मारुतीबाप्पा


आज हनुमान जन्मोत्सव ..आज अंजनीपासून ते अगदी गावोगावचं ग्रामदैवत आणि लोकदैवत म्हणुन उपास्य असलेल्या हनुमान जन्म सोहळ्याच्या फेसबुक आणि व्हाट्स अप वर फोटो पाहतोय.. पण मालवणचा हनुमान जन्म सोहळा विसरणं केवळ अशक्य.. त्याचीच ही छोटीशी आठवण.. 

लहानपणीचा आवडता हनुमान जन्म सोहळा म्हणजे गजानन महाराज मंदिरातला. महेंद्र कपूर चे अंजनीच्या सुता हे गाणं म्हणजे पहाट ते दुपार अशी पारायण असायची.लवकर उठून मारुती जन्माला जायचय म्हणून भल्या पहाटेची ती लगबग आणि याच लगबगीतला तो हनुमानजन्म सोहळा आणि मंदिराच्या खिडकीतून फेकलेली ती सुर्यकिरणं. सगळ काही भारलेले असायचं. 

मालवण बाजारपेठेतलं आजच मारुती मंदिर हे खुप प्रशस्त आहे. पण जुनं मारुती मंदिर त्या समोरची ती विहीर, आणि समोर बसलेला रुईची पानं विकणारा सगळं सगळ नॉस्टेलिजीक असायची. जुन्या मंदिरातला मारुती जन्माचा सोहळा काय वर्णावा महाराजा.. जवळ जवळ सगळी व्यापारी माणस हजर असायची. आज मंदिर प्रशस्त झालय पण जुन्या मंदिराचे देखणेपण विसरणं अशक्य !


मेढाच्या मारुती मंदिरात साक्षात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर आणि साक्षात हनुमंतराय हा सोहळा पाहणं म्हणजे खुप मोठा भाग्याचा क्षण होता.. चित्रपटात पाहिलेली ती देवसभा साक्षात जिवंत व्हायची राव. रौद्राभिषेकांच प्रासादिकत्व किती रसाळ आणि किती ओजस्वी असते याचं अनुपम्य चित्र असायचं. 

भरडावरील दत्तमंदिरातला  मारुतराया म्हणजे आमचा माय फ्रेंड मारुतीच होता. देवाला हात लावून शेंदुर मस्तकाला लावा असा तो दोस्त होता. काजरेकर गुरुजीचे वडील तेव्हा आम्हाला तिर्थ द्यायचे. तेजस्वीपणाचा ओजस्वीता साक्ष द्यायची.

आमच्या देऊळवाड्याचा रामेश्वर मंदिराच्या मारुतराया पाहा एकदा.. अणुपासून ब्रम्हांडाएवढा ही खणखणीत आरती म्हणण्याची अगदी यथार्थ जागा. लहानपणी वाटायच कधी कधी रामायण सिरीयलसारखा हा मारुतरायाही खुप मोठा झाला तर..

आणि हो आमच्या एसटी वर्कशॉपच्या आवारातलं तो मारुती.. त्या दिवशी फार विलक्षण दिसायचा.. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर अहो सगळे किर्तनकार आणि यजमानाच्या भुमिकेत दिसायचे.. आणि रात्री तीन अंकी नाटके.. बस स्टॅन्ड समोर नाटक पाहताना झोपलेपण आज जागे करतेय.

असंख्य आठवणी आहेत.. वायरीचा पारावरचा मारुतराया आहेच म्हणा ! किल्ल्यातला द्वार मारुती आणि रामदास स्वामींची लोककथा असो कट्ट्याचा बाजारपेठेत दिसणा-या मारुती असो,कुणकावळ्याच्या वळणावर मारुती मंदिरासमोर चटकन जोडले जाणारे आपले हात असो, किंवा नागदा मारुती असो, या सगळयांच्या स्मरण आठवणी मनातला मारुतराया नेहमीच सश्रद्ध बनवत असतात. आज मुंबईत सगळ काही मिळतं अशी एक अफवा आहे. मी वाटेल तेवढे पैसे देतो गावाकडचा कुणीतरी सुंठवडा देईल का मुंबईत.. हव्या त्या किमतीला पण त्याच चवीचा.. 

आज हे सगळ आठवतंय, रुईच पान तोडल्यावर निघणा-या त्या चिकासारख. क्षणातल जिवंतत्व कालातीत अमरत्वासारखं...

Comments

Post a Comment