हे उदरभरण नोहे, जाणिजे जो 'मालवण'

प्रत्येक शहराला स्वताची अशी एक खाद्यसंस्कृती असते. आणि कोकणातल्या प्रत्येक गावाला तर  पाट्यावर वाटलेल्या खोबऱ्याचा, कुटलेल्या मसाल्याचा, आणि गावच्या पाण्यात तरलेल्या स्वताचा असा गंध असतो. आणि हा गंध सुकणारा नसतोच मुळी, सुकलेल्या ओवळीयांच्या फुलासारखा घमघमत राहतो.. 'नाळकूट ' ही व्याधी श्रीमंतांना होत नाही, पण ज्याला होते तो माणूस नंतर श्रीमंत होतो. आणि ज्याला होतो त्याला अश्वत्थामा बनवतो हे ही तितकंच खरं म्हणा. अशाच एका शहराच्या खाद्य आठवणींची ही खाद्यभ्रमणगाथा !

मालवण शहर फक्त रुचकर मत्स्यभोजनासाठी प्रसिद्ध आहे एवढ्यावर जर तुम्ही थांबणार असाल तर मग लाल भाजीचा बटाटावडा,  मालवणात मिळणारी एकमेव मिक्सभाजीपुरी, कॉकटेलवाला ईश्क, यासोबतच बाम, कांदाभजी, मिसळीसाठी असा उंच फरसाण डोंगर या अशा अनेक गोष्टीही आज कळणे गरजेचे आहे. लहानपणापासून बघत आणि जगत असलेल्या या सगळ्या गोष्टींचा कॅनव्हास खूप मोठा आहे. आज अनेकजण मालवणात न्याहरी म्हणून 'घावणे आणि आंबोळी'मध्ये अडकलेल्या पर्यटनाला आपण हे नव्याने उगाळून सांगितले पाहिजे म्हणून हे आवर्तन आहे

साधारणपणे गोवेकर स्टॉपपासून मालवण आलं असे समजायची एक रीत पकडली ना तरी पूर्वी त्या गोवेकर स्टॉपला एक दुकान होते. चहा भजी आणि कांद्या सोबत शेव चिवडा खाऊन पुढे बैलगाडीने शहरात येणारा एक वर्ग होता. पुढे  ऑक्ट्राय नाक्याच्या बाजूला असे दोन बाजूला छप्परी आणि वाटेत एक उभी मेढ असणारी टिपिकल हॉटेल होते. जकातीसाठी तासंनतास थांबणाऱ्या एसटीत ती एक पटकन जाऊन चहा मारून यायची जागा होती. देऊळवाड्यात आबाच्या हॉटेलात जायला नारायणाच्या धयकाल्यासारखा सुंदर योग नव्हता म्हणा! पांढरा भपकरा टाकणारा बल्प आणि खाली ट्रेमधधे भजी वडे आणि पुऱ्यांची ही रेलचेल असायची, पुढे काश्याच्या बरणीतला शेव म्हणजे तो फक्त कागदात सांगता येईल शब्दात नाही लिहिता येणारा. माणसाने आयुष्यात किती वाकडे असावे याला शब्दश रूप म्हणजे काश्याचा पिवळा शेव.. 

पुढे साधारणपणे स्टँडवर आलात की सुरेंद्र गावकरांचे जुने दुकान होते, मध्ये फक्त एक भिंत आणि त्यातुन दिसणारी झाऱ्यावर निथळणारी कांदा भजी.. सुरेंद्र गावकर म्हणजे गप्प बसून सगळं पाहणारा आणि राब राबणारा हात होता. त्याजागी आता दीपक कामतेकरचे हॉटेल फेमस आहे म्हणा.  जनरली एसटी स्टँडची उपहारगृह म्हणजे सो सो असतात, पण काही काळ तिनईकर यांनी एसटी बस उपहारगृह चालवायला घेतले त्यावेळीही त्याच शासकीय पदार्थात एक घरगुतीपणा आला होता. एसटी स्टँडच्या अगदी समोर दत्ती देसाई नावाच्या इसमाचे एक हॉटेल होते. गोवन धाटणीची मालवणी चव हे तिकडे अनुभवायला मिळायची.. गवाणकर हॉटेल हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पिवळी भजी, फरसाण आणि रव्याचे लाडू या सगळ्यात गवाणकार कुटुंबाने जपलेले घरपण होतं म्हणा !

