राहुल ऍंण्ड आय....

खरतर आपल्याला आपल नाव काय असाव, हा चॉईस कधीच असत नाही. आणि असणार तरी कसा म्हणा... बारशाच्या वेळेला आपल्याला काय कळणार, आपल्याला काय नाव ठेवताय ते.. आता माझच पहा कि माझ्यावेळेला ऋषी कपूरची प्रचंड क्रेझ होती म्हणुन कुठलाही सात्वीक भाव नसताना, ज्ञानी माणसाची कुठलीच लक्षण नसताना माझ नाव ठेवल गेलं "ऋषी', असो काय करणार.. आता घरच्याना वाटलं पोरग होईल ऋषी, पण हे झालं मुकेश ऋषी..
तर सांगायचा मुद्दा काय, आपण दुनियेला नाव ठेवु शकतो, पण स्वतःच नाव ठेवण आपल्या हातात नसतं.. पोरीचं बर असतं, लग्नानंतर हव ते बदलायचा चॉईस असतो. हल्ली म्हणे मुलीच्या मनासारखे नाव नाही ठेवल तर सासरच्यानाच सुनबाई नाव ठेवतात म्हणे.. अर्थात हे ऐकीव माहितीवर विधान आहे हो.. नाव घ्यायची माझी वेळ आली कि लिहीन मी ठामपणे..
आपण परत मुद्दयावर येउया.. 'नाव'.. आपल्याला नाव ठेवण्यासाठी सारेच सज्ज असतात. जेवढ तुमच काम चांगल, तेवढी तुम्हाला नाव ठेवणा-याची "नामावली" जास्त होत जाते..
तुम्ही काही वेळा हा विचार केलाय कि, एखादं नाव तुमच्या आयुष्य़ात सारख सारख ढवळाढवळ करतय.. आठवा एखादे नाव.. (आता काही नाव उगीचचं आपली आपणच आपल्याशी जोडुन घेतो तो भाग वेगळा म्हणा).. पण अशी एक आठवण मला शेअर करायचीय.. एक नाव, जे सारखं माझ्या छोट्याश्या आयुष्यात डोक्याचा 'केमिकल लोच्या" करतय, ते नाव राहुल. होय राहुलच, आडनाव माहीत नाही.. कदाचित नसेलही पण नाव मात्र राहुल..
राहुल या नावाचा माझा कोणीही जिवश्च कंठश्च मित्र नाही. आणि हो, या नावाचा कोणी माझ्या गर्लफ्रेंडचा क्लोज फ्रेंड पण नाही.. या नावाचा माझा कोणी देणेकरी नाही कि कोणी माझा साहेब पण नाही.. पण हे नाव मला छळतय.. फार वर्षापासुन ..
पाचवीच्या पुस्तकात भगवान बुद्धाचा धडा वाचताना हा राहुल मला पहिल्यांदा भेटला.. सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडला आणि त्याला आय़ुष्यात दुखाःचा जिवनपट दिसला आणि राजवाड्यात सिद्धार्थ कधी परतलाच नाही. तो सिद्धार्थ झाला जनसमुदायाचा, वातावरणाच्या प्रत्येक कणाकणाचा.. अंधकाराने भारलेल्या जगातला आशेचा असीम किरण.. सिद्धार्थ म्हणजेच भगवान बुद्ध.. ही गोष्ट सा-यानाच ठावुक आहे, पण राजा सिद्धार्थच्या राजपुत्राचे नाव होते राहुल.. होय, हाच मला भेटलेला पहिला राहुल.. या राहुलच पुढ काय झालं असेल.. खुप शोधण्याचा प्रयत्न केला. पण नाही वाचनात आला कुठे.. आपल्या वैभवशाली राजसामर्थ्याची, राजसत्तेची वस्त्रे काढुन ठेवताना काय वाटल असेल, त्याला कळलं असेल का हो , आपल्या वडिलांचा त्याग.. कळला असेल त्याला कदाचित.. पण नाही कळला असला तरी ही इज ग्रेट.. कारण पितृआज्ञापालन म्हणजे तरी वेगळ काय.. आणि इथ कोणी कोणाला कसलाच त्याग करायला सांगितल नव्हता..तरी राहुलने त्याग केला.. आज कुटुंब व्यवस्था भरकटत असताना हा राहुल मला वेड लावतोय.. शहाणा बनण्याचे.. दरवेळेला संस्कार आणि मुल्य पुस्तकात वाचुन आणि घरच्यानी शिकवल्यावर नाही मिळत, कधी कधी लहान वयात आपल्यालाच मोठ व्हाव लागत.. भगवान बुद्धाचा शोध हा तर एक वेगळाच अभ्यास आहे. पण कधी तरी राहुल हा ही नात्याची विण आणि स्वत्वाचा शोध घ्यायला लावतो..
