इस रात की सुबह नही

अफगाणिस्थान हे नाव निदान या क्षणाला मोबाईलच्या व्हॉटसअपमध्ये टेक्स्ट झाले नसेल असा कुठला मोबाईल नसेल एवढे ट्रेंडिंग बनलंय. कुठलीही नैसर्गिक आपत्ती नसताना केवळ जीवाच्या भयाने पळणारे अफगाणीस्थानी नागरिक आज विमानतळाच्या दिशेने पळतातयत.. जे वाचले ते धावतायत.. जे धावतायत ते जर तालिबानांच्या कचाट्यात सापडले तर थेट मृत्यू.. लहान मुले आणि महिलांचे अतोनात हाल सुरु आहेत. एक झेंडा गाडण्यासाठी रक्ताचा सडा पाडला जातोय..  विमानात कोंबलेली माणसे, विमानावर चढलली माणसे आणि विमानतळावर प्रचंड गर्दी केलेली माणसे.. माणसंच माणसं.. फक्त जगण्यासाठी धावणारी माणसे.. आणि तरीही घाबरु नका असे आवाहन करणारी स्टेनगन घेतलेली तालीबानी माणसं.. आज अफगाणिस्थानमध्ये दिसणारे दृष्य प्रचंड भयानक आहे. 
ही शेवटाची गोष्ट सुरुवात झाली पंधरा ऑगस्टला.. ज्यावेळेला भारतात त्याच अफगाणिस्थानात चित्रीत झालेल्या काबुलीवाला चित्रपटातील ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन तुझपे दिल क़ुरबान हे गाणे स्पिकरवर वाजत होते अगदी त्याचवेळी अफगाणिस्थान एका नव्या कब्जात जात होते. अमेरिकन सैन्याने काढता पाय घेतल्यानंतर जवळपास संपूर्ण देश ताब्यात घेणाऱ्या तालिबाननंअफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवरही आक्रमण केलं होतं. दरम्यान, तालिबानचे दहशतवादी काबुलच्या सीमेमध्ये घुसले आहेत. तसेच या दहशतवाद्यांनी सर्व बॉर्डर क्रॉसिंगवर कब्जा केला असल्याचं होतं. दरम्यान, आता अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. तालिबाननं तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा काबुलवर आपली सत्ता प्रस्थापित केली. २००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबानला काबुल सोडून पळ ठोकावा लागला होता. 
२००१ पासूनच तालिबान अमेरिका समर्थित सरकारशी संघर्ष करत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदयदेखील अमेरिकेच्या प्रभावामुळेच झाला होता. आता तोच तालिबान अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघानं अफगाणिस्तानमध्ये फौज उतरवली होती, तेव्हा अमेरिकेनंच त्या ठिकाणी असलेल्या मुजाहिद्दीनांना हत्यारं आणि प्रशिक्षण देत युद्धासाठी प्रवृत्त केलं होतं. परंतु त्यानंतरही ना सोव्हियत संघानं हार मानली आणि परत गेले, परंतु अफगाणिस्तानमध्ये एका कट्टरपंथी संघटनेचा जन्म झाला.
पण त्या दूर तिकडच्या अफगाण प्रांताचा आणि आपला काय संबध हा जर प्रश्न तुमच्या मनाक आला असेल तर काही प्रश्नांची उत्तरं आज समजून घेतलीत तर भविष्यातल्या अनेक प्रश्नांबाबत तुम्ही गोंधळणार नाहीत.. अफगाणिस्थान हे नाव ऐकल्यानंतर खुदा गवाह आठवतो.. काबुलीवाला आठवतो.. अफगाणी हिंगे.. पिस्ते बदाम.. सगळ आठवत जाते.. आणि त्याचवेळी पानिपत आणि याच अफगाणमधनं आलेला अहमदशहा अब्दालीही आठवत जातो.. या अफगाणस्थानची आणि भारतीय इतिहासाची एक वेगळी ओळख आहे.  अफगाण हे नाव मूळ संस्कृत ‘अश्वकन’ ह्या नावावरून आलेले आहे, असे काही भाषातज्ज्ञ मानतात. हे अश्वकन म्हणजे घोडे बाळगणारे, घोडेस्वारीत निष्णात असे लोक! त्या लोकांचे घोडेस्वारीचे कौशल्य फार उत्तम दर्जाचे होते असे मानले जाते. ह्या भागाचे उल्लेख थेट रामायणापासून सापडतात. श्रीरामाचा धाकटा भाऊ भरत ह्याचे दोन मुलगे तक्ष आणि पुष्कल या दोघांनी सिंधू नदीच्या दोन्ही तिरांना आपापली नगरे स्थापन केली. पूर्व तिरावर मोठ्या मुलाने ‘तक्षशिला’ आणि धाकट्याने पश्चिम तिरावर ‘पुष्कलावती’. ही दोन्ही अतिशय सुंदर आणि प्रगत नगरे होती, हे अनेक ग्रीक इतिहासकारांनी नोंदवून ठेवले आहे.
गांधार पासून.. ते स्वातच्या खोऱ्यापर्यंत आणि पाणिनीपासून ते आर्य चाणक्यपर्यंत अनेक गोष्टींचा संबध असणारा अफगाणिस्थान हा सुजलाम राहिलाच पाहिजे.  

