अंधाराच्या लामणवाती


आता हळूहळू बार्शीमधल्या विशाल फटेची गोष्ट आता राज्यभर झालीय. गंडा घालणाऱ्याच्या गोष्टी ह्या नेहमी अलिफ लैला सारख्या दर वेळी सुरस आणि चमत्कारिक असतात.. ज्यांनी भोगलय त्याना दिवस जगू देत नाही आणि रात्र मरु देत नाही.. याच खेळात जे तीरावर राहून टाळ्या वाजवणाऱ्या नवनवी गोष्ट शोधत राहतात.. कोण कितीही भिकेला लागलं तरी त्याना फक्त एंटरटेनमेंट हवं असते.

विशाल फटे याने बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेकांची कोट्यवधी रूपयांची  फसवणूक केली आहे. यशवंतराव ची 11 वि पास पदवी असतानाही आपण आयटी  इंजिनीयर असून एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतल्याची तो सॉलिड बतावणी करायचा. त्याच्या बोलण्याला बरोबर सगळे भुलले..त्यात विशालचे इंग्रजी भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. त्यामुळे तो अनेकांना हुशार वाटायचा. लोक त्याच्या बोलण्यावरूनच त्याच्यावर विश्वास ठेवायचे. 

विशाल हा गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून अमिष दाखवत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. 'एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली 6 हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील' अशी ऑफर दिल्यानंतर अनेक जणांना धक्काच बसला. त्यामुळे त्याच्याकडे अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. आणि इथेच विशालने अनेकांचा बाजार उठवला..

आणि यात त्यांनी बकरा बनवला स्वतःच्या मित्रांना.. अगदी सख्या भावाप्रमाणे विशालचे मित्र त्याला वागणूक देत होते. विशालने याच विश्वासाचा फायदा घेत अनेक मित्रांचे अकाऊंट वापरले. गुंतवणुकदारांना मित्राच्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगायचे. मित्रांकडून चेक घेऊन ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग तो करत होता. फरार होण्याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने एका मित्राच्या अकाऊंटवर जवळपास 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. नंतर चेकद्वारे त्याने ते काढून देखील घेतले. आज विशालचे मित्र धाय मोकलून रडतायत..विशालच्या आईबाबांना पोलिसांना चौकशीसाठी सह आरोपी केलेयत..

अनेक वाहिन्यांनावर शेअर कार्यक्रमात विशाल खूप झळकायचा.  धक्कादायक बाब म्हणजे 27 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विशालला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता. 

चूक विशालची तरी कशी म्हणायची ? शेअर बाजारचे स्वप्नच भन्नाट असते. दोन दिवस वाहवा नंतर आयवा ! सुर्या इंटरप्रायझेस सारख्याने तर कुकर आणि स्टीलचे डबे दाखवून विस्कळीत झालेले संसार माझ्या गावच्या लहानपणी मी पाहिले आहे.. दिवसेंदिवस बायका त्या पायरीवर बसायच्या, पण बंद झालेली दार काही उघडलीच नाही.. 


भुदरगड, पिग्मी, पिअरलेस अशा खूप नावाने फिरणारी चमचमती दुनिया, त्यांच्या त्या गाड्या सगळं सगळं पाहिलंय.. आणि कंपनी पळून गेल्यावर एजंटच्या घरादारावरच्या ठाकठाक आवाजही तितक्यात शांत एकलाय.. वर्षामागून वर्ष उलटली आज मोह शेअर बाजार बनून आजू बाजूला उड्या मारतोय.. ज्यांना कळत नाही ते बरोबर फसतात अडकतात आणि गुरफटून संपून जातात..

पैशाचा मोह वाईट की चांगला हा वाद पेड दर्शनाच्या रांगेवाल्या देवाला तरी सांगून काय उपयोग आहे. कोण तरी मारीच तुमच्या नशिबात लिहिलाच आहे तो तुम्हाला ओढून नेत राहणार...घराबाहेर काढून तुमच्या मोहापायी तुमचे घरदार खाक करणाऱ्या टोळ्या हरीण बनून वाघांना  आयुष्यातुन उठवतायत ! वाघनखे विकायची सोडा पापण्याचे केसही विक्रीस काढतील अशी ही हरणे जीवघेणी बनलीयत..

हा खेळ संपणारा नाहीय, शेअरचा बैल दाखवून तुम्हाला भिकेला लावतील... अर्थात ज्यांचे आयुष्य गेलंय ते मात्र हरिणालाही वाघ बनवतायत, कारण त्यांना पैसा खरंच कळलाय.. आणि ज्यांना पैसा नाही समजलाय ते तुमच्यासाठी काळोख सजवायला दूर कुठेतरी अंधाराच्या वाती वळत बसले आहेत.. तुम्ही रेखा ओलांडली की हरणाचा राक्षस झालाच समजा !

Comments

Post a Comment