पुन्हा रामायण

अयन म्हणजे वाट..
जी वाट प्रभू रामचंद्र यांच्याकडे नेते ते रामायण

माझे आजपर्यंतच्या निवेदनातील हे सगळ्यात आवडतं वाक्य.. ज्या ज्या वेळी बोलतो त्यावेळी तो काळ उभा होतो..

दूरदर्शनवर पुन्हा रामायण सुरू झालंय.. अर्थात आमचं स्क्रीनवर महाभारत सुरू असल्याने ते टिव्हीवरचे रामायण पाहता येत नाही.. पण मी काही दिवसांपूर्वी अयोध्येत गेलो होतो तेव्हा रामायण या दूरदर्शनवरच्या महाकाव्याची ओळख झाली होती.. अजूनही संपूर्ण उत्तर भारतात रामानंद सागर यांच्या मालिकेतील अरुण गोविल, दीपिका चिखलिया, आणि सुनील लेहेरीया यांच्या राम सीता लक्ष्मण यांच्याफोटोंच्या प्रतिमेला लोक देव समजून घरी घेऊन जातात.. श्रद्धेला चेहरा नसतो पण डोळे मिटायला जी एक प्रतिमा लागते ना ती ह्या सिरीयलने रामभक्तांना दिलीय.. कधी जमलं तर दोन तीन दिवसांची सुट्टी काढून अयोध्येला जा.. तिथं उभं राहिल्यावर अंगावर रोमांच येतेे की इथे या जमिनीवर साक्षात प्रभू राम कधीकाळी उभे राहिले असतील..

अकारो ब्रम्ह रुपस्ये, 
धकारो रुद्र रुपस्ये
यकारो विष्णू रुपस्ये 
अयोध्या नाम राजते

श्रीराम.. पिढ्यानपिढ्यान जपलेले आणि पिढ्यानपिढ्या समृद्ध झालेले हे नाव आत्मशांतीचे आहे.. रामायण आणि रामनामाचा हा प्रवास भूर्जपत्र ते हस्तलिखित आणि सीरियल पासून सोशल मिडियातील इमेजीस पर्यंत अखंड प्रवाही आहे.. पण एक नक्की या दैवताचे रूप प्रत्येकजण आपापल्या परीने शोधतोय.. 

अजूनही अयोध्येत दिवस मावळतीला आला की मुख्य रस्त्याच्या बाजूला लोक दाटीवाटीने गर्दी करतात.. खूप कष्टकरी असणारी माणसे कशाला जमलीय हा मनाला प्रश्न पडतो.. त्याचवेळी रवींद्र जैन यांचा आवाज कानी पडतो.. आणि सुरू होते रामायण सिरीयल.. लोक नमस्कार करतात.. लोक आनंदित होतात.. लोक घळाघळा रडतात.. आपण फक्त त्या स्क्रीनवर बघत आपणही लोक व्ह्ययचे बस्स... दररोज सूर्य मावळतीला गेले की अयोध्येत रामचंद्र अवतरतो !!

रामायण सिरीयल अदभुत आहे.. त्यांनतर खूप सिरीयल येऊन गेल्या पण लहानपणी पाहिलेल्या त्या रामायणची सर कशालाच नाही.. त्या सिरियलमुळे आम्हाला राम नाही मिळाले.. पण घरच्या झाडूच्या हिरापासून धनुष्य होतो.. आणि त्याच धनुष्यातून निघालेल्या बाणात एक सामर्थ्य असते याची जाणीव झाली.. हनुमान म्हणजे मारुती का बजरंग हे ठाऊक नाही पण तोंड फुगवला की तुम्ही पवनपुत्र होता याची जाणीव झाली.. आणि आयुष्यात एकदा कुंभकर्ण व्हावे आणि सगळ्या दुनियेपेक्षा मोठं मोठं व्हावे आणि दुनिया एवढीशी वाटू लागावी असला एकमेव राक्षसी विचार चोरून नक्की मनात आला असेल...

रामायण फक्त सिरीयल नव्हती.. तो जगणे पुढे नेणारा मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि गणिताचा धडा होता.. रामायण तुम्ही बघा की नका बघू तो तुमचा प्रश्न आहे.. पण तुम्ही जर नव्वदच्या दशकात मोठे झालेले असाल तर फक्त तुमच्या घरासमोरचा रस्ता बंद करणारा आणि पुढल्या आठवड्यात आणि चांगले होईल ही उत्सुकता जिवंत ठेवणारे नाव म्हणजे रामायण सिरीयल होते हे नक्की !!

ऋषी श्रीकांत देसाई

Comments