पुढे भरड नाक्यावर विश्वभारती हॉटेलमध्ये मिळणारा वडा म्हणजे ख्रिश्चन लोकांच्या हातच्या चवीला जे मालवणी वरदान मिळाल होते त्याची गोष्ट होती. लाल वड्याच्या या शहरात पिवळा वडा खायचा तर विश्वभारतीत ! आणि लाल वडा अजूनही खायचा असेल तर गिरकर भावंडांची दोन्ही वडापाव दुकान फक्त पहा. नन्याकडे अजूनही तसाच बटाटा वडा आणि हा स्पेशल अंडापाव मिळतो. दुसरे जे दिलप्याचो वडो दुकान आहे ना तिथे सकाळी पांच रुपयात उसळ पाव मिळायची.. फुकट रस्सा मिळतो म्हणून पाव किती खायचो ते ज्याचे त्याला ठाऊक म्हणा ! अजूनही कांदा शब्द आठवला की या दोन्ही गिरकरांच्या दुकानातला उभ्या कांद्याच्या फोडीने भरलेले ताट आठवतं म्हणा. भरड नाक्यावर खानोलकरांचे भालचंद्र उपहारगृह, नंतरचे नित्यानंद हॉटेल आणि  त्यांनतर आता उरलेले उदय कुणकावळेकरच्या हॉटेलातील पिवळ्या बटाट्याची भाजीपुरी आणि त्यावर ओल्या नारळाची अर्धी करवंटी कातून ओतलेले खोबरे.. हे सगळं नजरेसमोर आणणे म्हणजे सुख आहे. भरडावरच पूर्वी काडसिंद्धेश्वर नावाचे हॉटेल होते. कांदा कितीही महाग होउदे, महागड्या कांदा प्लेट बरोबर तिखट मिरची कचाकचा चावून खायची ही फेव्हरेट जागा !

ज्याच्यासाठी मालवण प्रसिद्ध होते ते क्षुधा शांती निवास आता बंद झालंय. का झालं कसे झालं या आठवणींवर 'आर्किडची' फुलं ठेवू शकतो बस्स.. पण मिल बंद होण्याचे दुःख असते ना तसे बाणावलीकर यांचे हॉटेल बंद होण्याचे दुःख असलेली एक पिढी आहे. त्या हॉटेलातला भाई आज म्हातारा झाला असेल, आणि माने आज स्वतःच्या हॉटेलात मालक बनून वडे गाळतोय. बाणावलीकर यांचा वडा, जिलेबी, बंगाली खाजा ही ना एक जगण्यातील स्वतंत्र आठवण होती. आपला एक दावा आहे, सगळ्या जगात लाल भाजीच्या वाटपातला असा वडा, त्यावर बेसनाचे आवरण मिळूच शकत नाही.. असो इडलीने भुकेने वडा खाल्ला हेच खरे ! आज त्याच्याच बाजूला राजू सावंत हॉटेलने तीच चव जपलीय. निदान मालवणला आल्यावर त्याच चवीचा बटाटावडा खाता आला नाही ही रुखरुख तरी राहत नाही. हनुमान मंदिरच्या बाजूला असणाऱ्या त्या साईच्या छोट्या हॉटेलातही तशीच वड्या भज्यांची गंमत आहे म्हणा..


बाजारात अजूनही राज रेस्टोरांचा मिळणारा मालपोवा ही गोष्टच भन्नाट आहे.. नारळफणसानंतर बाहेरून कडक आणि आतून नरम असणारी जर गोष्ट कुठली गोष्ट असेल तर म्हणजे मालपुआ. बाजाराच्या सुरुवातीला ओरस्कर बेकरीमध्ये अगदी सुरुवातीला धर्माजी ओरस्कर कुमल्याच्या पानात गोल भजी बांधून द्यायचे. आज काळ बदलला पण अजूनही गावातुन खरेदीसाठी आलेली लोक घरी जाताना भजी बांधून नेतातच.. आता कुमब्याची पाने नसली तरी चव तीच आहे. 