थोडा मोठा हा दुसरा राहुल भेटला.. अर्थात महाविद्यालयीन आयुष्यात राहुल.. हा राहुल पुस्तकातला नव्हता.. हा होता कुछ कुछ होता है मधला राहुल.. तोच अंजलीचा मित्र आणि अंजलीचा पप्पा आणि सर्वात शेवटी अंजलीचा नवरा.. राहुल.. कॉलेज लाईफची क्रेझ असताना फ्रेंडशिप बॅंण्ड घेउन फिरण म्हणजे प्रेम.. आणि कुल म्हणत प्रेम करण,त्यातुन लग्न जमण आणि त्यालाच आयुष्य म्हणणं अशा खुळ्या संकल्पना डोक्यात घेउन फिरण्याचे वय ते...
कुणीतरी आपल्या आयुष्यात निघुन गेल्यावर आपले आधार आपणच शोधायचे असतात. अंजली या मुलीवर जिवापाड प्रेम करणारा तो राहुल.. आणि ""हमारे पास मम्मी नही है तो क्या हुआ, हमारे पास पापा है” अस सांगत, मुलीला तु एकटी नाही अस सांगणारा तो राहुल.. काळजात घर करुन बसलाय.. मैत्रीची व्याख्या या राहुलने एवढी हळुवार मांडली की बस्स.. असला वेडापणा करणारी एखादी तरी अंजली हवी आणि त्या अंजलीला मैत्री आणि प्रेमाच्या निखळ नात्यात बांधणारा राहुल मोठा होउन जातो.. आणि जाताजाता आपल्यातला "राहुल' जागवुन जातो..
तिसरा राहुल मला भेटला, माझ्यातच.. माझ्या एंकाकिकेतील पात्राचे नाव राहुल होतं.. हा प्रकारही दोन तीनवेळा घडलाय.. संहितेतील राहुल हा थोडासा चिडखोर, समाजव्यवस्थेवर ताशेरे ओढणारा होता.. माझा मुळचा स्वभाव थोडासा घाबरट होता.. पण या राहुलमुळेच माझा राजकारणप्रवेश, वकिलीप्रवेश, आंदोलक जागा झाला.. हा राहुल स्टेजवर एवढी नजरेतुन आणि शब्दातुन आग ओकायचा, कि विचारता सोय नाही. पहिल्यांदा अभिनयाची बक्षिस मिळाल्यावर राहुल नावाच्या पात्राला आणि मला ही बर वाटायचं.. पण बक्षीस नाही मिळाल्यावर मात्र राहुल माझ्यावर भारी पडायला लागायचा.. प्रचंड मानसिक त्रास व्हायचा.. पण माझ त्या स्क्रीप्ट मधल्या राहुल सारखंच व्हायच. घुसमट आणि वेड्यासारख रडत बसणं.. नंतर मात्र मी राहुलला माझ्यापासुन दुर ठेवायला लागलो... पण अजुनही तो संहितेतील राहुल, जरा कुठ घुसमट झाली कि येतो बाहेर... असा हा राहुल..
चौथा राहुल मात्र वास्तवातला... मी राजकारणात घुसलो तेव्हा स्वच्छ राजकारण करायच, याच विचाराने.. पण नंतर आम्हाला टार्गेट देण्यात आले विद्यार्थी सेना वाढवायची म्हणजे नव्या राहुल गांधी नेत्याला टार्गेट करा.. घराणेशाही वर टिकास्त्र सोडा.. एनएसयुआय मध्ये आपली पोर जाता नयेत.. पोर जाणार असतील तर राजीनामे तयार ठेवा.. मुळात भारतीय राजकारणाचा चेहरा बदलायचा असेल तर या राहुलचीच गरज आहे अस माझ स्वतःच ठाम मत आहे.. पण आपण नाही मान्य करत.. घराणेशाहीचा ठपका लावण्यात मानायची धन्यता.. राजकारण्याच्या घरात जन्माला आला म्हणुन, केवढी रे बोंब मारायची... तो मुद्दा झाला राजकारणाचा.. त्याचे विचारही नव्या भारताच्या शोधात आहेत.. कलावतीचे दुखः शोधायला गेला तरी आम्ही कलावतीलाच