जय भीम

या क्षणाला भारतात दोनच जाती आहेत. एकतर तुम्ही जयभीम पाहणारे आहात किंवा तुम्हाला जय भीम बद्दल काहीच माहीत नाही असे आहात. जय भीम हा ओटीटी वरचा सुपरस्टार सुर्याचा सिनेमा आहे. नाव जयभीम असले तरी कथा प्रचंड वेगळी आहे. जात ही फक्त माणसातच असते अशातला भाग नाही, ती सगळ्या गोष्टीत भारी आणि हलकी अशी विभागलेली असते.

जय भीमचे वैशिष्ट्य हे आहे की तो अक्षय कुमार टाईप जॉली एल एलबी2 नाही बनलाय की तो बेनेगल टाईप बनलाय.. तो सिनेमा जसा हवा होता तसा बनलाय.. सबकुछ सूर्या असणाऱ्या या सिनेमात नायक कोणी वेगळाच आहे.

नाव जय भीमच का या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसले तरी ज्यावेळी कार्ल मार्क्स, लेनिन , पेरियार जाणवत राहतात त्यावेळी त्या सगळ्यांचा उच्चार हा फक्त जय भीमच असू शकतो..

"मै जब पैदा हुआ तो वकील नही था, इंसांन ही पैदा हुआ था" हा एकच डायलॉग मला सणकन आपटून गेलाय.. बाकी सिनेमा का बघावा याचे एकमेव कारण "शिका, लढा, संघर्ष करा" हेच आहे !

बाकी हा सिनेमा म्हणजे ओटीटीची खरी ताकद आहे..न्यायात एक फार मोठी ताकद असते, जी तुम्हाला सत्याचा आग्रह करायला शिकवते. आऊटडोअर आणि इनडोअर असणाऱ्या या गोष्टीत सुर्याने स्वतःला मोठं केलं नाहीय, त्याने ती वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवलीय. 

"साहेब ती जात गुन्हेगार आहे" याला उत्तर "कुठल्या जातीत गुन्हेगार नाहीय?" या शब्दात दिले जाते तेव्हा तुम्ही कुणाचेच वकीलपत्र नाही घेऊ शकत. हा सिनेमा तुम्हाला बाबासाहेब दाखवत नाही, पण आज बाबासाहेब नसते तर जगण्यातील भयाणता किती विषम बनली असती हे सांगतो. चित्रपट माध्यम म्हणून सैराट जे शेवटच्या फ्रेमल करतो ते जय भीम पहिल्या फ्रेमपासून करत सुटलाय. 

मुळात सुर्या तोच अभिनेता आहे ज्याने पोलिसांना सिंघम बनवले आणि तोच सुर्या आज न्याय व्यवस्थेतल्या वकिलांना सिंघम बनवतोय. जाती व्यवस्थेतली अराजकता हा ट्रेंड आता साऊथने पकडलाय. मारी सेल्वराजचा 'कर्णन'  असो की अश्विनचा  'मंडेला' असो. साऊथ चित्रसृष्टी आता साध्या गोष्टीतले सोने शोधतेय.ही गोष्ट फक्त सेंगेनी आणि राजकंनू पुरती मर्यादित नाहीय. ती स्वातंत्र्यापासून चोर ठरवलेल्या आणि न्याय होण्यापूर्वी गुन्हेगार ठरवून त्याचे शोषण झालेल्या एका घटकांची गोष्ट आहे.. ही गोष्ट थांबणे कठीण आहे पण अशक्य मुळीच नाही.

जय भीम त्या प्रवासाची सुरुवात आहे.. 

Comments

  1. या लोकांजवळ जिद्द ,चिकाटी ,नैसर्गिक ज्ञान ,मेहनत करण्याची तयारी असते.पण ....शिक्षणाचा अभाव व त्याचे महत्व याना कोण पटवून देणार नसत व हे लोक ते पटवून घेत नाहित याचे परिणाम .स्वार्थी माणसे टपलेली आहेतच निराधार लोकांचा फायदा घ्यायला.
    नाहितर सर्व सामान्य सुशिक्षीत माणसांपेक्षा खूप काही करू शकतात..

    ReplyDelete
  2. या चित्रपटामुळे काही "so called" लोकांच्या पोटात आणि गोटात आग लागली एवढं मात्र नक्की

    ReplyDelete

Post a Comment