आपण जर नकाशा पाहिला, तर लक्षात येते की अफगाणिस्थानची उत्तर सीमा रशियाला चिकटलेली होती. (अर्थात 1989 साली रशियन सोव्हिएत संघराज्याची शकले उडाल्यानंतर तिथे उझबेकिस्तान, ताजिकिस्तान असे स्वतंत्र देश अस्तित्वात आले आहेत.) त्यामुळे ब्रिटिश जेव्हा भारतात सत्तेवर होते, तेव्हा त्यांना कायम अशी भीती असे की रशियन सैन्य उत्तरेकडून अफगाणिस्तानवर आक्रमण करेल आणि त्यातून ब्रिटिशांच्या भारतीय साम्राज्याला धोका उत्पन्न होईल. ते टाळण्यासाठी ब्रिटिशांनी स्वत:च अफगाणिस्तानवर आक्रमण केले, पण एकूण 3 स्वार्‍यांत त्यांचा दारुण पराभव झाला आणि त्यांच्या लक्षात आले की अफगाणिस्थानवर राज्य करणे फार कठीण आहे. त्यामुळे त्यानंतर त्यांनी अफगाण राजाशी कायम सलोखा ठेवून मित्रत्वाचा करार केला. 
शिवाय 1893 साली त्यांनी ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान ह्यांच्यामधील सीमा निश्चित करून एक आभासी सीमारेखा ठरवण्यात आली. त्यात बराचसा अफगाण प्रदेश हा तेव्हाच्या भारतात आणि आत्ताच्या पाकिस्तानात ओढून घेतलेला आहे. त्यातच पुष्कलावती ही गांधार राज्याची जुनी राजधानी अफगाण प्रदेशातून बाहेर काढण्यात आली. ही सीमा ठरवताना ब्रिटिश अधिकारी मॉर्टीमर ड्युरांड ह्याने वाटाघाटी केल्या होत्या, त्यामुळे त्याच्या नावावर तिचे नाव ‘ड्युरांड लाइन’ असे ठेवले आहे. ही 2670 किलोमीटर्स लांब रेषा अफगाणिस्तानला अजिबात मंजूर नाही. शिवाय ह्या रेषेच्या दोन्ही बाजूंना अफगाण पश्तुन, म्हणजे पठाण हेच लोक राहतात, त्यामुळे ते ही सीमा जुमानतच नाहीत! ह्याच कारणांमुळे अफगाण आणि पाकिस्तान हे कधीच एकमेकांचे मित्र होऊ शकत नाहीत! ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे.

आता समजून घेऊया की आज अफगाणमध्ये काय चाललय.. अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहे. अर्थात या सगळ्या परिस्थितीत अफगाणिस्थानमधून समोर येणारी महिला, तरुण पिढी यांची आजची परिस्थिती आणि तालीबानने सत्ता उलथवल्यानंतर ते मांडत असलेली भूमिका यात प्रचंड तफावत आहे. 