राजकारणाच्या बाजारात उतरवलं. मुबंईकराची लाईफलाईन असलेल्या ट्रेनकडे राहुलचे पाय वळले तर आमचे कर्मदरिद्री नेते त्याच्या चपला उचलायला धन्यता मानु लागले.. अर्थ कोणी कसाही काढु शकतो.. काढावा, मी कोणाला अडवत नाही.. पण ज्यानी यशवंतराव, शरदराव वाचलाय त्या प्रत्येकाला वाटतयं यारं, राजकारण आता बदलायला हवा.. तरुण चेहरा हवाय.. तरुण विचार हवेत, एक व्हीजन हवंय. किती दिवस भावनेचं राजकारण करायचं रे.. राजकारणाकडे एक आव्हान म्हणुन पाहणा-या मला असे राहुल पाहायचेत, महाराष्ट्राच्या राजकारणात..
आणि सर्वात शेवटचा राहुल... हा राहुल म्हणजे वरच्या चार राहुलच्या बरोबर विरुद्ध असलेला... ना कुठला संस्कार, ना कुठला ध्येयवाद, ना समाजाचं भान, ना स्वतःचे भान.. हा आहे महाजनकुलभुषण राहुल.... होय तोच स्वयंवर फेम राहुल महाजन..
प्रमोदजीच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला ही स्वारी पहिल्यांदा दिसली. त्यावेळी त्याचे ते वागणे समजुन गेल.. पण वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर काही दिवसात ड्रग्ज पार्टीत सापडलेला राहुल.. कुटुंबाचे भान न ठेवता स्वतःच लग्न करुन मोकळा झालेला अन् लग्नाची हळद उतरायच्या आत घटस्फोटाचा निर्णय घेणारा राहुल..
सारंच मराठी मनाला शॉकींग होतं... नव्या पिढीचा चंगळवाद एवढ्या थराला पोहोचलाय.. फक्त पाहत राहायच... आणि मला या राहुलशी माझ काहीच देण घेण नाहीय... मला सांगायचय स्वयंवर मधल्या राहुल बद्दल.. नात्यातला काका वारल्यानंतर स्वतः लग्न करणारच हा निर्णय घेणारा राहुल आज खलनायक झालाय... पण इथही राहुल नावाचे पात्रच आहे की..
फार वर्षापूर्वी ऐकलं होत की, पुढचे महायुद्ध जर घडल तर ते करणारे आणि कोणी जिकांयचे हे मिडीया ठऱवणार..राहुल स्वयंवरनंतर या सा-याचा अर्थ कळु लागलाय.. राहुल बोलण्याअगोदरच चॅनेलने सांगुन टाकलं, राहुलचे लग्न होणारच.. सुतक नाही फक्त सोयरीकच... राहुल नावाचा माणुस इतका चंगळवादाच्या आहारी गेलाय... खरच आपल आयुष्य मिडीयाच्या हाती जाणार काय.. कुठल्या वाटेवर जातोय.. कुणी सांगाव, रिमोटचा वापर आपण कसा करायचा हे पण एक दिवस चॅनेलवालेच ठऱवतील. पण हा राहुल प्रवास मात्र विनाशाची वाट दाखवणारा ठरला..
माझ्या तीशीच्या आयुष्यात वेगवेगळ्या वाटेवर भेटलेले हे पाच राहुल.. खुप काही सांगुन गेले.. खुप काही शिकवुन गेले.. खरतर कुछ कुछ होता है पासुन राहुल इज चिटर.. राहुल इज चिटर..अस एकल होतं.. पण हे पाच राहुल पाहीले की म्हणावस वाटत.. राहुल ईज टिचर.... राहुल ईज टिचर...
तुमचाही आला असेल का हो एखाद्या नावाशी, "राहु' काल....

Comments

  1. मित्रा छान आहे ब्लॉग. पण राहुल द्रविड कसा काय तुला भेटला नाही याचे आश्चर्य आहे. तु सांगितलेल्या राहुलमध्ये तो दोन क्रमांकाचा ( गौतम बुद्धांनतर ) ग्रेट आहे.तू क्रिकेट फारसा बघत नाही हे खरं आहे. मात्र राहुल द्रविडबाबतची माहिती आवर्जून वाच. तुलाही माझा मुद्दा नक्की पटेल

    ReplyDelete

Post a Comment