संघर्ष कोणालाच चुकलेला नसतो.. आणि जो संघर्ष चुकवत नाही त्याच्या वाटेचं यशसन्मान ही त्या संघर्ष योद्धाला सन्मानित करण्याचीं संधी सोडत नाही.. जिथं एक दोन वर्ष राजकारणात सत्ता नाही उमेद संपते अशा राजकारणात तब्बल दहा वर्ष संघर्षाचा मळवट भाळी मांडून प्रत्येक काटेरी वाट तुडवत, लोकांना वाट दाखवत पुन्हा अजेय होणे हे किती अवघड आहे हे प्रत्येकाला ठावूक आहे. आणि तीच लखलखती विजयपताका मिरवत पुन्हा निर्विवाद जिंकत आमदार निलेश राणे यांनी राजकारणात केवळ कमबॅक केल नाही तर अनेकांना लढूया, लढूया, लढूया आणि जिंकूया हा मुलमंत्र दिला आहे. दैनिक प्रहारसाठी आमदार निलेश राणे यांच्याबद्दल अभिष्टचिंतनाचा लेख लिहीताना राजकारणापल्याडचा विजय, आणि विजयापल्याडचे निलेश राणे या विषयावरचे हे चिंतन राजकारणाच्या कक्षा बदलवणारे ठरेल हे नक्की.. आणि अर्थात त्यासाठी मी जसा आहे तसाच आजही आहे हे सिद्ध करणारे आमदार निलेशजी राणे यांना जन्मदिवसाच्या आणि भावी कारकिदीच्याही उदंड शुभेच्छा !
राजकारण हे गोड गोड बोलणाऱ्या माणसाचे क्षेत्र आहे असे म्हटले जाते. जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ घेऊन वावरताना त्यात 'वेळ मारून नेण्याचे' कसब असले पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं. पण तरीही तुम्ही स्पष्टवक्ते असाल, त्यासाठी तुम्ही अनेक वादळ झेलूनही तुम्ही जर राजकारणात केंद्रस्थानी असाल तर तुमचा सच्चेपणा लोकांनी स्वीकारलाय हे सिद्ध होते. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आजघडीच्या निर्भीड आणि आक्रमक नेत्याच्या यादीत एक नाव महाराष्ट्रात गाजतेय आणि ते म्हणजे आमदार निलेश राणे
आमदार म्हणून निवडून आल्यावर हिवाळी अधिवेशन आणि आताचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राणे यांनी मी पक्षाचा, मी कोकणाचा ,मी हिंदुचा असल्या खोट्या बंधनात स्वताला न अडकवता आधी मी मतदारांचा आहे.. मी मला निवडून दिलेल्या मतदारांसाठी अधिवेशनात आलोय हे ठणकावून सांगताना सभागृह डोक्यावर घेतलंय. अगदी बजेट सादर होण्याच्या दोन दिवस अगोदर सत्ताधाऱ्यासह विरोधकाला अरे निधी किती आहे, पुरवण्यांची तरतूद किती आहे आणि आमच्या वाट्याला काय मिळणार आहे हा एकच जळजळीत प्रश्न अर्थशास्त्राच्या प्राध्यांपकानाही हा प्रश्न का सुचला नाही ही किल्स्टरक्लिअर लाईन ओढणारा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी अर्थविचार हे एक सुंदर पुस्तक लिहीलं आहे. आज एवढ्या वर्षानंतर राज्याच्या अर्थसंकल्पाला कसा वाचावा हे शिकवणारे ते पुस्तक आणि पुर्वअर्थसंकल्पीय आमदार निलेश राणे यांचे ते भाषण प्रचंड साम्य दाखवणारे आहे. महसूली तुट आणि पुरवणी मागण्या या केवळ कागदावर आलेख मांडणाऱ्या नसाव्यात, सामान्य माणसाला जे हवंय ते आम्हाला द्या हे स्पष्ट भांडणारा नेता कधीच पक्षाचा नसतो, तो महाराष्ट्राचा असतो.. कुठल्याही पक्षाच्या मतदारांनी आमदार म्हणून व्होटींग करताना ज्या अपेक्षेने मतदान केलेले असते त्या बोटावरच्या निळ्या शाईचा चेहरा असतो.. आणि जनतेसाठी कुठलीही भीडभाड न ठेवता संयत स्पष्टवक्ते म्हणून आजघडीला आमदार निलेश राणे यांनी ध्रुवपद मिळवलं आहे हे नक्की..
नजरेला जे चूक दिसते ते चूकच मग समोरची व्यक्ती कोणीही असो त्याची भीडभाड न ठेवता सत्य म्हणून एक भूमिका मांडणे या गुणांमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. अर्थात मागच्या दहा वर्षात जी भुमिका होती ती आता सत्तेत बसल्यावर त्या भुमिकेशी प्रामाणिक राहणे हे सोप्पं नाहीय. माझ्या एका मताने काय होईल या विचाराला आज खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेशजी राणे आणि आमदार निलेश राणे या तिन्ही नेत्यांना तुम्ही समजून घेतल्यावर आज मतांची ताकद काय असते हे आज पुन्हा प्रत्येक दिवशी समजत जातं आहे. निलेश राणे यांच्या बाबतीत पृथ्थकरण केल्यास आजघडीला उगाच भरकटत न राहता मतदारसंघाविषयी त्यांचा प्रामाणिकपणा हेच त्यांच्या ऊर्जेचे केंद्र आहे. आणि आता तीच ताकद प्रत्येक कार्यकर्त्याची बनली आहे.
