साने पॅटर्न


#साने_पॅटर्न

पुन्हा श्यामची आई येतोय, नव्याने आजची गरज असलेला श्याम परततोय.. श्याम म्हणजे म्हणजे फक्त साने गुरुजी नव्हे, श्याम  म्हणजे आई आणि मुलाच्या नात्यातील एक अवीट गोडवा ! सत्याचे प्रयोग आणि श्यामची आई ही पुस्तके आजही का विकली जातात याची उत्तरं प्रत्येकाला अंतर्मुख करतात. आज धर्म म्हणजे सबकुछ या वातावरणात आज जगत असताना 'खरा तो एकचि धर्म' हे गाणे काल 15 ऑगस्टलाही कुठे ऐकायला आलं नाही म्हणून श्याम आज  गरजेचा आहे. मान्य आहे तो भाबडेपणा आता नकोय पण निदान मनाचा नितळपणा तरी मिळेल..

आता थोडेसे चित्रपटाबद्दल , सुजय डहाके हा सिनेमा आणतायत. त्या भूमिकेसाठी जो चेहरा निवडलाय तो नीट पहा.. काय आव्हान स्वीकारलंय या कलाकाराने फक्त विचार करा. मी मुद्दाम नाव लिहीत नाही पण ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल असे म्हणणारा हा कलाकार चेहऱ्यावर ममत्व कसे आणणार हा केवढा मोठा प्रश्न त्याला स्वतःला पडणार याचा विचार करा.. मुळात तो कलाकार आहे, आणि कलाकार फक्त अभिनय करतो. वास्तवातल्या जगण्याचा आणि भूमिकेचा संबंध नसतो पण तरीही साने गुरुजी साकारणं आणि लोकांना ते पटणे हे खूप मोठं आव्हान नक्की आहे.. एक नक्की की, "हा दागिना आता आयुष्यभर मिरवणार" !

या निमित्ताने पुन्हा साने गुरुजी वाचले जातील असे गृहीत धरण्याचा वेडा आशावाद नक्की आहे.. नीट बघा हा कलाकार त्याने स्वतःला केलेलं चॅलेंज फार मोठे आहे. आपण एकाच वाटेवरून जाताना किती चाकोरी सोडू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.. आणि जर तुम्ही स्वतःला आव्हान देऊ शकला नाहीत, रस्ते असले तरी तुम्ही फक्त बोटीतूनच प्रवास करत राहाल.
हा कलाकार ओळखता आला तर बघा, त्याचे नावही आठवेल ! 

आणि त्याला ओळखता आला तर एकदा स्वतःला ओळखून घ्या, जमणार नाही म्हणून लपवलेल्या स्वतःला एकदा द्या आव्हान ! नक्की जिंकाल !!

- ऋषी देसाई

Comments