वादळमाया

प्रिय परप्रांतीय मच्छिमार बांधव,

ओखी वादळात दोन दिवस आपण सिंधुदुर्ग च्या किनाऱ्यावर नांगर टाकलात. आम्ही जमेल तसे आदरातिथ्य केलं. खर तर तुम्ही आमच्याशी कसे वागलात, कसे वागताय हे सगळं विसरून आम्ही त्या ओखी वादळात तुमचे पाहुणे म्हणून स्वागत केलं..
आजपर्यंत तुम्ही जेवढं समुद्राचे नुकसान केलंत तेवढं कदाचित ओखीनेही केलं नसेल हेही तेवढंच सत्य आहे, कारण पर्शियनचा सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावरचा धिंगाणा आम्ही पाहिलाय..

हे सगळं लिहिण्यास फक्त एवढंच कारण तुम्ही आमच्या बांधवाशी पर्शियन आणि यांत्रिकीच्या जोरावर जो मस्तवाल पणा केलात त्या उद्दामपणाचे उत्तर आम्ही तुमचे प्राण वाचवून दिले आहे. देवगड मालवण आणि वेंगुर्ला बंदरात गेले तीन दिवस ज्या समुद्राच्या जीवावर तुम्ही आम्हास मस्ती दाखवत होता त्या समुद्राचे रौद्र रूप पाहून तुम्ही शेवटी आमच्याच किनाऱ्यावर येऊन जगण्याची भीक मागितली आणि आम्ही गेले काही दिवस मागचे सगळं विसरून तुम्हाला जगवतोय..
उद्या निघाल, पुन्हा आपल्या राज्यात जायला.. तेव्हा जाताना याद राखा, या लोकांनी तुम्हाला जगवले आहे.. त्याचे उपकार मनाशी बाळगा.. जगा आणि जगू द्या !!!
भेटू पुढच्या वादळात..

Comments