अगोदर नेता आणि मग कार्यकर्ता आणि आता लढवय्ये आमदार असा राजकीय प्रवास असला तरी मागच्या दहा वर्षात सत्ता नसतानाही
निलेशजीच्या ना वलयात कमीपणा झाला होता ना गर्दीच्या घोळक्यात घट झाली होती. माणसे जोडून राहणे आणि त्या माणसांनी नेत्यांसाठी सर्वस्व पणाला लावणे ही फार मोठी गोष्ट आहे.
एखाद्या रोलकोस्टरच्या राईडप्रमाणे प्रचंड अप डावून पाहिल्यावर पुढची स्टेप ही फुल्ल स्विग रॉकेट मुव्ह असेल असा कोणी विचारही केला नसेल.. पण आज खासदारकी, मधली दहा वर्ष आणि आता आमदारकी हा सगळा प्रवास पाहताना एवढ्या झटक्यात संयमीत उभे राहून लोकांना ताकद देणे हे किती अवघड आहे हे तुम्ही निलेश राणेंचा प्रवास पाहिल्यावर समजून जाईल.
विकासाच्या चर्चा आणि प्रत्यक्ष मतदारसंघात विकासाचा दर्जा हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि मला यासाठी दहा वर्षापुर्वीची पण अजुनही भक्कम असलेली आठवण सांगायची आहे. खासदार म्हणून मिळालेल्या पाच वर्षात निलेश राणे यांनी चिपळूण पासून बांदयापर्यंत विकासकामांचा धडाका लावला आज त्या कामांची व्यापकता ही जिल्ह्याच्या विकासात एका भक्कम पायाच्या भुमिकेत आहे. मुंबई गोवा चौपदरीकरणांचे आजचे काम हा जरी वादाचा विषय असला तरी निलेश राणेंच्या नियोजनात तयार झालेला झाराप पत्रादेवी रस्त्याचा अजूनही फक्त दर्जा पहा. रस्ता तोच पण वचक असला की दर्जा बोलतो हे स्पष्ट जाणवते. माझे अजुनही म्हणणे जे तेव्हा शक्य झाले ते त्यानंतर का नाही जमले आणि आजही का जमत नाही.. आणि हा प्रश्न पडेल तेव्हा निलेश राणे यांचा दर्जा या शब्दाचा आग्रह का गरजेचा आहे हे समजत जाते.
२०१४ पासून सातत्याने स्थानिकांची पाठराखण करताना त्यांनी परिणामाची तमा केली नाही. डंपर व्यावसायिक , रिक्षा व्यावसायिक, आंबा बागायतदार, लोक कलावंत, खेळाडू समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करताना ते प्रश्न तडीला जाणार हा त्यांनी निर्माण केलेला विश्वास ही त्यांची मोठी पावती आहे. आणि म्हणूनच विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी मांडलेले मुद्दे आज विधानसभेत त्यांचे तारांकित आणि लक्षवेधी प्रश्न बनत आहेत.
निलेश राणे यांचा एक गुण हा खरंच प्रत्येकाने स्वीकारण्यासारखा आहे, तो म्हणजे त्यांच्यातला शिवभक्त ! इतिहासाचा अभिमान बाळगताना तो जपला पाहिजे यासाठी ते खासदार असल्यापासून आपल्या पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजला पाहिजे यासाठी त्यांची तळमळ प्रामाणिक आहे, आणि ती कायम प्रामाणिक राहील ! निवडून आल्यावर आमदार म्हणून महाराजांचे भव्य स्मारक हा माझा शब्द आहे असे आश्वासन देणाऱ्या निलेश राणे यांनी शिवछत्रपतींचे स्मारक बांधणार या संकल्पपुर्तीकडे आता वाटचाल सुरु केली आहे.
जिंकणे आणि हरणे म्हणजे राजकारण नसते तर लोकांसाठी लढणे , त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे याला राजकारण म्हणतात. वाचन, वक्तृत्व आणि लेखन या सगळ्या पातळीवर आक्रमकपणा असला तरीही हा नेता अजूनही भोळा आणि हळवा आहे. मनात एक आणि ओठात एक असले दुहेरी आयुष्य जगत नाहीत. आणि अशा माणसांच्या वाटेवर संघर्ष हा पदोपदी असतोच म्हणा.. आज त्या संघर्षांच्या काळातील अश्रुंची फुले झाली आहेत.
अर्थात आता आमदारकी म्हणून सत्तापदासोबत त्यांनी अजुनही जपलेली संघर्षाची भुमिका आमदार निलेश राणे यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अभ्यासू आमदार ही ओळख निर्माण करुन देईल. रयत हे स्वराज्य अशी शिकवण देणाऱ्या शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा आज शिवसेनेच्या निमित्ताने पुन्हा आमदार निलेश राणे यांच्याकडे आला आहे. पण त्याचवेळी अटलपथावरचा संघर्ष आज निलेशजींना शिवपथावर नेणारा ठरलाय.. आपण जनतेसाठी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दांविषयी प्रामाणिक राहता रयतेच्या सुखसमाधानासाठी कळीकाळाशी लढा उभारणे हा नेतृत्वाचा राजधर्म आगामी काळातही आमदार निलेशजी राणे नक्कीच पुर्णत्वास नेतील. म्हणूनच सुखसंकल्पाच्या त्या प्रत्येक जनमोहिमेसाठी आमचा हा शिवपथावरचा अटलयोद्धा उदंड आयुष्यासह सदैव अजेय राहो, लाभो ह्याच शुभेच्छा !
Comments
Post a Comment