पाण्याचा फास


टायटन सबमरीनचा स्फोट झाला, पण ज्या पद्धतीने तो भीषण स्फोट झाला त्याचा विचार केल्याने कधीकाळी शिकलेल्या भौतिक शास्त्राची आठवण झालीय आणि पंचमहाभुतातील कुठल्याही गोष्टीला आव्हान देताना त्याचा परिणाम किती निर्दयी असू शकतो याची पुन्हा जाणीव झालीय.. पाणी काय करु शकते याचा विचार क्षुल्लक समजल्या जाणाऱ्या प्रत्येक जीवाला पाणी किती निर्घृण बनू शकते याची यातनादायी जाणीव टायटन सबमरिनने दिली आहे. 

नेमकं काय घडलं, हे समजून घेतल्यावर तीव्रता किती संथगतीने येऊ शकते. टायटॅनिक बोटीच्या अवशेषासंदर्भात ही पाणबुडी आणि त्यात ९६ तासांचा ऑक्सीजन घेऊन पाच अब्जाधीश निघाले होते. तब्बल अडीच लाख डॉलरचं तिकीट काढून टायटॅनिकचं अवशेष पाहण्याच्या साहसी पर्यटनासाठी चार दिवसांपूर्वी महासागरात पाच बड्या असामींसह उतरलेली पाणबुडी टायटन बुडाली. पण त्यातले पाच जण कोण होते हे अंचबित करणारे सत्य आहे.  त्यात स्वत: ओशनगेटचे फाऊंडर स्टॉकटन रॅश, भारतात चित्ते आणणारे ब्रिटीश उद्योजक हमिश हार्दिंग, फ्रेंच डायव्हर पॉल हेन्री नार्जिओलेट, पाकिस्तानचे अब्जाधीश शाहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान अशी पाच अतिश्रीमंत माणसे अटलांटिक महासागरात नाहीशा झाल्या आहेत. खरंतर इथे विरुन गेल्या आहेत असे म्हटल तरी चालेल म्हणा !


साधारणपणे 112 वर्षांपूर्वी बुडालेले टायटॅनिक जहाज हे त्याच्यावरील चित्रपटामुळे अजुनही आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे.टायटॅनिक जहाजाबद्दल प्रचंड आकर्षण वाढून अतिश्रीमंतामध्ये जीवावर उदार होऊन साहसी पर्यटनाच्या नावाखाली तब्बल तीन हजार मीटर समुद्रात त्याचा सांगाडा पाहण्यासाठी या धोकादायक ट्रीप सुरु झाल्या. अशाच प्रवासासाठी निघालेल्या टायटन सबमरिनच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या आहेत. 

यातला स्फोट हा अतिभीषण प्रकारातील आहे. आपण पाहिलेले स्फोट हे नेहमी एक्सप्लोजन स्वरुपातील असतात. एखादी गोष्ट फुटून बाहेर पडणे अशा स्वरुपात एक्सप्लोजन घडते, तर इम्प्लोजन प्रकारात बाह्य गोष्टीचा दबाव पडून वस्तूचा स्फोट होणे, ठिकऱ्या ठिकऱ्या होणे.. टायटन सबमरीनचा स्फोट हा इम्प्लोजन प्रकारातला आहे. हे सगळं P=hρg सुत्रानूसार समजून घेतली पाहिजे.. संपुर्ण समुद्राच्या पाण्याचा दावा सबमरीनवर पडतो आणि स्टीलचा डबा मधून चेपावा तशी पाणबुडी मधून चेपली गेली... दाब वाढला गेला आणि ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या..


हे तत्वज्ञान भौतिक शास्त्राच्या परिभाषेत समजून घेण्याची गरज आहे.. नाही वाचलं म्हणून फरक नाही पडत.. पण पैसा आहे म्हणून तुम्ही शोधात जाऊ शकता, विज्ञानाच्या परिभाषेला आव्हान देऊ शकत नाही..

 - ऋषी देसाई

Comments