळी स्टेशनच्या त्या चौकीत ते दोघेच होते आणि ज्यांना मागत होता ती सगळी तशी सिव्हील एरेस्ट होती. वर वर दिसणारी एनसीचीच्या मॅटरला त्या सगळ्यांना स्वतालाच नॉनबेलेबल क्रायटेरिया लावून तिथच बाहेर बाकड्यावर बसवून घेतलं होते.

सुशांतने बेल मारली , तशी कोणीही न सांगता एक एक माणसं येऊ लागली

ऑपरेशन दगडमधील दगडू धोंडू पत्थरे.. 
मग त्याच्यापाठोपाठ ऑल द बेस्टमधला डोळ्यावर ब्लाईंड गॉगल लावून विजय आला..
 मग वाळूतला  समृद्ध , 
मग ठसकातला बाबा, त्याच्यापाठोपाठ बझरमधला नेता ,
 कडक बूट वाजवत द ग्रेट एक्सचेंजचे रॉ ऑफिसर, 
काठी टेकत ‘एक्सपायरी डेट’ वाले नाना आले,  
आणि मग सरतेशेवटी खिशात काहीच नसताना जामीन तरी कसा करायचा हा प्रश्न घेऊन ओएसिसचा नायक ‘तो’ ही आला.. 

सुशांतने साकारलेली त्याच्या नाटक एकांकिकेतील सगळी पात्रे ओळख परेडला त्याच्या समोर आली होती.

सगळे रांगेत उभे होते.. तो माणूस शांतपणे प्रत्येकाचे चेहरे पाहत होते..
प्रत्येकाला स्वताचा चेहरा होता, पण तरीही प्रत्येकजण सुशांत सारखाच दिसत होता..

तो समोरचा माणूस त्या सगळ्यांना पाहून म्हणाला , “नमस्कार तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो.. आपल्या सगळ्यांचा चेहरा समान आहे. पण आपल्या  कुणालाच देह नाहीय.. हा समोर बसलाय तो एक आत्मा त्याला वाटेल तेव्हा आपल्या देहावर तुमचा मुखवटा लावतो.. आणि तुमचं आयुष्य त्याने जगून मोकळा झालाय.. मी तुम्हाला न्यायला आलोय. आणि हा माझं नाव सांगायचं राहूनच गेलय.. मी मिस्टर कर्डिले”

मी मिस्टर कर्डिले.. 

सुशांतला माहित होत हा कोण आहे, आणि तो फक्त त्यालाच दिसत होता.. कर्डिले म्हणजे चिताईतली त्याची पहिली भूमिका.. जगलेले पहिले पात्र...आज 23 वर्षांनंतर कर्डिलेला त्याच्यानंतरच्या सगळ्या पात्रांना आपल्या सोबत घेऊन जायचं होतं !

कर्डिलेला आज तेवीस वर्ष झाली.. आणि सुशांतला पोलीस सर्व्हिसमध्ये बावीस वर्ष झाली. कॉलेज सुटल्यावर सुशांत थेट पोलिस झाला आणि आज हेड कॉन्स्टेंबल बनलाय.. त्या बावीस वर्षांत त्याच्या रेकॉर्डवरची ही सगळी उभी असलेली माणसे.. आज नाव त्यांचे वेगवेगळे असले तरी त्या सगळ्यांना सुशांतने जगवलं आहे.

कर्डिले ती शांतता भेदत म्हणाला “नेऊ का यांना की ठेवू तुझ्याजवळ..”

“मला फक्त एक बॉडी हवीय आणि ही सगळी जिवंत माणसं आहेत.. बॉडी तुझ्याकडे आहे..”

नेहमी खरं हसणारा सुशांत आता मात्र खोटं हसत होता. “ माझ्याकडे कुठली आलीय बॉडी.. “

कर्डिलेला शांतपणे बोलला - “आहे ना एक बॉडी मोहनची.. जी मेलेली आहे पण अजूनही कोणाला दिसली नाही.. कॉलेजच्या काळात जेवढा स्वतापासून पळत होतास, खर बोलायला घाबरत होता, मनात असूनही जो स्पष्ट बोललाच नाही त्याचे नाव सुशांत होतं की मोहन होते” ?  बोला सुशांत राव बोला.. सगळ्याच गोष्टी हसून नाही सोडता येत.. 

दिल धक धक करे नाटक स्टेजवर आले नाही.. पण त्या मोहनला सुशांतने आजपर्यंत लपवून ठेवलं होतं. तो स्टेजवर आला नाही म्हणजे नाहीच आहे असं जगाला सांगून मोकळा झाला होता. *गोष्ट लपवायला सोपी असते, पण आपणच ती लपवली आहे आणि आपल्याला ती माहितच नाहीय हे सांगणे म्हणजे दृष्यमचा खेळ असतो.*

कर्डिले बोलला, “एवढ्या वर्षानंतर ती जी एक अस्वस्थपणाची मोहनची गोष्ट आहे ती एकतर जिवंत कर नाहीतर मला तरी दे”.. 

सुशांत गप्पच..

“बघ तू मोहनला आणतोस की मी नेऊ..” कर्डिले जवळ जवळ ओरडलाच होता..

सुशांत पुन्हा एकदा खुर्चीतुन उठून  खिडकीकडे गेला.. वारा तोच होता पण आता जास्त टोकदार बनला होता.. 

त्याचवेळी टेबलावरच्या वायरलेसवर पलीकडून कोणीतरी बोलत होता !

हॅलो कंट्रोल रुम.. हॅलो कंट्रोल रुम… 

“कंट्रोल रुम एक मिसींगची केस आहे. लोकेशन फक्त तुम्हाला माहित आहे असं तक्रारदार म्हणतोय.. पण तो स्वताची आयडेंटिटी सांगत नाहीय.. “

सुशांत काहीही न बोलता खिडकीतून वारं झेलताना डोळे मिट्ट बंद करुन उभा होता..

आणि कर्डिले सगळ्यांसह फक्त हसत होता..

(समाप्त ) 

Comments