पानिपतच्या निमित्ताने....

आज मकर संक्रात... खर तर तमाम मराठी माताभगिनींचा मांगल्याचा अन् सौभाग्याचा दिवस.... आणि मराठी बांधवासाठी काय......... फक्त तिळगुळ खाण्याचा कि संक्रातीच्या निमित्ताने फक्त गोड धोड खाण्याचा... मुळीच नाही... आजचा दिवस म्हणजे पानपताचा रणसंग्राम आठवुन मस्तकाला कुंकुमतिलक लावण्याचा... थोडस् विचित्र वाटतय.. वाटणारच कारण आजपर्यंत इतिहासाच्या पानापानात पानिपत म्हणजे पराभव.. पानिपत म्हणजे नामुष्की.. पानिपत म्हणजे नाचक्की.. पानिपत म्हणजे मराठी साम्राज्याचा अस्त.. एवढच शिकवल गेल... आणि हो, हे वारंवार घोकून घेतल जायच... पण हे सगळ करताना आम्ही आपल्या इतिहासाचच पानिपत कधी करुन टाकल हे कळलच नाही... पानिपत म्हटले, की मराठी माणसांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचा इतिहास...! पानिपतावरील लढाईने मराठी साम्राज्याला मोठा धक्का बसला असल्याने या भूमीबाबत मराठी माणसांना तसे फारसे प्रेम नाही; पण याच भूमीवर पानिपताच्या लढाईत कित्येक मराठी शूरांनी आपल्या छातीचा कोट करीत जिगरबाज झुंज दिली. पराभवाचा इतिहास विसरून मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा इतिहास नव्या पिढीला कळणार कसा.. काऱण आपल्याला फक्त विजयाचे पोवाडे ऐकायला आवडते... विजय झाला कि सारेच असतात... आणि पराभव झाला कि पराभवाला असतो फक्त बाजीराव....
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ....
अस म्हटल की छाती भऱुन येते... पण कधी विचार केलाय का.... किती दिवस दिल्लीचेही तख्त राखतो... दिल्लीच्या तख्तावरी बैसला महाराष्ट्र माझा अस कधी म्हणणार.... कि ते शिकवायला अब्दाली यायला लागणार का... असो...
"पानिपत हा मराठी मनाचा दुखरा कोपरा आहे. त्यावर फुंकर घालत किती दिवस जगणार? पानिपतच्या पराभवातूनच आजचा भारत उभा आहे ना! पराभवाने पिचणारे मन हे मराठी, किंबहुना भारतीय असूच शकत नाही ", अस न्या. शिरपूरकरानी एके ठिकाणी म्हटलं होत.
"तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा संपूर्ण पराभव झाला असता तर पानिपतोत्तर काळात एक प्रभावी सत्ता म्हणून मराठ्यांचा वावर झाला नसता", असे प्रतिपादन नागपूरच्या डॉ. यादव गुजर यांनी केले होते...
"पानिपतचे युद्ध झाले नसते तर अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती येथे रुजली असती. मात्र, या युद्धामुळेच भारतात धर्मनिरपेक्षता अबाधित राखली गेली,'' असे प्रतिपादन प्रा. सदानंद मोरे यानी म्हटलं होत...
पानिपतच्या निमीत्तानं शोध घेताना विचारवंताचे हे बोल खरच विचार करायला लावतात... १८५७ चे समर तोंडपाठ पण मग १७६१ चं का सपाट झाल...
काय झाल होत त्या दिवशी.. नेमकं कोणामुळे आपण हरलो... परकीय शत्रूमुळे की स्वकीय फितूरांमुळे... थेट फितूर तर कोणीच नव्हते.. पण एकदा का मराठा जिंकला की तो आवरणार नाही.. आणि मराठा एकदा जिथं भगवा गाडतो तिथ भगवा उतरवायला आधी वादळवा-याशी सामना करावा लागणार आणि नंतर महाराष्ट्रातील कळीकाळांशी...
पानिपताचा इतिहास या क्षणाला आठवतोय तो असा,
१७६१ च्या मकरसंक्रांतीचा दिवस, संपूर्ण महाराष्ट्र संक्रातीच्या आनंदात होता आणि रणांगणावर प्रत्यक्ष संक्रात कोसळली होती. घरादारात रांगोळ्यांचे सडे पडले होते, तर पानपतावर रक्ताचे सडे... महाराष्ट्रातल्या आयाबहिणीच्या माथ्यावर कुंकू सौभाग्य सजवत होत... तर महाराष्ट्रातल्या लेकीसूनांचं सौभाग्य मस्तकावर रक्ताभिषेक करुन घेत होत...

