कशासाठी आठवायचं नेहरूंना ?


आज १४ नोव्हेंबर 
हा दिवस  खूप महत्त्वाचा आहे

पहिले कारण जवळचे आहे.. बालदिन आपण खूप लहान आहोत हे स्वतःला पटवून द्यायला

आणि दुसरे कारण सध्या जवळचे आहे , आपण अजूनही खूपच लहान आहोत हे स्वतःला पटवून जगाला सांगायला

दोन्ही कारणातील फरक कदाचित समजणार नाही

असो , पण आज नेहरूंचा वाढदिवस

पण सुरुवातीला तुम्ही ज्यांना देव समजता ना त्या पंडित नेहरूंवर केलेली ही टीका वाचा

"ज्यात अभिनयाचा लवलेश जाणवत नाही तोच अत्यंत जिवंत अभिनय होय. चेहऱ्याला रंग बिंग न फासता करावयाच्या अभिनयात नेहरू वाकबगार आहेत. या त्यांच्या मुखवट्यामागे दडलेय तरी काय ? कोणती सत्ताकांक्षा दबा धरून बसलीय? भारतवर्षाचे भरभरून भले करण्याची किंवा त्याची प्रचंड हानी करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे.

त्यांच्या अंगी देशासाठी अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे कार्य करण्याची कितीही क्षमता असो , जवाहरलालसारखे नेते लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक असतात . जवाहरलाल स्वत:ला  लोकशाही समाजवादी म्हणवतात आणि याबाबतच्या त्यांच्या प्रामाणिकपणावर मुळीच शंका घेता येणार नाही . 

पण प्रत्येक मानसशास्त्रज्ञ हे जाणतोच की मन हे शेवटी अंतर्मनाच्या आधीन असते . प्रचंड लोकप्रियता, दुर्दम्य इच्छाशक्ती, क्षमता, ताठरता, इतरांबद्दलच्या समंजस
वृत्तीचा अभाव आणि सामर्थ्यहीन अकार्यक्षम लोकांबद्दलची काहीशी तुच्छता - अशी हुकुमशहा बनण्याची सारी बीजे जवाहरलालांच्या व्यक्तित्वात ठासून भरलीत . 

या क्रांतीप्रवण कालखंडात सीझरशाही सतत आपल्या दाराशीच उभी असते. जवाहरलालच्या मनात सीझरबनण्याचे स्वप्न फुलत असणे अशक्य थोडेच आहे ?.. त्यांना आवर घातला पाहिजे . या देशाला सीझर नको म्हणजे नकोच."

देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळा देश नेहरूंच्या प्रेमात पडला होता. विरोधक तर कुणी उरलाच नव्हता. अशावेळी एक पत्रकार सातत्याने पंडित नेहरूंवर टीका करायचा. नेहरूंच्या प्रत्येक धोरणावर तो पत्रकार टीका करायचा..

पंतप्रधानावर टीका करताना त्या पदावर पंडित नेहरू बसले आहेत याची मुळीच तमा करायचा नाही.. प्रत्येक धोरणावर आणि प्रत्येक गोष्टीवर तो एकटा टीका करायचा.. 

कोण होता हा पत्रकार ? देशात कुणालाच सापडला नाही.चाणक्य नावाने लिखाण करायचा. बऱ्याच काळा नंतर time magzine या चाणक्य मुखवट्यामागचा चेहरा उघड केला.

चाणक्य या नावाने देशाचे पंतप्रधान पंडित नेहरूंवर टीका करणारा तो माणूस होता, स्वतः जवाहरलाल मोतीलाल नेहरू!

आज आपण सरसकट कुणालाही चाणक्य म्हणतोय, चाणक्य बनायला अगोदर पंडित नेहरू तरी बनावे लागेल ना, असो...

आपण अजूनही लहान आहोत, लहान असताना मी असा दिसायचो, आता किती बदललोय अशा प्रयत्नात असणाऱ्या आपल्या सर्वांना स्वतावर जाहीर टीका करण्याची हिंमत मिळो , एवढ्याच या बालदिनाच्या शुभेच्छा !!


( लेख कळला नाही तर परत वाचा, लेख नाही समजला तरी चालेल पण नेहरू समजले पाहिजेत बस्स.. )

Comments