चांद्रऔक्षण

|| श्री श्री श्री श्री श्री श्रीमन शिवछत्रपती राजे || 

मुजरा राजे | 

आज अखेर आपणांसोबत मनीचे गुज बोलण्यास निमिष मिळाला | कालचा अष्टोप्रहर अस्मादिकांची दाटीवाटी आणि आनंदसोहळ्यातच पुरून पावला | रात्रीच्या घटकेस यावं म्हटलं तर आपल्या मागच्या माडा पोफळीच्या छत्रचामरांचे कोडकौतुक संपतेय होय | अवघ्या कडेकोटाने तीन साडेतीनशे वर्ष जपलेला 'राजीयांचा कोट' हा  दिमाख आज राजधानीसम मिरवला | समोर किल्ले सिंधुदुर्गची खाशी रोषणाई आणि समोर दर्यासागराची निळाई आणी मागे आपले भालदार चोपदार बनलेले माडबागा कुणी कुणी शिरकाव करु देत नव्हत्या |

म्हटलं आज उन्ह मावळतीला गेल्यावर पूर्वा फाल्गुनीच्या अष्टमीच्या कोरेने चांदऔक्षण करु आणि मग बोलू मागच्या त्रिशतकोत्तर निमिषाबद्दल |  महाराज या इथे कोटावर यायचं होतं म्हणूनच याच नाव आपणच राजकोट तर उच्चारले नसेल ना | काय बोलावे महाराज आपल्या कृतीचा थांगपत्ता कळीकाळास ना काल लागला ना आजपावेतो लागला | पुण्यवान म्हणून या प्रांती आम्ही मिरवतो, पण आम्ही हे ही जाणतो हा प्रांतच आपल्या पदस्पर्शाने रेखला गेला |  काल या प्रांती आलेला अवघा माणूस मुलुख केवळ आपल्या स्मरणाने पावन होऊन गेला. 


श्रीमंतराजे आज या राजकोटी आपण चंद्र सूर्य आभाळ बनून उभे ठाकलात | समोरच्या  दर्यात शिवराजेश्वर बनून तुम्ही दैवत होताच, पण आता वास्तवात श्रीमंतस्वामी म्हणून राजकोटीही येणे केलं | शिवराजेश्वर, मोरयाचा धोंडा, कांदळगावचा वटेश्वर , ढोपर कोपर, सर्जेकोट, पदमगड, तुमच्या संजीवन हस्त पादुका किती किती बोलावयाचे आणि किती किती मिरवायचे| एका जन्मात साता जन्माची आभूषणे आम्ही मिरवतो ती केवळ तुमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी उतरून या प्रांती येण्याने | 

राजे तुम्ही किल्ले सिंधुदुर्गच्या वास्तू शुभारंभ प्रसंगी आला होता | त्याक्षणी मन्मथावर आई भवानीचा जागर आपण प्रज्वलित केला होता | काळाच्या पानावारच्या त्या आठवणी आम्ही वाचत गेलो, सांगत गेलो |  आज लाटेने नवं पान उलटलं आणि नव्या पानावर लिहिलं होतं " राजीयांचा राजकोट आज पावन झाला, आता युग अठ्ठावीस आमचा राणा उभा ठाकला"


श्रीमंतराजे, उरी प्रचंड साठलंय | पण सगळं कुठे बोलणार आणि सगळं कुठे सांगणार | आता फक्त डोळे भरून बघणार | राजे तुम्ही श्रीमंतस्वामी आहात पण या दर्यासागराच्या प्रांती आमचं कुलदैवत आहात | या सरकणाऱ्या वाळूला तुम्ही घट्ट केलात आणि आमच्या जन्म महसुलात कायमचा जन्म सुभा दिलात | आमचा जन्म राजीयांच्या प्रांती झाला ही ओळख भाळी चंद्रकोर बनली|    समुद्राला मर्यादा घातली आणि इथल्या वादळा पावसाला जरब घातली ती ही आपणच श्रीमंतस्वामी |


किती बोलायचे श्रीमंतस्वामी | आज बोलायस गेलो तर धमन्यात वारा घोंघावत आणावा लागेल आन लिहायला गेलो तर दर्याच्या शाईचा बोरू लिहावा लागेल| पण तीन साडेतीनशे वर्षाची उपकारगाथा संपणार नाही | ती फक्त आठवून रित्या आभाळी उधळावी आन तुमच्या डोईवर चांदण्यांची माटवी बांधावी | राजे अगदी मनापासून सांगतो,  तुमच्या प्रत्येक प्रतिमेत देवत्व असते| पण राजकोटी आलेलं तुमचं रूप हे आभाळभर आहे | 

जास्त नाही बोलत, फक्त एवढंच मागतो आता इथंच राहायचं युगांनयुगे | आमच्यावर नजर ठेवायची आणि कधी हरतोय असे वाटलो ना तर तुमच्या हातातील त्या उंचावलेल्या तलवाराच्या टोकाकडे एकदा बघण्याची संधी द्या , मग त्याच प्रभेने पुन्हा लढण्याची ताकद द्या, जगण्याची ताकद द्या, आणि पुन्हा इथेच जन्म मिळू द्या एवढीच आस  श्वासात द्या !

लेखन समाप्ती करतो स्वामी | आज्ञा असावी श्रीमंत छत्रपती राजे |

आपलाच 

मालवणचा आसमंत
लेखन तिथी : कालभैरवष्टमी

Comments