द्वारीचिये देव उभा क्षणभरी


मालवणच्या श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायणची नगर परिक्रमा हा आता वर्षातून आठवणीने लेख लिहायचा कुळाचार बनलाय. आपले देव, आपलं गाव आपली माती आपण मस्तकी धरुन हलकल्लोळ माजवायचा नाही तर कोणी माजवायचा ? गाव, सण सोहळे हेच तर जगण्याचे कुबेरधन आहे. ज्यांच्या वाट्याला गाव नाही त्यांना देवघरातल्या टाकाना पूजत, चंदनाच्या सहाणेवर उगाळत आणि शहरातल्या पाडवा शोभायात्रेमध्ये स्वतःला मिरवत राहणे एका बाजूला आणि  एका बाजूला गावच्या ग्रामदैवताच्या  पालखीसमोर दोन सेकंद स्तब्ध उभं राहणं यात आहे.

आजपर्यंत पाहिलेली पालखी आणि यंदाची वाजत गाजत होणारी नगरपरिक्रमा हा विषय म्हणजे स्वतःमध्ये एक अवसाराचा विषय आहे. कोविड कितीही मान्य असलं ना तरी श्रीदेव रामेश्वर श्रीदेव नारायण हा आमचा भाग्यविधाता आहे हे एकदा मान्य केलं की आयुष्यात सगळं सगळं मिळत जातं. ग्रामदैवत म्हणजे नवसाला पावणारी , कौल देणारी असतील कदाचित पण श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या समोर तुम्ही मागायला काहीच जात नाही. उलट मिळाल्यावर आठवणीने न मागताही मिळालंय ते फक्त तुझ्यामुळे हे सांगायला जाणारी माणसे कैक आहेत..


कोकणातल्या जत्रा म्हणजे उत्साहाचे दुसरे नाव असते.. अर्थात गावांची गंमत असते हो, आम्ही शहर संस्कृतीमधील जे गाववाले आहोत ना त्यांना या देवसंस्कृतीने गावपण दिलय. दिवाळीत पाडव्याला निघणाऱ्या ग्रामदेवतेची नगर परिक्रमा यंदा सोहळा म्हणून नसला तरी मनातला उत्साह म्हणून तशीच दिमाखदार आहे
मागच्या वर्षी देऊळ बंद होते तेव्हा स्वामी भेटायला आले होते ही देऊळ बंदची गोष्ट मालवण जगलाय , आणि यंदा पुन्हा न्यू नॉर्मल झालंय त्याचीही एक वेगळी गोष्ट आहे..,जत्रेच्या निमित्ताने  मालवणवाले जे सुख अनुभवतो ना त्याची तुलना केवळ त्रैलोक्यसुखांशी होऊ शकते. आमचा देव आम्हाला आशीर्वाद द्यायला गाभाऱ्यात थांबत नाही पाडव्याला शहरभर फिरतो. नुसता फिरत नाही तर शहरात मध्यवर्ती मांडावर स्वतःचा दरबार भरवतो. ३६४ दिवस अचल असणारे आणि पाडव्याला चल बनणारे देवत्व पाहायला जेव्हा रांगा लागतात ना तेव्हा मी सगळं मनापासून का बोलतो याची जाणीव होते.

नगर परिक्रमेचा प्रत्येक मालवणवासियांचा आनंद हा अफाट असतो, फरक फक्त एवढाच असतो की आम्ही हे फक्त शब्दात मांडू शकतो.. पण कधीतरी मालवणच्या आजच्या दिवशी फक्त पहायला या, संध्याकाळी सहानंतरचा प्रत्येक क्षण नात्यांचे नवे कनेक्शन उलगडत जाते. गर्दीत उंचावलेला हात तुमचं विदाऊट जीपीआरएस परफेक्ट लोकेशन सांगतं. बाजार जत्रा म्हणजे खिशातले पैसे संपतात असा ज्यांचा समज आहे त्यांनीही पूर्णपणे भरलेला बाजार असूनही खिशाला कात्री न लागताही जत्राही मजेची, आनंदाची आणि आपल्या माणसांना वेळ देण्याचीही असते या सगळ्या गोष्टी उलगडणा-या ठरतात. या सगळ्या गोष्टी यंदा नसल्या तरी त्या चिरंतन नक्की राहतील !

आज कोविडच्या न्यू नॉर्मल मुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. फिजिकल डीस्टन्स असलं तरी सोशल डिस्टन्सची किंमत या आनंदमेळ्यात नक्की समजेल. यंदाचा हा जो क्षणसोहळा असेल जो मागच्या वर्षी बाजारात जत्रेचा प्रसाद म्हणून  आणायचे राहून गेलेल्या सुतारफेणीच्या प्रसादाचा आणि  पालखी येतेय म्हणून चिमुरड्या पोरांनी वाळूत उभारलेल्या किल्ल्याचा आणि त्याच्या समोरच्या आपल्या वाळूच्या शहराच्या रेखीव स्वप्नांचा !  


ऋषी श्रीकांत देसाई
मालवण

Comments

  1. आजच्या शुभ दिनी देवाच्या नगरपरासरातील परिक्रमणामुळे येथील अंधकार दूर होतो व परिसर दिव्यांनी स्वच्छ शुभ्र प्रकाशित होतो.

    ReplyDelete
  2. खुप सुंदर,
    मालवण मधील पालखी सोहळा वैशिष्ट्यपुर्ण आहे हे निश्चित .,..🙏

    ReplyDelete

Post a Comment