लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आजचा दिवस हा आभाळाच्या माटवाला सोन्याच्या पताका लावण्याचा आणि जमिनीवर केशरपाण्याच्या सड्याचा आहे. या मातीतला एक लोककलावंत आज पद्मश्री प्राप्त झाला. हाताच्या बोटावर नाचवणाऱ्या सोंगानी आज त्याच हातात मानाचे पान दिलंय. क्षण मोठा भाग्याचा आहे.. ज्या लाल तांबड्या मातीने गावच्या पिंपळपारांचा रंगमंच दिला, पेट्रोमॅक्स प्रकाशाची झगमगती दुनिया दिली, ताटाकाठीने नाद दिला,  मागच्या कैकपिढीने वारस म्हणून रंध्रारंध्रात कला दिली आणि बोटांवर साक्षात गणराय दिला.. त्या सगळ्या प्रवासाचे औक्षण झाले  तळपायावरच्या रेघांचे सुवर्णपाऊल झाले.


कळसूत्री, चित्रकथी ,  पोतराज, वाद्यगोंधळ, डोना, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल..एकामागून एक फक्त पाने उलटवत जायची. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचा कलांची यादी संपता संपणार नाही.. खरे तुमच्या बद्दल बोलायचे तर आम्हालाच त्या थाळीवर काठी फिरवत लागेल, आणि उमटणारा प्रत्येक बोल तुमची कलाकथा सांगेल!!  आज गंगावणे यांच्या निमित्ताने आज आमची ओळख पद्मश्रीचा जिल्हा झालीय याचा अभिमान आहे !
मुळात टीव्हीवरच्या माणसाला टीव्ही पाहणे यात काहीच नवखेपण नाहीय, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मानबिंदू जेव्हा हिंदुस्तानच्या आभाळात ध्रुवतारा बनतों ना तेव्हा ती आमच्यासाठी पिढ्यानपिढ्याची दिवाळी होते. परशुराम १२ वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले. तेव्हापासून या कलेचे जतन करण्याचा निर्धार त्यांनी केला आणि गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ तो पाळलाही! हा निर्धार तडीला नेणे सोपे नव्हते. अनेकदा खायची भ्रांत पडली; हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या; अवहेलनाही सोसावी लागली. वीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात पाय जायबंदी झाला. तरीही या कलेवरची त्यांची निष्ठा अजिबात ढळली नाही. मात्र, आज एवढ्या वर्षांनी त्यांच्या तपश्चर्येला फळ आले आहे. आम्ही काल फक्त पाहत होतो, आज भारावलेल्या डोळ्यांनी पाहतोय !
परशुराम गंगावणे पिंगुळी ही कालपर्यंत फक्त तुमची ओळख होती, पण आज परशुराम गंगावणे, पद्मश्री पुरस्कार भारत ही आता आमची ओळख बनलीय.. आम्ही गंगावणेच्या गावची ही ओळख आम्हाला देशात आता मिरवायची आहे. त्या परशुरामाने समुद्र हटवून कोकण निर्माण केला , आज पुन्हा एक परशुरामाने आभाळ हटवून ध्रुवाची गोष्ट  पुन्हा ओंजळीत आणून दिलीय !!

तुमच्या निमित्ताने ठाकर समाजाला, आणि अठरापगड जमातीने समृद्ध केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कलासंस्कृतीला पुन्हा एकदा मानाचा मुजरा !

"Sir padamshree parshuram gangavane, thank you very much !!
 
आपला ऋणाईत

ऋषी श्रीकांत देसाई

Comments

  1. सररर सॅल्युट🙏

    ReplyDelete
  2. अभिमानास्पद 🙏

    ReplyDelete
  3. कौतुकास्पद यथोचित सन्मान ! आम्हा सिंधुदूर्ग वासियांना अभिमान आहे.

    ReplyDelete
  4. Khup sundar. Sindhudurg chi shaan Padmashri Parshuram Gangawane sir🙏hats off.

    ReplyDelete
  5. ब्लॉग च्या नावाइतक्याच समृद्ध लिखाण.त्यांच्यामुळेच गौरावांवित सिंधुदुर्ग❤️❤️

    ReplyDelete

Post a Comment