तुम्ही गोल भज्यांचे शौकिन असाल तर भगवान हॉटेल हा सुंदर पर्याय आहे. पूर्वी भल्या पहाटे चारला गरम शिरा आणि चहा रेडी असायचा. मालवणातील निम्मे कोंबडे भगवानाच्या हॉटेलातील शिऱ्याच्या वासाने उठायचे आणि मग बांग द्यायचे. बशीत चटणी आणि चटणीत लडबडलेली गोल भजी.. ती झाल्यावर गरम शेवबुंदी.. आणि त्यांनतर हूं हा हूं हा करत प्यायचा चहा.. सगळंच आमीनअस्तू आमीनास्तू म्हणा ! त्यांच्यापुढे मार्केटच्या वाटेवर आलात की आज शिरगावकर हॉटेल ही ओळख सांगणारे पण चवीने माणक्यांचा हाटेल हीच बिरुदावली मिरवणारे हे हॉटेल आजही तीच चव जपतेय. बाम, भजी, शेवबंदी, वडा सगळंच वेगळ्या चवीचे ! शेवेच्या बाबतीत याचा दर्जा क्लास आहे.. सकाळी चहाच्या पेल्यात बचक्याने शेव ओतायचा याला ना,  नास्ता म्हणणारा जो एक चाकरमानी वर्ग आहे ना त्याची ही ' राईट चॉईस बेबी अहा !' म्हणजे शिरगावकरांचे हॉटेल !

बाकी फोवकांड्या पिंपळावरचे संतोष हॉटेल म्हणजे मिसळ पुरी साठी फेमस.. शिक्षणाच्या काळात अगोदर संतोष यायचा आणि कॉलेजात शिकायला गेल्यावर चंद्रकांत हॉटेल यायचे. जगात सगळीकडे कॉलेज असतील, त्यांची कँटीनही असतील पण चंद्रकांतच्या बाकड्यावर ज्या दुनियादारीच्या स्क्रिप्ट रंगल्या ना त्या कुठेच नसतील म्हणा.   मोजून चार साडेचार टेबल आणि त्यावर पिढ्यानपिढया प्रोफेसर आणि कॉलेज स्टुडंटचे एकाच बाकड्यावर चाललेले नाष्टाभोजन हा सोहळा असायचा. कॉलेजच्या आयुष्यात फक्त चंद्रकांतच्या मिसळीच्या आशेने येणारी किती विद्यार्थी होते हे फक्त कॉलेजकडून चंद्रकांत पर्यंत पाणंदवाटेलाच   ठाऊक म्हणा ! जगलेल्या आयुष्यात काय कमावलं तर भजी वडे मिसळ शिवाय काही मिळणार नाही म्हणा आमच्याकडे ! संध्याकाळी गप्पा मारताना पिवळा धम्मक शिरा खायची मंगल हॉटेलातली प्रत्येकाची एक सेप्रेट जागा होती. फोवकांडा पिंपळाजवळ मयेकरांच्या हॉटेलात खासियत तर भन्नाट होती. आरसे म्हालापेक्षा जास्त आरसे असणारे त्या हॉटेलात पहाटे चार वाजता गरम शिरा आणि चहा मिळायचा. नव्या बाळंतीणीला स्टीलच्या किटलीतुन चहा आणि गरम शिरा द्यायची ती घरची चव जायची.. गावखेड्यातून बाळंतपणासाठी पहिल्यांदाच शहरात आलेल्या त्या सूनबाईला आयुष्यात पहिल्यांदाच मिळणारा हॉटेलची चहा शिरा अशी ओली आठवण म्हणजे ते पिंपळावरचे मयेकर यांचे हॉटेल ! मालवणची खास ओळख असणारी आणि फक्त मालवणातच मिळणारी मिक्स भाजी पुरी खायची असेल ना तर  पोस्ट ऑफिस समोरचे 'अमोल' आवर्जून गाठा !

