निंबोणीच्या झाडामागे..

हे जे सिनेमाचे जग आहे ना ते खूप विचित्र आहे.. खूप मोठं झाल्यावर कळत की गाणी हिरो म्हणत नसतो, आणि नाचणारी हिरॉईन महिनाभर त्या स्टेप घरी शिकून कॅमेऱ्यासमोर उभी राहिलेली असते. अर्थात काही वेळा मुद्दाम आणि काही वेळा आपण त्या प्रतिमेच्या मोहात आवाज वास्तव विसरतो. प्रतिमेच्या मोहात पडलात की समजायचं मारीच आपल्याला ओढत नेतोय.

खूप वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता 'साज'.. दोन गायिका बहिणीची ती काल्पनिक कथा होती. वास्तव स्पष्ट लिहिण्याची हिम्मत नसली की काल्पनिक लिहून खपवायचे ना तसला तो प्रकार आहे..पण मला ना साज पेक्षा साज चा भाग 2 पहायचा आहे..

एका गायिका बांगलादेशहुन तेव्हा मुंबईत येते. आणि स्वतःचा सुरेल आवाज असतानाही चंद्राची सावली म्हणून जगत राहते.  त्या गायिकेला तिच्या सारखे बनायचे नव्हतेच मुळी, आणि चार पैसे मिळतात म्हणून डुप्लिकेट म्हणूनही जगायचे नव्हते. ती गात राहिली.. चंद्र दिसेनासा झाला की अगदी भल्या पहाटेची जी राघववेळ तिला मिळायची त्यात ती स्वतःचे चांदणे उधळत राहिली.. ती तशी का चंद्राच्या सावलीत राहिली हा तिला प्रश्न विचारायचा अधिकार आपण सगळ्याने मिळून गमावलाय.. आणि ती स्वतः निंबोणीच्या झाडामागचा चंद्र बनलीय..

एखादा स्वर असा केशराच्या दुधात घोळवून जिभेपर्यंत नेण्याची जी निमिषविरक्ती असते ना त्या क्षणाचा आवाज म्हणजे 'सुमन कल्याणपूर' ! हे नाव आज किती जणांना माहीत आहे की नाही ठाऊक नाही..पण पुढे गाणी लिहितो ती आजपर्यंत तुम्ही समजत असलेल्या आवाजाने नाही म्हटलीत एवढं समजलं तरी खूप होईल !

निंबोणीच्या झाडामागे, केतकीच्या बनी तिथे , नाविका रे वारा वाहे रे, जिथे सागरा धरणी मिळते, कशी करु स्वागता,  जगी ज्यास कोणी नाही, अशी कैक गाणी आहेत की जी तुम्ही समजत असाल की कुठल्या तरी मोठ्या गळ्याने गायलीयत. पण हा सगळा स्वर सुमन कल्याणपूरचा आहे. 

दरवर्षी गणपतीत मी माझया मोबाईल मध्ये एक गाणं कायम पहाटे वाजवतो. 'ओंकार प्रधान रूप गणेशाचे'.. पहाटेच्या सुर्यकिरणांचा स्वर बोलला असता तर नक्कीच ते एवढंच नादमयी असते जेवढे सुमनताई गातात !

सुमन कल्याणपूर माझ्या पिढीला हे ठाऊक नाही हे मी का बोलू ? मुळात मागच्या पिढीने हे नाव जाणून घेतलेच नाही ना ? मागच्या पिढीची ही खूप मोठी चूक आहे.. हे नाव आपण अभिमानाने मिरवलच नाही. ते मिरवल असते तर कदाचित आज निंबोणीच्या झाडामागे चंद्र लख्ख हसला असता !

- ऋषी देसाई
28 जानेवारी 2021

#वाढदिवसाच्या_शुभेच्छा

Comments