बोट न रोखणारा ठाकरे

शिवसेना या चार अक्षरांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केलंय. प्रबोधनकार ठाकरे नावाच्या एका द्रष्ट्या विचारवंताने पाहिलेलं समाज सुधारक चळवळीचे चित्र शिवसेनेच्या निमित्ताने रुजलं. आणि हाच विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्व बनून अवघ्या देशंभर नेला. याच आक्रमक शिवसेनेला पुढे अत्यंत संयमी पण तरीही विजयी अश्वमेध बनवले ते उद्धव ठाकरे यांनी.. आणि याच शिवसेनेला पुढच्या टप्प्यावर नेताना नियोजनबद्ध , विकासाभिमुख आणि आश्वासक बनवले ते आदित्य ठाकरे यांनी.
 2019 मध्ये जो राजकीय चमत्कार घडला त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्यात जे नाव पुढे होते त्यात आदित्य ठाकरे यांची कार्यपद्धती अत्यंत महत्वाची होती.. आदित्य पर्व, युवा पर्व, युवा सेना अशा राजकीय मोहिमेचा अत्यंत विचारपूर्वक वापर करत आदित्य यांनी आपल्या नेतृत्वगुणाची छाप सोडली
आदित्य यांची ओळख राजकारणात येण्यापूर्वी बाळासाहेबांचा नातू म्हणून जशी होती त्यापेक्षाही राजकारणापासून कोसो दूर असणारा मनस्वी प्रतिभावंत युवा अशीच होती. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत 2010 साली शिवसेनाप्रमुखांनी युवा सेनेची घोषणा केली आणि तिथूनच केवळ शिवसेनेचे राजकारणच नाही तर चेहरा मोहरा बदलला. युवा सेनेची बांधणी करताना 2018 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागली. आणि मग 2019च्या निवडणूकीत पायाला भिंगरी लावून शिवसेनेचे वादळ निर्माण केले. 
उद्धव ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय झाला आणि दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीला गेलेल्या आदित्य ठाकरेंवर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणात दखल घेतली गेली. दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीला गेलेला आदित्य त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवसेनेत नेता बनला.. 
मुंबईत अस्लम शेख यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेत मुंबई उपनगर आदित्यने घेतले त्यातला राजकीय शहाणपणा अजून उमगणे बाकी आहे. आज आदित्य यांच्यावर महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि राजशिष्टाचार विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. ठाकरे सरकारमध्ये प्रभावशाली मंत्र्यामध्ये आदित्य यांचे नाव अग्रभागी आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर आज महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणाने एक मोठी जबाबदारी टाकलीय. आजघडीच्या युवा नेत्यांमध्ये 2024 च्या राजकारणांचा विचार करता आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातंय. मुंबई महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका यामध्येही आदित्य यांच्या नेतृत्वगुणांची कसोटी लागणार आहे. आदित्य यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेची वाटचाल आता त्याच दिशेने जोमदारपणे  सुरु झालीय !
थेट लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवणारा ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती इथपासून ते 2024 च्या निवडणुकीचा चेहरा इथपर्यंत आदित्य ठाकरेंचा प्रवास सुरु आहे.. आपल्या उण्यापुऱ्या कारकिर्दीतही अनेक राजकीय वादळ, टीका टिप्पणी झेलत आदित्य यांचा प्रवास सुरूच आहे. अवघ्या तिशीत महाराष्ट्राच्या साठीच्या राजकारणातल्या तगड्या दिग्गज लोकांच्या गर्दीत आपली ओळख निर्माण करणारे हे नेतृत्व आज एकतीशीत प्रवेश करतेय. आदित्यच्या राजकीय कारकिर्दीला आता कुठे सुरुवात होतेय म्हणा.. त्याचे राजकारण मुठी वळवणारे नाहीय, तो फक्त फिंगर क्रॉस करतो.. बोट रोखून बोलणाऱ्या पिढीत जेव्हा कुणी बोट न रोखता बोलतं तेव्हा ते खूप 'पद्धतशीर' असते एवढं राजकारण तरी आपल्याला नक्की कळत म्हणा !
महाराष्ट्राचे पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

- ऋषी देसाई
१३ जून २०२१

Comments