देवभूमीतील देवसभा


आंगणेवाडी दौऱ्याच्या निमित्ताने येत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक स्वागत. महाइव्हेंट हा शब्द नेमका कशाला म्हणतात हे आज आंगणेवाडीत आल्यावर समजेल. मुळात काळ वेळ स्थळ या पल्याड जाऊन एखादा निर्णय घेतला की तो अंमलबजावणीपर्यंत ज्या स्टेटजीने लोकांपर्यंत न्यायचा असतो त्या स्किल युनिव्हर्सिटीचा हा माणूस डीन आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढी मोठी सभा घेणे, ती ही आजच्या दिवशी हे खरंच फक्त फडणवीस यांनाच जमू शकते. मागील काही वर्षांत पक्ष बांधणी म्हणून घेतलेल्या धोरणी निर्णयांची आज एक मोठी व्याप्ती एका मोठ्या कॅनव्हासवर उतरतेय! कोकण आमचं आहे हे दावे एकाबाजूला आणि आज जे काम मी केलंय ते फडणवीस यांनी सांगणे एका बाजूला. आजच्या सभेत किती कोटींचे पॅकेज आणि किती घोषणा होतात हे फार महत्वाचे आहे. त्या पूर्णत्वासही जातील म्हणा. पण या निमित्ताने आता गरज आहे खरंच एका नव्या व्हिजनची !

माझ्या माहितीनुसार आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जत्रेला फडणवीस आले होते का ते  मला आठवतं नाही, पण आज उपमुख्यमंत्री म्हणून येणारे फडणवीस पुढील दीर्घ काळासाठी लक्षात राहतील.. सर्वच राजकीय अभ्यासकांसाठी ही सभा, सभेचा परीघ आणि व्याप्ती खरंच अभ्यासण्यासारखी आहे ! आज सभेसाठी मोठा बालेकिल्ला देखावा उभा करताना उध्वस्त केलेले गढी, बुरुज, खंदक सगळं स्पष्ट दिसतय.. या सगळ्या गोष्टी बिटविन द लाईन्स असतात. या निमित्ताने रवींद्र चव्हाण नावाचे एक कर्तबगार पालकमंत्री प्रामाणिकपणे करत असलेले काम जरा उठावदार दिसतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोक आता पक्षापल्याड रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बोलू लागलेयत. सिंधुदुर्गच्या कामाबाबत चव्हाण आणि शिंदे या जोडगोळीने एकदा एका मंचावर येऊन मांडलेले प्रेझेंटेशन आता जास्त गरजेचे आहे.. अर्थात या सगळ्यात आज देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि त्यातले व्हिजन म्हणणे खऱ्या अर्थाने जत्रा गवशांची बनवेल..

ही देवभूमीच आहे, फक्त या मातीतल्या लोकांच्या मुख्य समस्या या शाश्वत रस्ते , कायम वीज पुरवठा आणि दूरसंचार नेटवर्क एवढंच आहे, ते सगळं तुमच्या हातात आहे. त्या तीन गोष्टी फक्त द्या बाकी नंतर मागू, कदाचित न मागताही द्याल.. भाजप म्हणून द्या किंवा सरकार म्हणून द्या.. पण त्या आम्हाला प्राधान्याने द्या..

आज जत्रेच्या दिवशीही फक्त आज देवसभा आणि त्यातली देववाणी हाच अभ्यासाचा विषय आहे. तुमच्या आभासी देवसभेचे शाश्वत गडकोट बनो याच सदिच्छा !

Comments

  1. वैद्यकीय सुविधा ही पण प्रमुख समस्या हा

    ReplyDelete

Post a Comment