ऐन श्रावणातला 'शिरीष'दाह




आमच्या गावाकडच्या वाडीवस्तीवरचा श्रावण 'त्या' एकाच्या जाण्याने भरलेल्या आभाळाचा असूनही पण कोरडाठाक बनलाय ! तो जाऊच कसा शकतो या एवढ्या तीव्र भावोत्कट प्रतिक्रियांची भरलेली ओंजळ घेऊन शिरीष दूरच्या प्रवासाला निघून गेलाय..

सोशल मीडिया म्हणजे फक्त आभासी फॉलोअर्स असे जग असताना त्यानं सिंधुदुर्गच्या प्रत्येक घरात दिलेला एक हुंदका यूट्यूब, इंस्टाग्राम पण माणसे नाती जोडणारे असते हे दाखवून दिलंय !

 फक्त ३३ वर्षांचा होता तो. वयाच्या आणि अनुभवाच्या संधी फुलायच्या आतच १ ऑगस्ट २०२५ रोजी गोव्यातल्या एका रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. मेंदूच्या आजाराशी सुरू असलेल्या त्याच्या झुंजीचा शेवट आपल्याला हे सांगून गेला की काही गवसण्याआधीच काही हरवून जातं.

शिरीष म्हणजे मातीचा एक तुकडा. कोकणातला. मऊसर, निखळ, आणि आपल्या पायाखालचा. ‘रेड सॉईल स्टोरीज’ या त्याच्या आणि पत्नी पूजाच्या यूट्यूब चॅनेलने कोकणाला जागतिक व्यासपीठावर आणून ठेवलं. पण त्यात कोणतीही दिखावूपणाची सोबत नव्हती — होती ती फक्त आपल्या मातीची भाषा, आपल्या अन्नाचा सुगंध आणि आपल्या आयुष्याचं खरंखुरं चित्रण.

गावाकडं जाणारी लाल मातीची वाट जशी शेतात शिरते, तशी शिरीषची वाट मुंबईच्या कॉर्पोरेट आयुष्यातून थेट सिंधुदुर्गच्या मुळाशी पोहोचली. कोविडच्या काळात, जेव्हा सगळं जग थांबलेलं होतं, तेव्हा त्याने चालायला सुरुवात केली. ही चाल स्वतःसाठी नव्हे — तर आपल्या गावासाठी, आपल्या मातीतल्या गंधासाठी होती.

पुजा — त्याची अर्धांगिनी, शिक्षणाने फाइन आर्टिस्ट, मुंबईतील आर्ट डायरेक्टर. पण या दोघांनी एकत्र जे स्वप्न पाहिलं — ते होतं "गावात परत जाऊया. पुन्हा जगूया." आणि त्यांनी ते जगून दाखवलं.

शिरीषच्या व्हिडिओंमध्ये सापडायचं कोकणाचं खरंखुरं रूप. भातशेतीची गंधाळलेली माती, वयोवृद्ध आजोबांची मधाळ आठवण, सण-उत्सवांमधली चैतन्याची झुळूक आणि कोळश्यावर शिजणाऱ्या जेवणाचा वाफाळलेला सुवास.

 शिरीष आणि पूजाने ४० पेक्षा जास्त देशांतील लोकांपर्यंत कोकण पोहोचवलं, पण त्यात एक क्षणही बनावट नव्हता. त्यांचं प्रत्येक व्हिडिओ हे एक नम्र नतमस्तक होणं होतं कोकणच्या लाल मातीसमोर !

आज ‘रेड सॉईल स्टोरीज’च्या त्या लाल मातीने एक आपला शेतकरी गमावला आहे. हसरा, कामसू, आणि प्रामाणिक. आजही त्या व्हिडिओंमध्ये जेव्हा त्याचा आवाज ऐकतो, तेव्हा जाणवतं की शिरीष गेला नाही... फक्त कॅमेरा मागे सरकला आहे.

त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कोकण सुन्न आहे. वाटा ओल्या आहेत, पण मनं कोरडी.  मुंबईच्या झगमगत्या चमचमटातुन प्रकाश घेऊन त्याने दोडामार्ग सासोलीसारख्या गावात एक नंदादीप प्रज्वलित केला. 

शिरीष गवस हे नाव फक्त एका यूट्युबरचं नव्हतं. ते एका चळवळीचं प्रतीक होतं, ‘गावात परत या, आणि स्वप्न इथंच बघा’.

शिरीष, तू फक्त एक कंटेंट क्रिएटर नव्हतास. तू जिद्द शब्दांचा मानवी रुप होतास.. आणि काय बोलू मित्रा ! 
तू 'गवस'शील का परत की हा 'शिरीष'दाह असाच सवयीचा ठेवायचा मित्रा !

फ्रेंडशिपला एका मित्राच्या नसण्याच्या जाणिवेसह भावपूर्ण श्रद्धांजली..

#श्रद्धांजली

Comments