टीई

आज 21 नोव्हेंबर


प्रत्येक दिवस आपल्यासोबत एका नव्या दिनाची नोंद करतो.. आजचा दिवस खूप खास आहे..
आज माहीत आहे का किती दिवस आहेत..

#World_Fisheries_day
#StuffingDay
#BeaujolaisDay
#GingerbreadCookieDay
#WorldPancreaticCancerDay
#GreatAmericanSmokeout
#PhilosophyDay
#RuralHealthDay
#AlascattaloDay
#UseLessStuffDay

आणि ही यादी इथेच नाही थांबत, आज आणखी एक दिवस महत्वाचा आहे 

#worldtelevisionday

दूरदर्शन , टीव्ही आणि जगणं.. कधीकाळी वक्तृत्व स्पर्धेत 'दूरदर्शन शाप की वरदान' हा  विषय असो की, आज 'टीव्ही : सूत्र होया की मंगळसूत्र होया?'  एवढया पर्यंत जगण्याचा मरण्याचा झालाय.. 

सलोरा, क्राऊन असे अगदी रामायण सुरू होताना घरात पहिला टीव्ही आला. ते लाकडाचा दरवाजा असलेलं टीव्ही हे फार आकर्षण होते. त्यात रामायण, महाभारत, शक्तिमान, चंद्रकांता अशी आयुष्यात फॅन्टसी येत गेली. टीव्हीचा अँटिना म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट वाटायची. एक माणूस छपरावर अँटेना सेट करायचा, आणि खाली घरातल्या माणसाने फक्त "इला इला.. गेला गेला" एवढीच बोंब मारायची.. शनिवार रविवार चे चित्रपट आणि रंगोली यात आयुष्य नावाची गोष्ट टीव्ही ने जखडून ठेवली होती. टीव्हीला असणारे दहा बारा खटके आणि उगाच त्या मुंगळ्या मुंगळ्यात आपल्याला चित्र दिसल्याचा साक्षात्कार व्हायचा.. पीटीव्ही, डीडी टेन, मेट्रो या गोष्टी दिसल्यावर जो आनंद व्हायचा ना, तो ते क्षण पाहिलेल्याना समजेल..

त्यानंतर मोठे डिश, छोटे डिश यामुळे अँटिना अडगळीत गेले आणि टीव्हीच्या जागाही छोट्या बनल्या.. टेबलावरचा टीव्ही भिंतीला अडकला आणि बिचाऱ्या मांजराची टीव्हीवर झोपायची उबेची जागाही हरवली. आणि बिचारा रिमोट मात्र आपटून आपटून मार खातोय!

आता टीव्ही खूप स्वस्त झालेत आणि हो खूप महागडेही मिळतात.. पण टीव्हीची जागा सध्या तरी कुणीच घेऊ शकत नाही.. अगदी सूत्र या शब्दाचा कितीही राग आला तरी. सोयीचे राजकारण आणि राजकारणाची सोय या सगळ्यात टीव्ही एक माध्यम बनत गेलाय. टीव्हीची एक गोष्ट आहे, तुमच्या मनातलं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं थांबत नाही. 

लॉकडावूनच्या काळात रामायण पुन्हा प्रक्षेपित होणे हा केवळ धार्मिक भाग नव्हता तर अजूनही रंजकपणा डोक्यात सैतानाला आणू देत नाही ही त्यातली गोष्ट होती. खेळ, चित्रपट, सिरीयल , गाणी आणि बातम्या एवढी जर ढोबळ विभागणी केली तर आपल्या रंजकपणाची गोष्ट आपल्याला समजत जाईल. आज टीव्ही मोबाईलवर आलाय, पण टीव्ही टीव्हीच आहे. 

आमच्यासाठी ते जगणं असलं तरी तुम्ही ते जगणं म्हणून नका स्वीकारु.. त्याला टीव्ही म्हणूनच राहू द्या.. हवा तेव्हा बंद करता येणारा !

ऋषी श्रीकांत देसाई

Comments