शिवोहम

"कोण आसस तू फक्त एकदा सांग" 
मी हातात काकडो घेवन त्येका विचारलंय
तर तो हसलो आणि म्हणालो
'शिव…' 
मगे तुझो बापुस कोण 
'विष्णू'' तो परत हसत बोललो
"ठिक हा", "आता आज्याचा नाव सांग "
"बरमदेव"
माजी उत्सुकता चाळवली, 
मी इचारलय , तुझ्या पणज्याचा नाव सांग
तो हसलो, 
गळ्यातलो मामा सरळ केल्यान आणि 
हातातलो डमरू एकदाच व्हाजवन म्हणालो
"शिव"
"माझो पणजो पण मीच" 
"माझी उत्पत्ती पण माझ्याच पासून "

उत्तर आयकान हातातलो काकडो 
तडतड पेटाक लागलो..
डोळे जड होवक लागले 
तेव्हढ्यात जड होणाऱ्या माझ्या डोळ्यार 
पाणी बसला चापकन..
डोळे उघडताना कमंडलूतल्या पाण्यात 
लाटे उसळताना दिसाक लागले..
तेवढ्यात परत आवाज इलो
"जागृती, स्वप्न आणि निद्रा 
या चेतनेच्या अवस्थांच्या पुढची 
ध्यानस्थ अवस्था
म्हणजे हयती तुर्यावस्था:
माका शोधुक जाशील 
तर माझ्यासारखो होशील'..

पण आता तर माका शोध घेवचोच होतो..
एकटो कमी पडतय की काय 
अशी भीती वाटाक लागली.
हाक मारलय बरमदेवाक आणि इसनुक
येवा रे हेका वायच शोधुक..
ब्रह्मदेव इलो आणि इसनुपण इलो
ब्रह्मदेवाक सांगलय 
तू हेका वरन शोधुक घे 
इसनुक सांगलय 
तू हेका खालुन शोधीत ये
ब्रम्हदेव वर वर जायत रवले
इसनु खाली जायात रवले
हजार वर्षा मागे आणि पुढे गेले 
पण तो तसाच गावलो
रुजीव पाषाण म्हणानं 
रुजत जाणारा आणि 
तरीही ठाम असलेलो 
आपल्या जाग्यावर घट्ट रूजलेलो !

आता तेंनी माका इचारल्यान 
"तुका मी शोधुचो आसय ना 
तर भायर नाय तुझ्यात गावतलय" !
हाताचो पंजो नजरेसमोर ठेव 
आता आंग्ठो आणि शेवटचा बोट जोड 
उरलेली तीन बोटा ताठ होतली 
बघ तेच्याकडे !
दिसलो मा त्रिशूळ ?
तुझ्या हातात माझो त्रिशुळ हा ना?
बघ मी तर तुझ्यातच आसय ना !!

- ऋषी श्रीकांत देसाई 

Comments