दुपारपर्यंत मराठी सैन्य विजयाकडे झुकले होते. लढाईवर मराठ्यांचा ताबा होता. काही दगाबाज, फुटीरता अशाच चुका नडल्या. नको ते निर्णय घेतले नि सैन्य वेढ्यात सापडले आणि रक्ताचे पाट वाहिले. १ लाख बांगडी फुटली, ९ लाख बांगड्याचा चुराडा झाला...२७ मोहरा हरवल्या.. कित्येक खुर्दा झाला त्याचा तो थांगपत्ता नाही..
नाही, मलाही इतिहासात नाही रमायचय...खर पानिपत तर पुढंच आहे... खरे मराठे पानिपत एकदाच हरले.. मेले मात्र इतिहासाच्या पानापानात... अन् बोथट झालेल्या मराठी मनामनात..
तर मनातून तर आपण पानिपत पुसतोय... मग आहे तरी कुठं हे पानिपत..
दिल्लीपासून पंजाब अमृतसर हायवेवर हरयाना राज्यात पानिपत हे शहर सुमारे ९० किलोमीटरवर आहे. हायवेवरून पंजाबकडे पानिपत गावात उजवीकडे सुनौती गावाची एक पाटी लागते. तेथून चार ते सहा किलोमीटरवर पानिपत बाजारपेठेतून जावे लागते. एक दर्गा आहे व त्या दर्ग्यापासून दोन किलोमीटरवर "कालाआम' नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण म्हणजेच पानिपत युद्धाचे स्मारक.
हे पाहिल्यावर आपल्या वीरांबद्दल आपण कृतघ्न असल्याची जाणीव होते. आज २५० वर्ष होतायत, पण त्या मराठा वीरांचा संग्राम लोकांसमोर येत नाही. त्या समराची पाटी नाही. भावी पिढीला हा इतिहास, त्याची वीरता देशासाठीचा प्राणत्याग कळणार कसा? हे केवळ मराठा वीरांनी लढलेले युद्ध नव्हे; भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्रातून तरणीबांड पिढी पानिपत युद्धात पेशव्यांच्या अधिपत्याखाली लढली. हे आपल्याला कधी कळणार....
ज्या ठिकाणी मराठा सैन्य महंमदशहा अब्दालीशी भिडले त्या जागेला आजही "कालाआम' असे म्हणतात. लढाई ज्या ठिकाणी झाली होती त्या मैदानात आंब्याचे एक झाड होते. महाभयंकर लढाईत वापरलेल्या दारूगोळ्यांमुळे ते आंब्याचे झाड काळे पडले. धुराने हिरवी पाने काळी दिसू लागली. काळवंडलेल्या झाडाची निशाणी ही एकमेव साक्ष होती. काळाच्या ओघात तीही नष्ट झाली. परंतु त्या ठिकाणी दुसरे आंब्याचे झाड लावण्यात आले. ते आब्यांचे झाड हीच काय ती मराठ्यांच्या दैदीप्यमान यशाची साक्ष... मग याचा अर्थ सरकारने काहीच नाही केलय का... केलय की ... सरकारनं हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक घोषीत केलय. महत्वाच्या भागाभोवती तारेच कुंपण घातलय म्हणे... आणि हो, सरकारन तिथं साध्या बांधकामाच एक स्मारक ही उभारलय..... या स्मारकाच्या शिलालेखात "पानिपतके तिनो लढाईयोमे देश के लिए शहीद अमर जवानोंके स्मृति मे "काला आम' यह वृक्ष लगाया गया है!' बस एवढंच काय ते स्मारकांतील संस्कार, इतिहास....
बाकी स्मारकाच्या नावाने त्या बिचा-याच्या नावाने बोट मोडुन तरी काय फायदा आहे म्हणा. आपल्याकडेही आनंदी आनंदच आहे म्हणा...
आज अरबी समुद्रातील स्मारकासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल जात..पण मेघडंबरीत छत्रपतीचा पुतळा बसवायला का रे नाटक केलीत... महाराष्ट्राच मन च्या निमित्तानं हे पाहीलय... जिजाउंचा वारसा मिरवता आणि आउसाहेबाचा पूतळा चोरीला जाउन किती महिने झाले तिथ दुसरा पुतळा बसवायला काय टेंडर काढणार काय..... चिरनेर जंगल सत्याग्रह शिल्प स्मारक व्हायला सुमारे ७५ वर्ष गेली म्हणे... आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच स्मारक व्हायलाही पन्नास वर्ष उलटावी लागली म्हणे.. असो स्मारकावर नाही काथ्याकुट करायची... नुसते चार दगड बसवले तरी स्मारक होत की राव.. पण त्या दगडांचा इतिहासच ठावुक नसला तरी आपल्याला ते थडगच दिसणार... पण खरा इतिहास ठावुक असला तर तिथली माती ही भाळी लावावीशी वाटत.. हा फरक समजुन घेण आज गरजेचं बनलय... महाराष्ट्रातला पराक्रमाचा इतिहासच आपण बेदखल करतोय तिच पानिपतच काय बोलणार... पण पानिपतचा लढा महाराष्ट्रासाठी नव्हता तो होता संपुर्ण हिदुंस्थानसाठी.. पेशव्यानी आणि मराठ्यानी स्वताच्या राज्यावर ,प्राणावर, आणि जिवावर बेतुन मांडलेला महासंग्राम... पण मराठा गडी यशाचा धनी एवढच आपल्याला ऐकायला आवडत... अपयशाचा धनी हे ऐकायच नाही अन् बघायचं पण नाही...
पानिपतच्या महासंग्रामाला आता अडीजशे वर्ष पुर्ण होतील... त्यावेळी तरी त्या बहाद्दुरांच्या पराक्रमाची साक्ष देणार काही असेल का.... कि तिथंही फक्त पानिपतच का.. पानिपतच्या परीसरात आजही त्या लढाईतील सैनिक, सरदार मराठ्याचे वंशज तिथेच राहतात.. कुठल्या इच्छेसाठी कसबा गणपतीच्या पाया पडायचं, खंडोबाचा भंडारा कुठल्या अभिमानानं भाळी फासायचा.. भीमा- नर्मदेच्या पात्रात कशासाठी तोंड धुवायच... त्रंबकेश्वराला काय म्हणुन बिल्वदले वाहायची... कशासाठी महाराष्ट्रात यायच... आणि आहे तरी कोण तिथं आपलं.. थोडी थोडकी नाही तरी साडेसहा लाखाहुन जास्त पानिपत वंशज कुटुंब राहतात... भोसले ,पाटील, चोपडे नावाची कुटुंब ही मराठी कुटुंब, आपल्याच रक्ताशी नाती सांगणारी ही माणसे... देशासाठी लढायला म्हणुन गेली अन् गावाला मात्र पारखी झाली... ज्या गावच्या मातीत ही लेकर वाढली तीच माती आपल्या लेकरांना मुठमाती द्यायला का नाकारु लागली.. ज्या लेकरानी स्वातंत्र्यसाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं त्याच्या नावाने आसवे गाळणारं सोडा पण फुलं वाहणारे कोणी असू नये, याला काय म्हणाव....
मी खुप वेड्यासारख लिहीतोय.. माझ्या घरातल कोणी नाही होत रे त्या लढ्यात. किबहुंना मी पूण्याचा पण नाही.. तरी पण वाईट वाटतय...
फार वर्षापूर्वी रणागंण नाटक पाहिल होतं. त्या नाटकात अस म्हटलय.. मकरसंक्रातीच्या रात्री मराठ्याचे आत्मे महाराष्ट्रात येतात... हे लिहीताना योगायोगाने तीच वेळ आहे.. मकरसंक्रातीचीच मध्यरात्र... कुठे असतील यावेळी ते आत्मे कोल्हापूरच्या आईच्या महाद्वार रोडवरुनं आईला पहात की जेजुरीच्या पायथ्याशी भंडारा शोधत.. सारसबागेतील तळ्यातील गणपतीचं दुरुन दर्शन घेत कि घृष्णेश्वराच्या कळसाचं दर्शन घेत कि वेड लागल्यासारख चंद्रभागेच्या काठी नाचत आसमंतात वाळु उधळून लावत असतील.... काय करत असतील ठावुक नाही पण हां... सुर्योदय व्हायच्या आत पुन्हा तिथच जायचं.. तुमच्या पानपतावर... हा महाराष्ट्र शुरांचा आहे.. तेजस्वी इतिहासाचा आहे... इथ तुम्हाला जागा नाही....