तालीबानीच्या दाव्यानुसार महिलांना कामावरही जाऊ दिले जाणार आणि मंत्रिमंडळातही स्थान असेल... तर मग प्रश्न हा निर्माण होतोय की खरी तालीबान म्हणजे नेमकं कोण.. कारण हेच तालिबान आहे जे म्हणते की त्याना काश्मीरबाबत भारताची भूमिका मान्य आहे, आणि हेच तालिबान आहेत जे म्हणतात की आम्ही दहशतावादाला ही भुमी देणार नाही... अर्थात तालीबानच्या या भुमिकेनिमित्त दिवसेंदिवस गोंधळ वाढत चाललाय. अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा तालिबानचा  कब्जा झाला आहे. अफगाणिस्तानचे नाव बदलून आता इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान असे केले जाऊ शकते. तालिबानच्या २० वर्षांच्या कारकिर्दीचा अनुभव लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत चिंता वाढली आहे. तालिबान पूर्वीप्रमाणेच क्रूरपणे शासन चालवते की काय अशीच भीती सर्वत्र व्यक्त करण्यात येते आहे. तालिबानच्या राजवटीत लोकशाही मूल्ये आणि मानवाधिकार यांना अजिबात स्थान नाही. २००१ मध्ये तालिबानची राजवट संपल्यानंतर भारताने अफगाणिस्तानबरोबर नव्याने संबंध स्थापित करत ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. 

ही जी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक भारताने केलीय तीच सगळ्यात अगोदर काय आहे ती समजून घ्या. अफगाणिस्तानातील हेरात प्रांतांत सलमा धरण हे एक जलविद्युत योजना आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.हे धरण बांधण्यासाठी भारताने २७.५ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

दुसरी गुंतवणूक आहे.. भारताच्या बॉर्डर रोड आर्गनायझेशनने २१८ किमी लांबीच्या जरांज-डेलाराम महामार्गाची बांधणी केली आहे. हा महामार्ग अफगाणिस्तान-इराण बॉर्डर परिसरात आहे. हा महामार्ग ३०० भारतीय इंजिनियर्स आणि मजूरांनी अफगाण लोकांबरोबर मिळून तयार केला होता. 

तिसरी गुंतवणूक म्हणजे.. अफगाणिस्तान संसद भवन भारताने २०१५ मध्ये अफगाणिस्तानच्या संसदेचे बांधकाम पूर्ण केले होते. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. अफगाण संसद भवनाच्या निर्मितीसाठी ९ कोटी डॉलरचा खर्च झाला होता. . 
चौथी गुंतवणूक म्हणजे,  स्टोअर महल... या ऐतिहासिक महालाची पुनर्निर्मिती २०१६ मध्ये भारताने केली होती. या महालात १९१९ मध्ये ऐतिहासिक रावलपिंडी करार झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाले होते. या नवीन महालाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे तक्रालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी केले होते.

पाचवी गुंतवणूक म्हणजे  इंदिरा गांधी इन्स्टिट्युट फॉर चाइल्ड हेल्थ.. भारताने १९७१ मध्ये बनवलेल्या 'इंदिरा गांधी इन्स्टिट्युट फॉर चाइल्ड हेल्थ' या हॉस्पिटलला १९९६ मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर पाडण्यात आले होते. मात्र पुन्हा २००१ मध्ये तालिबान्यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर त्या हॉस्पिटलला भारताने पुन्हा बांधून दिले होते. २००७ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. काबुलमध्ये असलेले हे हॉस्पिटल लहान मुलांसाठीचे अफगाणिस्तानातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. 

