हिंदुस्थानचे अर्थविधाते मा. नारायण राणे अभिष्टचिंतनपर लेख
भारताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव उच्चारले की हल्ली लघु, सूक्ष्म आणि मध्यम असेच शब्द आपसूक येतात. मुळात नेहमीच जगण्यात विचारात लार्जर दॅन लाईफ असा विचार करणाऱ्या व्हिजनरी नेत्याला कार्यालेख हा मुळात आकाशव्यापी आहे हे एकदा समजलं की त्याचे पृथ्थकरण हे 'सुक्ष्माहुन अतिसूक्ष्म' आणि 'अथांगाहुनही व्यापक' बनत जाते.
आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा वाढदिवस.. दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. आज आपण प्रत्येकजण देत असलेल्या शुभेच्छा कोकणच्या भाग्यविधात्याला नाही तर राष्ट्राच्या अर्थविधात्याला देतोय ही समज आता निर्माण करण्याची वेळ आलीय. नारायण राणे हे नाव केवळ सिंधुदुर्गच्या राजकारणात अडकवून आपण नेहमी खूप मोठी चूक करतो.. हे नेतृत्व व्हिजनरी आहे.. आणि आपण व्हिजन आणि डीव्हीजनच्या गोंधळात अडकलोय.. आणि दादा आज देशाचे नेतृत्व करतायत ! आभाळ कवेत घेणारा हा नेता ज्याच्या त्याच्या संपर्कात आला त्याच्या ओंजळीत आभाळाचे दान देत गेला..
आज सर्वसामान्य चाकरमानी माणूस आपल्या नशिबाला कोसतो. त्या प्रत्येकाने एकदा , फक्त एकदा शिवसैनिक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षनेते ते काँग्रेस, काँग्रेस ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ते भाजप आणि भाजप खासदार ते देशाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकणारे एक राष्ट्रीय नेतृत्व हा प्रवास कसा झालाय तो एकदा समजून घ्या.. मी मनापासून सांगतो, तुमच्या अभ्यासक्रमात पाट फुटू नये म्हणून आडवा पडणाऱ्या ऋषीकुमाराची गोष्ट अभ्यासाला असेल तर समुद्र पिणाऱ्या अगस्ती ऋषींची गोष्ट तुमच्यापासून कोसो दूर आहे..
आज दादा केंद्रीय मंत्री आहेत. तमाम हिंदी आणि इंग्रजी चॅनल पाहताना दरदिवशी दरतासाला कुठल्या तरी एका राज्याच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरु असते. कामाचा प्रचंड आवाका असणारा हा माणूस ज्या तडफेने काम करतोय, त्यावरुन ह्या वयातील त्यांची तडफ ही खरच युवा नेते म्हणणाऱ्यांना लाजवणारी आहे.
फेसबुकवर दर आठवड्याला एक सर्व्हे येतो. महाराष्ट्रातल्या तमाम पक्षातल्या नेत्यांचे फोटो येतात आणि विचारतात तुमचा आवडता महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण ? आणि मग आपापल्यापरीने जो तो मत नोंदवतो. पण हे सगळं फेसबुकपुरते ठीक आहे म्हणा.. वास्तवात जर मुख्यमंत्री म्हणजे काय हे जर शिकायचे असेल तर खूप वर्ष मागे जा..
मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्या तमाम रुक्ष केबिनमधल्या आणि सरकारी कार्यालयानी नियम आणि शिस्त पालूनही सर्वसामान्य माणसाचे जिवन समृद्ध करता येते याची जाणीव करुन देणारा मुख्यमंत्री आठवेल. दुपारच्या वेळेत मंत्रालयाच्या कुठल्याही मजल्यावर जावून फाईलचे ढिग का साचले आहेत असा जाब विचारणारा मुख्यमंत्री आठवेल ! एकादशीच्या दिवशी थेट चंद्रभागेत उतरुन अवघ्या यंत्रणेला एकादशी महात्म्य आचरणात पटवून देणारा मुख्यमंत्री आठवेल ! असंख्य आठवणीच्या ठिपक्यांतून एक रांगोळी साकारली गेली.. त्यातूनच रेखाटला गेला एक चेहरा.. तो चेहरा होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. नारायणरावजी राणे !
आज दादांचा वाढदिवस.. शरीरधर्माचे पालन म्हणून ‘वय’ हा शब्द आपणच आक्रसून ठेवलाय.. अथांग कार्याला, उत्तूंग स्वप्नाला आणि एका तेजोमय ध्यासाला वय ही मर्यादा थोडीच जखडून ठेवणार ? साधारणपणे नव्वदच्या दशकांपासून संपुर्ण कोकणच्या आपला दबदबा निर्माण करणा-या दादांनी गेल्या तीन दशकात स्वप्न ही उघड्या डोळ्यांनी पाहायची असतात, आणि ती कुठल्याही परिस्थीतीत पुर्णच करायची असतात याची जणू सवयच आपल्या राजकारणाला लावलीय.. आज ती सवय केंद्रीय मंत्रीपदी कार्यरत असताना दादांना फाईल्सचा निपटारा लावताना आणि एमएसएमईचा देशभर विस्तार करताना जाणवतेय !
