श्रीकांत देसाई -एक "बाप" माणूस

पप्पानां जावून दोन महिने झाले. खर तर यावर मुळातच विश्वासच बसत नाही की पप्पा माझ्याबरोबर आज नाही...आजही वाटत बुलेटीन संपल्यावर लगेचचं फोन करतील आणि काहीतरी चुक सांगतील किंवा जबरदस्त म्हणतील.. पण ते होणार नाही याची पुर्ण जाणीव मला आहे. मनाला जरी पटत नसलं तरी मानवी देह म्हणजेच अस्तीत्व हीच रुढमान्य कल्पना असल्याने पप्पा नाहीत हे मान्य करायच, बस्स...
पत्रकार म्हणुन नाही तर एक सजग लेखक म्हणून मी अनेक लेख लिहीले, पण माझ्या आयुष्यातील हा पहिलाच मृत्युलेख... आणि तोही माझ्या पप्पांचा यालाच तर नियती म्हणतात ना....
मला ठावूक आहे, मी जरी आज वृत्तनिवेदक म्हणून वावरत असलो तरी मी म्हणजे राजदीप सरदेसाई नव्हे की विक्रम गोखले ,सचिन तेंडूलकर नाहीच नाही... पण माझे पप्पा दिलीप सरदेसाई, चंद्रकांत गोखले किंवा रमेश तेंडुलकर यांच्या पेक्षा किंवा त्यांच्या एवढेच मोठे होते, निदान माझ्यासाठी तरी... शालेय अवस्थेत कलामांचे अग्नीपंख वाचून मग भविष्याची स्वप्न पहायची, असले प्रकार त्यानाही मान्य नव्हते आणि मलाही... मध्यमवर्गिय माणूसही वास्तवाचे भान ठेवत मोठा होवू शकतो, ही पप्पांची कायमची शिकवण... मी मुंबईला आल्यावर मुंबईच्या मैत्रीणी मला गमतीनं विचारायच्या, तुझ शिक्षण कुठ झालय रे ? त्यावेळी मी हसुन मालवणला इतकच सांगायचो. पण यातही एक गंमत आहे.. मला पाचवीत हायस्कुलला प्रवेश करताना इतर मोठी हायस्कूल असतानाही पप्पानी भंडारी हायस्कूलची निवड केली. ही निवड का केली अस मलाही सारख वाटायचं.. याच उत्तर मला फार वर्षानी मिळालं. माझा शाळेतर्फे आदर्श माजी विद्यार्थी म्हणुन सत्कार करण्यात आला. त्यावेळी माझे मुख्याध्यापक यानी माझ्या पाचवी प्रवेशाचा किस्सा सांगितला.. पप्पा मला घेउन मुख्याध्यापकांकडे गेले आणि सराना सांगितलं, याला मला अभिनेता बनवायचय... सन १९९०च्या सुमारासची घटना.. आजही जर अस कुठल्या पालकानी सांगीतले तर त्याला शाळा वेडात काढेलं..पण पप्पानी ते स्वप्न सराना विकलं आणि याच स्वप्नातून सुमारे १८५ प्रशस्तीपत्रकं, सुमारे १२५ सन्मानचिन्ह आणि मुंबई विद्यापीठांच मानाचं सवोत्कृष्ट अभिनयाचा सन्मान मी कमावल......याच कारण फक्त पप्पाच....
मला समज आल्यापासून जेवढं आठवतं, त्यावरच हा सगळा डोलारा उभा आहे. याची पूर्ण जाणिव मला आहे. पप्पानी कुठल्या परीस्थीतीत शिक्षण घेतलं आणि कसा वाचनाचा राक्षस पोसला हे माझ्या पेक्षा जास्त त्यांच्या समवयस्क माणसानांच जास्त ठावूक आहे. मी इथं वाचनाला जाणुनबुजूनच राक्षस हा शब्द वापरला. कारण त्यांच्या वाचनक्षमतेला फक्त बेफाट इतकच नाव देता येईल... आम्हा दोन्ही भावांच्या पगारातला हिस्सा त्यानी कधीच वडील या नात्यानी त्यानी मागीतला नाही. उलटपक्षी दरमहिन्याला हजारदोन हजार रुपयांचे दान मात्र ते हसतहसत स्विकारायचे .. माझा हा दावा आहे, निदान आजच्या घडीला पप्पांनी सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण शहर हे दोन शब्द असलेले जगातील सर्व पुस्तके ,गॅझेटस् आणि हस्तलिखीत त्यानी वाचलेलीच असतील.
सिंधुदुर्ग किल्ला हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.. आज प्रेरणोत्सव समिती स्थापन करण्यात आलीय. पण १९९० पासून किल्ला या विषयावर त्यानी पूरातत्व खाते,दिल्ली ते मंत्रालय, मुंबई या दोन्ही पत्यावर शेकडोनी पत्रव्यवहार केलाय. तर वर्तमानपत्राच्या माध्यमातून कोल्हापूरच्या गादीला आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे याना साकडं घालून त्यानी काही अंशी ते काम पूर्णत्वासही नेलं.