सहावी गुंतवणूक म्हणजे भारताच्य मदतीने सुरु असलेला काबूलमधील शहतूत धरण प्रकल्प. यामुळे अफगाणिस्तानातील २० लाख लोकांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. शिवाय जवळपास ८ कोटी डॉलरच्या सामुदायिक विकास प्रोजेक्टची निर्मितीदेखील भारत करतो आहे.
जवळ जवळ तीन अब्ज डॉलर गुंतवणूक असणाऱ्या राष्ट्रावर आता तालीबानी कब्जा आलाय. अर्थात या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक विधान आहे.. गुड तालीबानी आणि बॅड तालीबानी असे कधीच नसते.. ते फक्त तालीबानी असतात.. ते आज पुन्हा मोदी सरकारने, राज्य सरकारने आणि आपण प्रत्येकानेच लक्षात ठेवलं पाहिजे..  खरतर अमेरिका आणि त्यांच्या नाटो सहकाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना प्रशिक्षण देण्यासाठी कोट्यावधी डॉलर खर्च केले आहेत, मात्र तरीही पश्चिमेचे समर्थन असलेले सरकार भ्रष्टाचारात बुडाले. अफगाणिस्तानच्या कमांडरनी संसाधने लुटण्यासाठी सैनिकांची संख्या वाढवून दाखवली आणि जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा सैनिकांकडे दारूगोळा आणि खाण्यापिण्याचे जिन्नसही कमी पडले. ज्याची परिणती त्यांच्या पराभवात झाली. 
गेल्या महिन्यात जुलैच्या पहिल्या आठवडय़ात अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जाहीर भाष्य करताना हा देश पुन्हा तालिबान्यांच्या ताब्यात जाईल ही शक्यता नाकारत आम्ही अमेरिका असल्याचे म्हटलं होतं. . त्यानंतर महिनाभरात १४ ऑगस्टच्या रात्री संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा झेंडा फडकलेला पाहताना आपल्या भूमिकेचे समर्थन करण्याची वेळ बायडेन यांच्यावर आली. सुमारे दोन दशके, ८३०० कोटी डॉलर्स आणि २५०० हून अधिकांचे प्राण अफगाणिस्तानच्या रणरणटात घालवून आपण काय मिळवले या प्रश्नास अमेरिकेत आता प्राधान्याने तोंड फुटले असून जे काही सुरू आहे त्यापासून हात झटकण्याची सोय अध्यक्ष बायडेन यांना नाही.
आज तालीबानच्या निमित्ताने तालीबान विरुद्ध अफगाण अशा लढाईत भारतातही राजकारणाचा वापर करण्यात येण्यात येतोय. अफगाणीचे जुलूम दाखवून उत्तर प्रदेशची तयारी सुरु झालीय अशाही राजकीय टिप्पणी आता सोशल मिडीयावर सुरु झालीय. अर्थात चर्चा अनेक सुरु झाल्या आहेत.  तालिबानच्या राज्यामुळे जगातल्या विविध दहशतवादी संघटनांना खतपाणी मिळेल. सुरवातीच्या पाच ते सहा महिन्यात तालिबान स्वतःची ताकद वाढविण्यावर भर देईल. तसेच येत्या काळात अफू, चरस, गांजा सारख्या आम्ली पदार्थांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.. या सगळ्याला आता ड्रग्ज , स्लीपर सेल आणि अगदी काश्मीरपर्यंत सगळ्याच गोष्टीला अटकाव करण्याची गरज आहे.. 

पण या सगळ्यात ही लढाई धर्माची आहे की प्रांताची आहे ठाऊक नाही.. पण एक नक्की ही एक प्रांत मिळवण्यासाठी अनेकांच्या जीवाला भय निर्माण करणारी नक्की आहे.. याच दरम्यान एक बातमी आहे, काबूलच्या रतननाथ मंदिराच्या पुजाऱ्यांची.. या मंदिराचे पुजारी पंडित राजेश कुमार यांनी मंदिर सोडण्यास नकार दिलाय.. हिंदुचे काबुलमध्ये उरलेले ते एकमेव मंदिर आहे. तालीबान्याकडून मृत्यू आला तरी देश सोडणार नाही.. मुळात त्या कट्टरतावादांना हा कडवट श्रद्धाभाव किती कळेल हा प्रश्न आहे. पण राजेश कुमार यांचे तिथे असणे हेच आता तालीबानची जगातील ओळख असणार आहे. कारण तालीबानी या अगोदर अनेक मुर्तीवर बॉम्बस्फोट करुनही विचार जिवंतच आहे.. आता वेळ तालीबानची आहे.. त्याने राज्य मिळवलय मग सिद्ध करा की तुमचा हेतू प्रामाणिक आहे.. कारण दहशतवादाने कब्जा करतो येतो, जिंकता मात्र  कधीच येत नाही..

- ऋषी देसाई 

Comments