बस्स की आता मलाही जायचय... लेख संपवतोय....कारण माझ्यासारख्या भटकणा-या आत्म्यानं मानवी देह नाही सोडला, तर हा पोरगा अन् त्याचा आत्मा असाच भ़टकत राहील.. पानिपत, पानिपत करत आणि कळणार पण ,पुढे काय झाल ते भाउस्वामीसांरख...

Comments

  1. mitra ha lekha wachun kahi kshan stbdha zalo, tuzya yan shabdanchi kautuk karav ki aamhi aamcha itihas pusla yach dukha karav tech kalalt nahi. mi yevdhach sangen khup lihi... tuzya shabdanchi dhar hi tuzya kaljatli vedana aahe. ti nehmi jivant thev udyachya maharashtrala tichi garaj aahe.

    ReplyDelete
  2. खरंच खूप छान लेख दिला आहे. ऋषी मनापासून अभिनंदन...पानिपतचा इतिहास या लेखातून जिवंत होतो. त्यामुळं साक्षात लढवय्ये दिसतात. छान...खूपच छान...लगे रहो...

    ReplyDelete
  3. khup chan mahiti aahe partu hi mahiti khup mahi lokana mahit aahe yache waite vatate mala pan aaj samjale mal pan detail mahit navte

    ReplyDelete
  4. भाषा शैली एकदम छान आहे. वाचतांना खुप छान वाटते.
    जेव्हा जेव्हा लिहिशील तेव्हा लिंक पाठवत जा रे बाब्या

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिला आहे लेख.

    ReplyDelete

Post a Comment