प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी मुठभर लोकांचा विरोध सहन करायचा, आणि आपल्या वज्रमुठीनं तो प्रकल्प पुर्ण करुन समोरच्या विरोधकांच्या वळलेल्या मुठींचा नमस्कारासाठी हात जोडून दाखवण्याचा चमत्कार, फक्त आणि फक्त दादांच करु शकतात हा आजही प्रत्येकाचा विश्वास आहेेे. केवळ गंगा आणायलाच नाही तर आणलेली गंगा ओळखायलाही भगीरथाची नजर लागते. चिपी एअरपोर्ट पासून आज नाणार प्रकल्प सर्वपक्षीय सहमतीकडे जाताना या गोष्टी आवर्जून अधोरेखित करतात.
दादांच्या कारकिर्दीवर या अगोदरही अनेक लेख येऊन गेले आहेत.. कारकिर्दनामेही येऊन गेलेत.. कार्याचा झपाटा, आणि त्याला सफलतेचे कोंदण असलंना, की मग कितीही शासकीय जड भाषेत लिहीलेला कार्य अहवालही वाचनीय असतो.. आमच्या मिडीयाच्या भाषेत ती इम्पॅक्ट स्टोरी असते.
मला जेवढं आठवतय त्या प्रमाणे या वादळाचा चेहरा जेव्हापासून मी पाहिलाय त्यावेळेपासून या चेह-यानं या मातीशी आपलं नात घट्ट करुन ठेवलय.. आणि मातीशी नातं घट्ट करायला केवळ मातीच नाही तर पकडही घट्टच असावी लागते.. कारण तुफान पावसाच्या या माझ्या प्रदेशात मळणीची वाट असतानाही भलेभले चार पावल चालल्यावर निसरड्या रस्तेवरुन कुठल्याकुठे फेकल्याचं मी स्वताहा पाहिलय.पण इतर नेत्यांना जागा दाखवणारा हाच निसरडा लाल तांबडा रस्ता दादांसाठी मात्र राजमार्ग बनून रेड कार्पेट बनलाय.. कारण त्या पावलांत धमक आहे म्हणूनच ! पावलांमध्ये धमक असली ना कि रस्तेच तुमचा माग काढत तुमच्या पायाशी येतात. गेल्या तीन दशकातले राजकिय संदर्भ तपासले तर वरील सगळ्या शब्दांची शहानिशा कुणालाही पटेल..
दादाच्या राजकारणाची सुरुवात ते शिवसेनेचा राजीनामा आणि कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश ते उद्योगमंत्री आणि त्यानंतर भाजपचे मंत्रीपद अशा तीन टप्प्यात हे वादळ विभागलं गेलय. मंत्रीपदाच्या जबाबदारीनंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात मान्यवर आणि दिग्गजांच्या पक्षात जावून तोच आक्रमकपणा, तशीच कार्यशैली, तोच धडाका आणि महत्वाचा म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्व पुन्हा मिळवणं हे सहजसाध्य मुळीच नाहीय.. पण दादांनी हे सगळ खेचून आणलय. हाही इतिहासच आहे..
खर बोलणं हा स्थायीभाव असलेल्या नारायणरावांचा आक्रमकपणा हा ओघाने आलाच.. पण यानिमित्तानं एक गोष्ट ठाम नमूद करावीशी वाटते कि, दादा असूनही आपल्या प्रत्येक शब्दावर ठाम असणा-या दादांनी कधीही बेताल बोलून स्वताची किमत कमीही केली नाही.. अनेकांनी भूवया उंचावल्या तरी तलवारीची भाषा करणा-याना गूळपाणी पाजत कात्रजचा घाट दाखवत एकतर्फी मैदान फक्त नारायणरावच जिंकू शकतात हा विश्वास अजूनही समर्थकांना आहे तो याच कारणाने ! जिल्हा बँक निवडणूक असो किंवा नगरपंचायत निवडणूक त्यांची रणनीती ही आजही यशस्वीच ठरतेय !
आज एमएसएमईचा विस्तार वाढतोय. देशाच्या एकूण आर्थिक विकासात 30 टक्के वाटा नारायण राणेंच्या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याने घेतलेल्या धोरणांचा आहे. कोरोनामुळे मोडून पडलेल्या अर्थव्यवस्थेला आज हा महाराष्ट्राचा सह्याद्री आपल्या मनगटावर झेलतोय , देशाचा विजयध्वज मोठ्या अभिमानाने मिरवतोय ! लघुउद्योग आणि ग्रामीण उद्योगाला गावच्या बाजारात मर्यादित न ठेवता त्याला आंतरराष्ट्रीय रुपडे दिले जातेय.. या सगळ्या गोष्टींचा आलेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या झेपावणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरतोय. आणि लघु, सूक्ष्म आणि मध्यम ही आज देशाची ओळख बनत चाललीय.. आणि दादांची ओळख तर तीच आहे, जी काल फक्त राज्यात अडकून पडली होती आणि आज राष्ट्राची ओळख बनलीय.. सुक्ष्माहुन अतिसूक्ष्म आणि भव्याहुनही आभाळव्यापी !
- ऋषी श्रीकांत देसाई
Comments
Post a Comment