आजच किल्याचं वास्तव आणि तत्कालीन, विद्यमान राज्यकर्त्याची उत्तरे त्याना 'पाठ' होती, पण त्यानी नेत्याची 'पाठ' कधीच सोडली नाही.
ते कायम सांगायचे कि , हा मालवण किल्ला आहे म्हणूनच मालवण सुरक्षित आहे. या वाक्याची तीव्रता त्यांच्या जाण्यानंतर दोन दिवसांनतर झालेलं फयान पाहील्यावर लक्षात आलं. सामची कर्टन बातमी सिंधुदुर्गची पडझड अशी ठरल्यावर मी त्याना कॉल केला की हा विषय लोकल नाही ना ठरणार अशी शंका विचारली. त्यावर ते उत्तरले होते, आपण किल्लाही केवळ मालवणकराचीं पॉपर्टी समजतो पण ज्यावेळी किल्ले सिंधुदुर्ग ही आबासाहेबांची दौलत समजु तेव्हा चित्र वेगळ असेलं... असो...
पप्पांच्या पत्रकारीतेचं वैशिष्ठ् म्हणजे ते कधीही 'सो कॉल्ड' राहीले नाही. आपल्याला चार लोकांनी पत्रकार म्हणावे यासाठी त्यांची कधीही खटपट नसायची. आजकाल ई- आवृत्तीच्या युगात डिजीटल कॅमेरा ज्याच्या हाती तोच पत्रकार हीच संकल्पना रुढमान्य होत असताना त्यांचा विश्वास केवळ लेखणीवरच होतां.. पप्पांच्या लेखन शैलीबद्दल मी जास्त लिहीणारच नाही.. पण त्यांची जी काही 'स्टाईल' होती ती खरच 'बाप' होती. देवबाग समुद्र गिळणार या एकाच हेडलाईन्समुळे बी.बी.सी लंडनला त्याची दखल घ्यावी लागली होती. १९८० साली १० मिनीटाचा बीबीसीन पप्पांचा फोनो घेतला होता, हे विशेष....
शेकडो कविता तेवढ्याच एकांकिका, हजारो लेख अन् बातम्या त्यांच्या नावावर जमा आहेत. मी स्टेजवर, भाउ प्रथमेश संगित संयोजनाला, आईचे संहीता लेखन , काका प्रफुल्लचं दिग्दर्शन आणि दुसरा काका प्रमोदचं नेपथ्य यातुन सादर होणारी एकांकीका आणि त्याला मिळणारा बक्षिसं याचा त्याना होणारा आनंद हा त्या कुटुंबाचा "बाप" झाल्याशिवाय नाही कळणार...........
पप्पाबद्दलं खुप लिहायच होतं पण मला आता सगळ्याच आठवणी आता अंधुक होत चालल्यायत. त्यांच्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करेनचं.. वाईट एवढच वाटतयं, त्यांच्या मनासारखी गोष्ट झाल्यावर क्लास हा शब्द उच्चारणारे पप्पां कधीच नसतील... मी क्रिकेट जास्त पहात नाही. पण विक्रमादित्य सचिन तेंडुलकर स्वकर्तृत्वानेच मोठा होत असतानाही शतक झाल्यावर तो बॅट आभाळात का आणि कुणाला दाखवतो याचं कोड मात्र आज संदर्भासहीत उलगडत जातय..
पप्पाना म्हापश्यात नेत असताना, ते एवढच म्हणाले "मी ओके आहे , सावकाश ये काळजी करु नको. मी आहे रे. कुठच जात नाही..." मी घरी आलो तेव्हा पप्पा तुम्ही मला सोडून गेला होतां... ऋषा, प्रथमेशला आणि विजयश्रीला सोडून.. त्याना एकट टाकून... आजपर्यत कुठलाही निर्णय आम्हाला विचारल्यशिवाय तुम्ही घेतला नाही, मग एवढा मोठा डिसीजन तुम्ही घेतलाच कसा.....
पप्पा मी त्या दिवसापासुन मी रडलो नाही आणि रडणारही नाही....
कारण पप्पा तुम्हीच म्हणायचा ना, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ.. मी माझ मुलगा म्हणुन सार कर्तव्य पार पाडेन कारण मला पूर्ण ठावूक आहे, माझे पप्पा सर्वच क्षेत्रात बाप होते आणि मी ही त्याच बापमाणसाचा पोरगा आहे...
(हा लेख माझ्या आठवणीवर बेतलेला आहे, भावनेच्या भरात थो़डं जास्तही झाल असेलही पण सार खर आहे... तुम्हाला काय वाटल मी वाट बघतोय..प्रतिक्रीयांची कारण शो मस्ट गो ऑन............)

