'नमामी मेधा'

नमामी चंद्रभागा, नमामी गंगे अशी सध्या लाट असताना नमामी मेधा ही कुठली मोहीम असा प्रश्न पडेल कदाचित.. पण नदीमुळे कुणाचंही आयुष्य पाण्यात जाऊ नये म्हणून झगडणाऱ्या जीवासाठी हे नमामी मेधा !

सध्या देशात लोकशाही नांदतेय, अस तुम्ही आम्ही फक्त रेडिओवर ऐकतोय आणि फक्त सरकारी कागदावर वाचतोय. हा प्रश्न आम्हाला का पडलाय याचे एकमेव कारण म्हणजे देशात कुठल्याही आंदोलनाला उत्तर द्यायचे नाही याच संभ्रमात आपले केंद्र सरकार व्यस्त आहे. कारण जंतरमंतरवर सुरु असलेले शेतक-यांचे आंदोलन असो किंवा महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हमीभावाचा प्रश्न असो. कुठल्याच प्रश्नाचे थेट उत्तर द्यायचे नाही आणि मिळालेल्या भलत्याच उत्तरावर प्रश्न मिटला म्हणून ढोल बडवायचे हा एककलमी कार्यक्रम सध्या भक्त संप्रदायात सुरु आहे. या देशात आणखी एक मोठे आंदोलन सुरु आहे, आणि दुर्दैव म्हणजे त्या राष्ट्रीय आंदोलनाबाबत कुणालाच काहीच बोलायचे नाही. आणि त्या सगळ्यात दुर्दैवाचे म्हणजे एक मराठी बाई गुजरातच्या एका प्रश्नावर वर्षानुवर्षे लढतेय तरी मराठी माध्यमांमध्येही तिच्या आंदोलनाबद्दल एका अवाक्षरानेही लिहीले जात नाही, याहून व्यासंगी आणि नंबर वनचे दावे करणा-या पत्रकारीतेचे दावे किती फोल आहेत याचा अंदाज आपण लावू शकतो.

मेधा पाटकर म्हणजे जनसत्याग्रह, हा शब्द गेले वीस वर्ष मराठी मनाभोवती रुंजी घालतोय. नर्मदा बचावासाठी लढणा-या या सामाजिक कार्यकर्त्या.. खरतर इथं वीस  नाही तर,  सुमारे तीस वर्ष हा शब्द लिहीणंही फार महत्त्वाचे आहे. कारण सध्या काल परवा सोशल माध्यमात लिहीणारे आणि एखादी आरटीआय टाकली की तुम्ही सामाजिक कार्यकर्ते होता. पण 1989 पासून सुरु असलेल्या या नर्मदा बचाव आंदोलनात मेधाताई पाटकर एकट्याच लढतायत.. आणि आता हा प्रश्न पुन्हा उग्र होतोय. जुलैच्या 27 तारखेपासून मेधाताईचे पुन्हा उपोषण सुरु झाले आहेत. बडवानी मध्ये सरदार सरोवर पाण्यामुळे विस्थापीत झालेल्या गावांना मिळणा-या असुविधामुळे हे पुन्हा उपोषण सुरु झालय. मेधाताईंसोबत बारा सत्याग्रहीनी हे आंदोलन सुरु केलय. कफन सत्याग्रहाच्या घोषणेपर्यंत ही निकराची लढाई पोहचलीय. या सत्याग्रहींचा सध्या कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाही त्याना फक्त त्यांची जमीन गेलीय त्याची नुकसानभरपाई आणि सक्षम पर्यायी व्यवस्थापन हवय. एवढं देखील शक्य नाही आहे का सरकारला ? समृद्धीसाठी वाटेल ती रक्कम मोजू पण प्रकल्प करु म्हणणा-या सरकारचा विकासाचा चेहरा या बारा सत्याग्रहींच्या आंदोलनाला का उत्तर देत नाहीय.

पण या निमित्ताने मेधाताईंमुळे पुन्हा या ऑगस्ट महिन्यात सत्याग्रह नावाची विलक्षण जादू भारतीय लोकमानसात भारु लागलीय. तमाम विपरीत परिस्थीतीत मेधाताईंचे आंदोलन अजुनही तग धरुन उभे आहे. केवळ वड पुजून, आणि कोटी कोटी झाडे लावून पर्यावरण रक्षण होणार नाही, गरज आहे ती या पर्यावरण आणि त्यातील जीवघटकाचे रक्षण करण्याची, हाच विचार घेऊन मेधाताई लढतायत. आणि सगळ्यात म्हणजे लाखो गावकरी त्यांच्या या लढ्यात वैचारिक दृष्ट्या सहभागी झालेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश सारख्या तीन राज्यातील प्रकल्पबाधीत लोक या प्रश्नासाठी झगडतायत. खरतर देशातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील ही सत्याग्रहाची चळवळ म्हणजे एक चमत्कार आहे. कारण गेल्या बत्तीस वर्षात हा लढा केवळ शांततामय मार्गाने चाललाय. आंदोलन म्हणजे डोकी भडकवणे हा आजचा रिवाज असताना मेधाताईंचे आंदोलन म्हणजे अप्रुपाचे देणे आहे.

आज राजकारणात वंदे मातरमची स्पर्धा लागलीय.. मातीला वंदन करण्याच्या स्पर्धेत ज्यांच्या पायाखालची जमीन पाण्याने नेलीय आणि त्यांना दुसरी जमीन द्यायला आपण कमी पडलो आहोत त्यांच्याकडे बघायला राज्यकर्त्यांना वेळ नाहीय. मध्यप्रदेशातील सुमारे 40 हजार कुटुंब या प्रश्नांची उत्तर शोधतायत. आणि त्यांचा तुमच्या आमच्या पेक्षा लोकशाहीवर विश्वास आहे. न्याय मिळेल आणि तोही केवळ गांधीच्या वाटेवरुनच गेल्यावरच याच गावक-यांच्या निर्धारावर मेधाताई पुन्हा सत्याग्रह करतायत. लवकरच त्यांच्याही लोकशाहीचा विजय होऊ दे आणि झोपेचे सोंग घेतलेल्या सर्वांनाच त्या सत्याग्रहींची शतकानंतरची पहाट पाहण्याचे भाग्य लाभो याच या स्वातंत्र्य महिन्याच्या शुभेच्छा... 

Comments