आणि जितेंद्र जोशी

हॉस्पिटलची नकोशी सकाळ..
रात्री तसाच झोपलेला कुठल्या तरी रुग्णाचा कुठला तरी नातेवाईक..
कुठल्याश्या आवाजाने तो कोणीतरी झोपलेला असतो.. म्हणजे दुनियेच्या देखी गजानन कामेरकरचा पोरगा !
..
कोणीतरी थंड डोक्याने अंत्यविधीचे पॅकेज समजावून देत असतो. बेसिक, सिल्व्हर, आणि गोल्ड टाईपमध्ये पॅकेज असते.. गजानन कामेरकरचा पोरगा उद्या गजानन मेला तर त्याचा अंत्यविधी आणि कार्य कसे होईल याचे फायनाशियल गणित समजून घेतो.. आणि बजेट फायनल करण्याच्या स्वरात विचारतो

"कावळा मिळेल का हो, पिंड फोडायला"..

हा डायलॉग ऐकल्यावर काळजातून कळ उठते ! एवढा साधा सरळ प्रसंग पाहिल्यावर आपल्या खांद्यावरचे मातीचे फुटके भांड घपकन मागे पडून फुटते..

त्या क्षणाला ती गोष्ट प्रसन्न कामेरकर नावाच्या माणसाची काल्पनिक न राहता ती जिवंत होते ! जितेंद्र जोशींच्या सहज सुंदर अभिनयाची ती परमोच्च पावती आहे. 
खरंतर जितेंद्र जोशीबद्दल मी काही लिहावा एवढा आपण मार्तंड नाही आहोत. कारण तुम्ही त्याला चित्रपटात शोधाल तर तो वेबसिरीजमध्ये मिळेल. वेबसिरीजमध्ये शोधायला जाल तर नाटकात दिसेल, आणि नाटकात शोधायला गेलात स्वताची कविता वाचणारा एक मनस्वी कलावंत दिसेल.. तो जेव्हा पाहाल तेव्हा क्षितिजावर आभाळाकडे हात उंचावलेला कधीही शब्दात न मिळणारा  अफाट कलाकार दिसतो, त्याच्या त्या तुकारामच्या पोस्टरसारखा !

जितेंद्र जोशी कुठल्याच भूमिकेला आवाज बदलत नाही की चेहरा बदलत नाही. तुम्ही मेकअप या शब्दाचा अर्थ जाणलात तर त्या वाक्याचा खोल अर्थ समजेल. जितेंद्रला आठवून बघा. हम तो तेरे आशिक है चा अनिल प्रधान, शाळातला नारूमामा, कुटुंबमधला नामदेव, तुकाराममधला तुकाराम, दुनियादारीचा साई, बाजीचा मार्तंड, काकणचा किसु, बघतोस काय मुजरा करचा नानासाहेब देशमुख, माऊलीचा नाना लोंढे, सेक्रेट गेमचा काटेकर, बेतालचा अजय मुधवयन. सगळ्या सगळ्या पात्रांचे वेगळेपण होतंच. 

पण तरीही त्याच्या आवाजातली ती कविता एकदा डोळे मिटून आठवा !
"हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय'

जितेंद्र जोशी उघड्या डोळ्यांनी ऐकायचा विषय आहे, आणि मिटल्या डोळ्यांनी पहायचा विषय आहे..

 तो तुमच्या ओळखीचा नसला तरी फरक नाही पडत. आपल्यात एक 'जितेंद्र जोशी' लपलाय, त्याला लिहते करा, बोलते करा.. त्याला जिवंत ठेवा तरच तो प्रसन्न कामेरकर जिवंत राहील !

- ऋषी देसाई


Comments

  1. कमी शब्दांत जितू दा बद्दल छान व्यक्त झालास 👌👌 दोन स्पेशल नाटक असो वा वेब सीरिज जितू आपली छाप सोडत आलाय ..

    ReplyDelete

Post a Comment