प्रभूपदास नमित दास

A great line by Suresh Prabhu in his opening remarks: The rootless are ruthless!

गोष्ट मागच्या वर्षीची आहे !
28 फेब्रुवारीला twitter वर एक ट्विट होते. त्यातल्या या ओळी.. एका परिषदेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आपले भाषण संपवताना सुरेश प्रभू यांच्या ओळी वाचून आपलं भाषण संपवले.. प्रभू यांच्याबद्दल आदर नेहमीच असतो.. पण हे वाक्य इंग्रजीत नसते त्या वाक्याच्या जहालपणाची किंमतही कळली नसती.. मुळात ruthless म्हणजे नेमकं काय ते समजलं की काळीज नावाची गोष्ट धडधडू लागते !

मुळात आंतरराष्ट्रीय विषयावर भाष्य करताना एस जयशंकर सारख्या बुद्धिवान माणसाने सुरेश प्रभु यांचे हे वाक्य वापरणे यात एक फार मोठे भरीवपण आहे..

सुरेश प्रभू कोण आहेत ? भाजप म्हणजे एक हिंदुस्थान प्रगतीपथावर नेणारा विचार अशा वाढलेल्या वयात समजलेल्या भाजपचा चेहरा समजावा असे नेते आहेत. खरंच अर्थशास्त्र समजते असे अर्थतज्ञ आहे. राजकारणात आल्यावर खोटे बोलावेच लागते आणि सोयीस्कर भूमिका घ्यावी लागतेच या विधानाला अखंड छेद देणारा राजकीय नेतृत्व आहे. मागे झुंडी नाहीत म्हणून चलणे थांबावयाचे नसते हा सिद्धांत जगणारा माणूस आहे.. कोकण कला अकादमी नावाचे कोकणी कला जगाच्या व्यासपीठावर नेण्याचे स्वप्न पाहणारा रसिक माणूस आहे.. आणि हो सत्ता ज्याला ज्याला ओढून ओढून बोलावते असा विद्वत्तापूर्ण संयम आहे.. 

मला माहित आहे हे सगळं मी जड लिहितोय.. कारण बालभारतीतला एक सोपा धडा शिकवताना कळला नाही तर मग गाईड, 21अपेक्षित प्रश्नसंच, व्यवसाय, एक दिवसात हमखास पास असे एक ना अनेक उपाय करावे लागतात. सुरेश प्रभु म्हणजे आपल्याला अजूनही न कळलेला बालभारतीच्या धड्यासारखे सरळसोपे गणित आहे.. तो शिकवताना नाही कळलं की कॉप्या कराव्या लागतात..

सुरेश प्रभु यांचे आयुष्य म्हणजे एक असे बायोपिक आहे की ज्यात कुठलाच मसाला नाही पण एक दरवळ नक्की.. कुठला जिन्नस तो शोधायला जाल तर सगळा माणूस वाचावा लागेल.. राजकारण हे वशील्याचे काम असे समजताना सारस्वत बँकेतून थेट मातोश्री आणि मातोश्रीतुन थेट सिंधुदुर्गचे खासदार होणे.. एकदोन वेळा तर चार वेळा.. इथपर्यंत मला त्यांच्या राजकीय विजयाचे कधीच कौतुक वाटत नाही.. कारण ती लढाई प्रभु यांची नसायचीच मुळी ! त्या लढाईत नारायण राणे यांची युद्धनीतीच भन्नाट असायची त्यामुळे ते जिंकायचेच..

प्रभु यांनी आयुष्यात स्वतःच कुठल्या गोष्टीचे श्रेय घेतले नाही त्यामुळे त्यांनी कुणाचे श्रेय नाकारले असेल असे माझ्या वाचनात नाही.. पण हरल्यानंतरही मोदी सरकारमध्ये थेट मंत्रीपद मिळवणे, मग पक्ष प्रवेश, मग त्याच दिवशी मुंबईला येणे, विमानतळावर उतरल्यावर थेट शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन करणे आणि अवघ्या अर्ध्या तासात सेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणे हे सगळं विलक्षण आहे.. सकाळी शिवसेना सोडून संध्याकाळी  उशिरा सेना भवनात जाणे ही गोष्ट करायला छातीत वाघाचे काळीज ट्रान्सप्लांट करून बसवलं तरी जमणार आहे.. याच एकमेव कारण म्हणजे हा माणूस सत्ता जगायला काम करूच शकत नाही याची खात्री सगळ्यांना आहे..

अटलबिहारी यांचे स्वप्न असणारी नदीजोड योजना ज्यावेळी या भगिरथला दिली तेव्हा खूप बरे वाटले.. एसटीडी बूथ ते आजचे 2g नेटवर्क याच्या सुरुवातीच्या काळात प्रभु या नावाचे योगदान विसरून चालणार नाही.. पराकोटीचा संयम, आणि टिकेपासून कोसो हात दूर असणारा हा माणूस प्राक्तनात जी राजयोगाची रेष घेऊन आलाय ना ती मला वाटत विद्यारेषेला पीळ मारूनच आलीय.. सत्तेत नसताना ऋषीहुड युनिव्हर्सिटीच्या मानद फाऊंडीग चान्सलर पदी नियक्ती झाली आणि सगळ्या हरियाणात आनंद झाला.. हे अशक्य आहे आजच्या जगात

मागच्या वर्षी मालवण नगरपालिका शतक महोत्सवाला थेट कार्यक्रमात न येता नगरपालिकेत जाऊन सुरेश प्रभू यांनी पुढच्या शंभर वर्षात मालवण कसे असेल याचे ओरली प्रेझेंटेशन केलं.. एका शहरावर जागतिक कीर्तीचा माणूस एवढं डीप मध्ये बोलायला कारण हे शहर पायी चालल तरच समजते ना !

सुरेश प्रभु एका जातीचे, एका पक्षाचे हे ज्याने त्याने आप आपल्या सोयीचे मांडलेले गणित आहे.. सुरेश प्रभु फक्त एका विचाराचे आहेत.. टाटा, महिंद्रा, निलकेणी, सेन, ही नाव जेव्हा आपण वाचायला घेऊ ना तेव्हा सगळ्यात सोपे अर्थशास्त्र म्हणून जे पुस्तक निवडाल त्याचे नाव असेल सुरेश प्रभु ! दास कॅपिटलपेक्षा प्रभुपदास नमणे म्हणजे शिकणे आहे !

ते वर सुरेश प्रभु कोण असे लिहिताना खूप सारं लिहिलंय, त्यात एक फक्त राहून गेलंय. सुरेश प्रभू म्हणजे, 'जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गणेशोत्सवात तुम्ही कोकणात गावी गेलाच पाहिजे हा चाकरमानी विचार दरवर्षी आठवणीने जिवंत ठेवणारा  माझ्यासारख्या कैक चेहरे नसलेल्या चाकरमान्यांचा प्रगल्भ चेहरा !

Comments

  1. सुरेश प्रभू देशाच्या राजकारनातील अद्भुत नाव..

    ReplyDelete

Post a Comment