अमितच्या बाबांची गोष्ट

मला अमित ओळखत नाही.. मी अमितच्या वयाचा नाहीय, पण मला अमितने मित्र म्हणावं अशी खूप इच्छा आहे.. तसे अमितचे बाबा मला ओळखतात. अमितच्या बाबांनी ऑफिसात मला मारलेली हाक ही माझ्या कारकिर्दीतली ही विलक्षण ठेव आहे.  " तू ऋषी देसाई ना, तुझा आवाज दमदार आहे, हेडलाईन्सला आवाज छान लावतो" मला वाटलं ही ऑफिसतली गोष्ट असेल, पण निम्म्या मुंबईत अजूनही अनेकांना ही गोष्ट अजून आठवते, कमाल आहे 2013 ची आठवण अनेकांना आहे ! त्यांनी सहज बोललेली गोष्ट आजही आठवली की अनुभवाचे अप्रायझल होते

त्यानंतर दोन वर्षापूर्वी मीच बुलेटिनला होतो,  पनवेलला सभा होती. सभेत अमितचे बाबा बोलायला उभे होते. आणि अचानक ते बोलले, "लाव रे तो व्हिडीओ".. टिव्हीच्या स्क्रीनवर मीच मला पाहत होतो. माझी एक बातमी त्या स्क्रीनवर झळकली होती. सगळे न्यूजरूम त्या क्षणी माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होतो त्याक्षणी आपण गणेश गायतोंडे होतो.
अमितचे बाबा खूप वर्षांपूर्वी कॉलेजला आले होते त्यावेळी क्रेझ नावाची गोष्ट काय भन्नाट असते ती अनुभवली होती. वर्षामागून वर्ष गेली तारखा बदलल्या बदलत नाहीय ती फक्त त्या अमितच्या बाबांची क्रेझ !

अमितचे बाबा असे म्हणायचे एकमेव ओळख म्हणजे हे 1990 नाहीय, 2000 नाहीय की, 2010 नाहीय, हे 2021 आहे.     आणि या सगळ्या पर्वात हा जो तरुण माणूस आहे ना तो आज पिढ्यामागून पिढ्या पाल्यपण सांभाळतोय.. लोक त्यांना राज ठाकरे म्हणतात.. पण समोर आले की एकच शब्द असतो 'साहेब'
राज ठाकरे हे नाव आता केवळ मुंबई आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणात सर्वदूर पोहोचलय. प्रांतिक अस्मितेचा आवाज आणि धडाकेबाज वक्तृत्वांची जनसामान्यावर पडलेली छाप या परिघातून आज राज ठाकरे यांचे राजकारण समजून घेणे जास्त गरजेचे आहे !

 शिवसेनेचा युवा नेता ही ओळख पुसताना त्यांनी निर्माण केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ही ओळख राज ठाकरेंच्या विचारातून निर्माण केलेल्या नव्या कार्यकर्त्याबरोबरच नव्या राजकीय वाट प्रगल्भ करणारी आहे.. राज ठाकरेंनी सत्ता नसतानाही कार्यकर्ता टिकवलाय याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची महाराष्ट्र धर्माचा विचाराची स्पष्टता ! आज लॉकडावूनमधल्या काळात सगळं काही ठप्प असताना हजारो तरुण किंवा समाजातील अनेक घटक जेव्हा कृष्णकुंजची पायरी चढून न्याय मागतात आणि सदस्यत्व स्वीकारतात तेव्हा राज ठाकरे यांचा सत्तेपेक्षाही मोठा झालेला प्रभाव स्पष्ट जाणवतो !
आयुष्यभर संघर्ष पाहिलेल्या या नेत्यांने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून जी लढाई सुरू केली ती आजही संपलेली नाही कधी उत्तर भारतीय तर कधी राष्ट्रीय पक्ष तर कधी महाराष्ट्राच्या राजकारणातला बटबटीतपणा या सगळ्या विरुद्ध ते आजही ठाम आहेत. गर्दीने फुललेल्या सभा आणि निवडणुकांमध्ये ओळीने आलेले पराभव या दोघातही राज ठाकरे आपला राजकारणातला स्थायीभाव आजही घट्ट रोवून उभे आहेत 
आज कुठलेही सत्तापद नसतानाही राज यांच्या प्रत्येक भूमिकेची दखल ही माध्यमांना घ्यावीच लागते.. राज ठाकरेंचा विचार हा नेहमी अस्मितेशी जोडलेला असला तरी तो वास्तवाला धरून असतो. साहित्य कला मनोरंजन क्षेत्रातल्या चौफेर मुशाफिरीतून आणि सखोल वाचन संदर्भाचे देणे लाभलेला हा नेता न बोलता ट्विटर सारख्या मायक्रोब्लॉगिंग साईटवर लिहितो तेव्हा ते लिहिलेले शब्दही बोलल्याएवढेच खरे होतात..
राज ठाकरेसमोर आज असंख्य आव्हान नव्याने चेहरे बदलून उभी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना आता संघटनात्मक पातळीवर नव्याने अनेक राज घडवावे लागतील, आणि पुन्हा एकदा त्यांची लढाई ठाकरे सोबतच आहे नव्याने अधोरेखित करावेंच लागणार आहे. आणि या लढाईत राज ठाकरे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतीलच ! आणि हो, आता फक्त एकच नाही लाखो अमितांच्या प्रगती पुस्तकावर त्यांनाच सही करायची आहे.. तेही मेरीटमध्ये आणून !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

- ऋषी श्रीकांत देसाई 
मुंबई

Comments

Post a Comment