आणि एक जागा राहिली, तुम्ही जगाच्या पाठीवरून कुठूनही या. तुम्हाला आयुष्यात कितीही घमेंड असेल तर एकदा विलासाच्या हॉटेलची पायरी चढलात की तुमची घमेंड तुम्हाला हिमालयातच घेऊन जाईन.. चव भन्नाट पण कानाचे दोन्ही पडदे डॉल्बी सराऊंड साऊंड विथ थ्रीडी इफेक्ट व्हायचे..

खुद्द मालवणकरांनाही ठाऊक नसलेली आज किनाऱ्यावरची अनेक हॉटेल पण अस्सल चवीची आहेत.. इथल्या पाण्यात ना गंमत आहे. दयाळ मामाची गुळ्याची भजी, नागेशकडचे बाम , बाळ मुणगेकराचे भगो शिरो, आणि जोरोन म्हणजे सगळा फूड प्लाझा होता ना. ज्यांना दारू आणि सिगरेट व्यसन नाही अशानी 'येळेवर येवन कोरी चाय' प्यावी ! दादा मांजरेकरच्या हॉटेलची पण खूप भारी चव होती. 

अजूनही खूप सारी हॉटेल होती. मांगल्यने नव्या चवीत आणलेला ब्रेड पकोडा आणि मांगल्य मिसळ हे बदलाचे आणि श्रीमंतीचे प्रकार होते. अगदी सरकारी उपहारगृह म्हणून ओळख असणारी पंचायत समितीचा खोपटाली उसळ पाव आणि तसीलदार हाफीसातला कँटीनमधली घरगुती वडा उसळ  पण शासकीय कधीच नव्हती. आजही स्नॅक्स सारख्या प्रकारात अपग्रेड नाही झालोय. पण बिले आणि शिरपुटनीच्या चण्या शेंगदाण्याची चव भय्याला नाहीय. सरस्वती चित्रमंदिरच्या बरणीतील चुनकापे वॉज कांट  कॅम्पेअर टू एनी स्वीटस. मुंबईत अजूनही धड कॉकटेल मिळत नाही ना त्यांनी फक्त एकदा ओरस्कर, राणे, पारिजातच्या आठवणी फक्त विचाराव्यात. वाढदिवस कॉकटेल शिवाय कसा असू शकतो म्हणा? निल्याच्या दुकानातले पायनापल  सरबत हा जसा एक प्रकार आहे. त्यापल्याड राजा सोडा हा वर्तमानातला आणि भूतकाळातला हिंदळेकरांचा गोटी सोडा हा प्रकार होता. अहो एकेकाळी ॲपेरेटो हा मिळणारा कोल्ड्रिंक्सचा प्रकार प्यायला लोक मुंबईहून यायचे.. 

आज वर्तमान धापा टाकत न संपणारी धाव घेत पळतोय. केक शॉप, आणि चहा फ्रेंचायजीही दाखल झाल्यात. आमच्याकडे स्पेशल 'आंबोळी उसळ मिळेल' चे बोर्ड झळकायला लागलेत.. बदलतय अजून बदलत जाईल म्हणा. पण एका क्षणी आपण त्या पिढीतून मोठे झालं आहोत जिथं  वाढदिवसाला केक नव्हता आणि फक्त बटाटा वड्याचा चुरा वेगळा बांधून खाणारी आपली एक पिढी होती.  कधीकाळी पामतेलातले खाऊनही धडधाकट असलेले आज रिफाईण्ड तेलाकडे वळलेले हे चवीला कॉन्शस झालेलं आजचे इथलं जगणे बनतेय. हे शहर कांदा पोहेचे कधीच नव्हतं, पण बाजारात भरलेल्या पोत्यात शेराच्या मापट्यात गावठी पोह्यांचे होते.. आज दिसत नसलं तरी पुढच्या पिढीला हे सगळं सांगायला हवं नाहीतर कोकम सरबताच्या जागी ना एक अमृत कोकम होतो ना त्यातलं अमृत जसे आपण घालवल ना तसंच आपल्या जिभेवरची ही अमृत चव निघून जाईल.. जमलं तर ही पुरचुंडी खोला , डोळ्याना दिसणाऱ्या नगरीचे नाव द्वारकाच असेल हो !