Comments

  1. ऋषी तु लिहलं रे तुझ्या वडिलांविषयी...त्यांनी तुला घडवलं, वेळोवेळी मार्गदर्शन केल, खरच ते ग्रेट होते. ऋषी तुम्ही सर्व जण धन्य आहात. तुम्हाला असे वडिल मिळाले. पण, माझ्या सारख्यानं काय करावं, ज्याला बाप ह्या शब्द उच्चारला तरी राग येतो. कारण माझा बाप कोण हे मलाही माहित नाही. मी असच पोरकं आयुष्य काढलंय. म्हणून मी माझ्यापुढे आजही आईचच नाव लावतो. कारण तीच माऊली माझी आई आणि वडिल आहे. मी काय शिकलो हे तिलाही माहित नाही, पण मला कधी अडवले नाही. आणि तीचा तो विश्वास मी सार्थ ठरवला.

    ReplyDelete
  2. अरे, मित्रा फारच सुंदर लेख झालाय. आई किंवा वडील गेल्यानंतर आपण किती आणि काय मिस करतो, हे मला खूप चांगलं समजलंय. ते जोपर्यंत आपल्याबरोबर आहेत, तोपर्यंत आपल्याला त्यांचं महत्त्व पटत नाही किंवा आपण त्यांना टेकन फॉर ग्रान्टेड घेतो. पण ते नसतात तेव्हा पदोपदी आपल्याला त्यांची आठवण येत जाते. आणखी एक म्हणजे त्यांच्या आठवणी कधीच अंधुक होऊ देऊ नकोस. कारण त्या आठवणींवरच आपल्याला आयुष्य काढायचं असतं. त्या आठवणीच आता मार्गदर्शक म्हणून आपल्याबरोबर कायम राहतात. सो त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या स्मृती कायम ध्यानात ठेव, विसर पडू देऊ नकोस त्यांच्या शिकवणीचा...

    आशिष चांदोरकर

    ReplyDelete

Post a Comment