भरड नाका

या जगात सगळं अस्थिर असते,
सगळ्याला वेगाची नशा असते
पण शांत चित्त मात्र एकच आहे
स्वताच्याच संयमी मोहात
तो समाधिस्त आहे
तो एकच आहे
तो भरड आहे
भरड नाका आहे

तो फक्त तोच आहे
कारण इथे अजूनही
पायाचे रेंगाळलेपण आहे
हातांचे उंचावलेपण आहे
बाह्यांचे स्फुरलेपण आहे
नजरेचे करारीपण आहे
आणि गर्दीत मागे जाऊनही
प्रत्यक्षदेहीचं ठामपण आहे

तो म्हणजे स्वागताचा सडा आहे
आणि भूतकाळातल्या आठवणींचा राडा आहे
आज वाटत असेल तो म्हणजे थेरडा आहे
पण डोळे मिटून पहा कधीतरी
तुम्हीच म्हणाल, हा माझ्या लहानपणीचा चिमुरडा आहे

सरकणाऱ्या दिवसाबरोबरचा
तो सगळ्या रस्त्याची वाट आहे
महानगरातील कितीही सुशोभित कॉर्नर असो
पण तो सगळ्या नाक्यांचा थाट आहे
इथे सगळंच भन्नाट आहे
भय, प्रेम, चर्चा सगळंच दाट आहे
आणि हो
ठरवून चुकवलेल्या हिशेबाची गाठ पण तोच आहे

काल अंधारात पाहिलं त्याला
प्रकाशाचे रेघ ओढताना
मी म्हटलं बाबा तू आहेस तसाच रहा
कारण आम्ही तुला पाहिलंय
गाव सोडून जाणाऱ्या लेकरांची
गाडी मुद्दाम कोंडी करून अडवताना
आणि
चाकरमान्या लेकरांची वाट
काळजाचे दगड होऊन पाहताना

(ही कविता नाहीय, मला लिहिता येत नाही, जमेल त्याने फक्त वाचा आणि अगदी बच्चन होऊन.. कारण इथे उभं राहणारा फक्त बच्चनच असतो)

Comments