Comments

  1. जबरदस्त👏👏👏

    ReplyDelete
  2. सुंदर ब्लॉग ऋषी. यातील कित्येक गोष्टी मालवण मध्ये राहून देखील अनुभवता आल्या नाहीत. यातील कित्येक ठिकाणे काळाच्या ओघात मागे पडली आहेत. त्यांनी कात टाकायला हवी, नव्या जमान्या सोबत चालायला हवे, आपली चव आणि पदार्थ तसेच राखून ठेवून. पर्यटकांच्या आणि मालवण वासियांच्या देखील नजरेस पडायला हवीत.

    ReplyDelete
  3. अप्रतिम फोटोंमुळे लेखाला एक वेगळाच साज चढलाय..❤

    ReplyDelete
  4. भरडावर दिलीपची उसळ कॉलेज ला असताना पॉट भर खालव, आठवणी जागे झाले, ऋषीदा. हेच्यातली पन्नास टक्के हाटेला पालथी घातलव आम्ही.

    ReplyDelete
  5. खूप सूंदर लेख. क्षुधा शांती निवास मधल्या लाल बटाट्याच्या भाजीच्या वड्याची चव खयच नाय. आमका हे पिवळे भाजीवाले वडे नाय आवडनत. राज बेकरी मधे बटाट्याच्या भाजी मिश्रीत मिसळ सुद्धा छानच आसायची.

    ReplyDelete
  6. आज पण आम्ही जेव्हा गावाक जातव तेव्हा आता सावंताचे वडे किंवा चंद्रकात कडचे वडे राण्याकडचा काँकटेल संतोष कडची मिसळ खाल्या शिवाय येनव नाय

    ReplyDelete
  7. आज पण आम्ही जेव्हा गावाक जातव तेव्हा आता सावंताचे वडे किंवा चंद्रकात कडचे वडे राण्याकडचा काँकटेल संतोष कडची मिसळ खाल्या शिवाय येनव नाय

    ReplyDelete
  8. ह्या प्रत्येक हॉटेल ला पूर्ण मान दिला आहे आणि देतो आहोत अजूनही

    ReplyDelete
  9. मी आज पण केव्हा मालवणात गेलाय की राणे कोल्ड्रिं्स चा कॉकटेल काय खवाचा विसरणाई नाय. आणि सावांताचो लाल भाजी चो वडो...

    ReplyDelete
  10. Ek no. AKKHA BALPAN DOLYASAMOR AANALAT. Almost sagalya hotel madhye khallay pan banawalikaranchya wadyachi ti majjach nirali... Dilpyacho batatovado taso sakali khamang usalpav pan famous aani mayekarankadacho malpovo aani chay

    ReplyDelete
  11. मस्त , शाकाहारी जेवण पण छान असतं.... हे दाखवलंस

    ReplyDelete
  12. खूपच छान ... मालवण फिरान इल्यासारख्या वाटला

    ReplyDelete
  13. तोंडाक पाणी सुटला 😊 जुन्या आठवणीं मध्ये जावन इलंय ..Hrishi Da एकदम भारीच रे तु 😍✨

    ReplyDelete
  14. तोंडाक पाणी सुटला...!😊

    ReplyDelete
  15. खाद्यश्रीमंती अनुभवलेला आमचा मालवण❤️❤️.आता हेच्यातला बराच कायमाय कमी झालाहा पण मालवण नावाची जादू मात्र आजून कायम हा.तुमच्या लिखाणान मालवणची खाद्यश्रीमंती आजूनच समृद्ध झाली इतक्या बाकी नक्की.उद्या ही संपत्ती समृद्धी कुडाळ सारखी गुजराती मारवाडी लोकांच्या हातात गेली नाय म्हणजे झाला.

    ReplyDelete

Post a Comment