संगीत रागिणीहरण अर्थात रावण-वध

फार वर्पापूवी मी महाविद्यालयात ऑपरेशन राम जन्मभूमी नावाचे स्कीट बसविलं होतं. साधारण २००१ च्या सुमारास न्यायालयाने राम जन्मभूमीची खोदाई करण्याचे आदेश दिले होते. तेच कथाबीज डोक्यात मांडून मी हे काल्पनिक स्कीट बसवायचे ठरवलं. त्याच थोडक्यात कथासूत्र असं होत; अ.नगरीत जमीन खोदाईसाठी कंत्राटदार आणि कामगार येतात. खणता खणता त्याना काचेचा चंद्र सापडतो. तो चंद्र प्रतीक असतो, बालहट्टाचा. . त्यानंतर खणताना सापडते, धनुष्याची प्रत्यंचा. आणि सरते शेवटी सापडतात पाण्याचे दोन थेंब.. फार संशोधना अंती असे कळते की ते थेंब असतात, सीतामाईच्या अश्रुंचे..
पुण्य, सच्चाई पतीव्रतेची ताकद असल्याने ते थेंब टिकून आहेत. पण या माईला कुठल्या कारणाने परीक्षा द्यावी लागली. काय चूक होती तिची? कुठल्या तरी दगडाला पाय लागून बाईचा उद्धार करणा-या कडूनच एका बाईच्या भावनाचा दगड करुन तिला मातीमाय व्हावं लागलं. कदाचित माझं हे लिहिणं काही जणाना भडक वाटत असेल. पण ज्या तथाकथित संस्कृती रक्षकाना इतिहासाचे विकृतीकरण मान्य नाही तसेच मलाही विकृत इतिहासाचे उदात्तीकरण मान्य नाही. असो, त्या स्कीट चा शेवट असा होता. कुठल्या तरी देवाच्या नावाने मंदिर उभारायचं आणि निवडणुका आल्या की तो विषय चघळून मत मागायचे धंदे बस्स झाले. त्यापेक्षा तिथं सितामाईचे मंदिर उभारायचं आणि ते प्रतीक असेल सर्व जाती धर्मातल्या स्त्रियांचे, भारतातल्य़ा लाखो- करोडो आय़ा बहिणींचे .. स्त्रीत्वाचा सन्मान करुया अशी वनलाईन थीम त्या स्कीटची होती. हे सारे आता आठवायचं कारण, रावण. होय रावणचं...
रावण.. मणीरत्नमचा नवा सिनेमा.. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा गुरु धूम-२ नंतरचा नवा सिनेमा.. आणि सोबत रहमान इज बॅक.. असा हा रावण १८ जूनला प्रदर्शित झाला. रावण चित्रपट जगभरातील दोन हजार दोनशे स्क्रीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला . रावण चित्रपट एकाच वेळी हिंदी , तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांत बनविण्यात आला होता. "मद्रास टॉकीज' आणि "बिग रिलायन्स' यांची निर्मिती असलेला रावण भव्यदिव्यच होता. भारतात हा चित्रपट साडेबाराशे ठिकाणी लागला. त्याशिवाय अन्य ३५ देशांतील सव्वातीनशे ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला. यापूर्वी "माय नेम इज खान' हा चित्रपट जगभरात अठराशे ठिकाणी; तर "काईट्‌स' तेवीसशे ठिकाणी प्रदर्शित झाला होता. तमिळ भाषेतील "रावण' भारतात सव्वादोनशे ठिकाणी; तर तेलुगू २१५ ठिकाणी लागलाय. परदेशातील पंचवीस स्क्रीनमध्ये हा चित्रपट लागलाय..
हे सार सांगण्याचं कारण म्हणजे चित्रपटाचे भव्य दिव्य झालेले प्रमोशन खरोखरच नेत्रदीपक असंच होतं. लंडनमध्ये रेड कार्पेट प्रीमियर पण जबरदस्त झाला. त्यामुळे भारतात रसिकाच्याही आशा उंचावल्या होत्या. मात्र शुक्रवार दुपारनंतर रसिकांचा प्रतिक्रिया थोडी वेगळीच होती. अभिषेक बच्चन , ऐश्वर्या राय आणि विक्रम या तिघांचा अभिनय वाखाणण्याजोगाचआहे. पण, त्याही पेक्षा या चित्रपटात खरा हिरो ठरला तो या चित्रपटाचा संगीतकार ए. आर रेहमान.. त्यामुळेच हे संगीत रागिणीहरण रहमानमुळेच सुखावह आणि श्रवणीय झालं असं म्हटले तरी ते वावगं ठरणार नाही. संतोष सीवनचा कॅमेरा दिलसे आणि गुरुची आठवण करुन देतोय..
पटकथेतील नक्षलवादाचा प्रभाव चित्रपटातील लोकेशनमुळे टिकत नाही हे वास्तव आहे आणि तेच नेमकं कथेला मारक ठरतं.चित्रपटातील बिरा हे पात्र रावण याच्याशी कथासाधर्म्य सांगताना वीरप्पन, रॉबीन हुड आणि माओवादी नेता कोबाद गांधी यांच्याशी साधर्म्य-मेळ राखण्याचा प्रयत्न करायला जातं आणि तिथंच अभिषेकाचा हा रावण दहातोंडावर आपटला. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस अभिषेक एके ठिकाणी म्हणाला होता, मला मणीरत्मने आपल्या चित्रपटात झाडाचा रोल दिला तरी मी तो करेन. अशा या अभिषेकला मणीने मुलतानी माती फासून देव बनवण्याचा प्रयत्न केला. पण माती - मेकअप सारंच ओघळलं आणि दशाननाचा खरा केविलवाणा चेहरा समोर आला.
ऐश्वर्या राय ही चित्रपटात ऐश्वर्या बच्चन म्हणुनच जास्त कम्फर्टेबल वाटलीय. चित्रपटातील पती विक्रमपेक्षा अभिषेक बरोबरच तिचा अभिनय खुललाय. या सर्वांवर कडी केलीय ती दक्षिणमुखी विक्रम याने.. हा अपरिचीत चेहराच भाव खाउन गेलाय. दाक्षिणात्य़ पण खर्जातला आवाज, आणि पीळदार शरीरयष्टी चित्रपटात भाव खाउन गेलीय. गोविंदाची या चित्रपटात छोटीशीच भूमिका असल्याने त्याच्या दररोजच्या माकडउ़ड्या ऑफिशीय़ल झाल्यायत. एकूणच रावणचा फौजफाटा देखणा आणि नजर लागण्याजोगा असाच आहे, याबद्दल कुणाचच दुमत नाही. खरं तर गेल्या काही दिवसात कुठलाही नवीन चित्रपट रिलीज व्हायचा असला की त्यावरुन वादंग ठरलेलाच आहे. मात्र, या चित्रपटाला कुठलाच वाद उदभवला नाही. फीफा चालू असले तरी रावणाची वाट सारेच पहात होते. रावणाचे दहशत आणि प्रसिद्धी करण्य़ात या चित्रपटाचा बिभीषण यशस्वी ठरला. पण, या सा-या नादात प्रत्यक्ष युद्धनीती मांडायला बिभीषण अयशस्वी ठरला. आणि हा बिभीषणच रावणाचा मारेकरी ठरला.
आणि हा बिभिषण म्हणजेच मणिरत्नम...
ll इति श्री रावणायण संपूर्णम ll

Comments