जीवधोंडा

आज तिथी कुठली आहे माहीत नाही, पण दरवर्षी  आयुष्यात जुलै ची 21 तारीख आता सर्वपित्रीच असेल हे नक्की!  किती आत्मे तुझ्या देहात घेऊन तू जगलास तुझं तुला माहीत, पण सगळ्यांना पावन करून सोडलंस.. ज्याने वयाच्या पाचव्या वर्षी माझ्याकडून नटसम्राट घोकून घेतलं आणि पॉझ हे जीवघेणेच असले पाहिजे तो बापू नावाचा देवमाणूस आज गेला..

बापू कोयंडे म्हणजे केवळ एक तालीम मास्तर नव्हता. माझ्यासारख्या कैक पोराना ज्यांना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामात शिकून नट व्ह्यायच स्वप्न असते ना त्यांची तो युनिव्हर्सिटी होता.. आज हे विद्यापीठ बंद झालंय.. कितीही नवी विद्यापीठ आली तरी पुन्हा नालंदा, तक्षशीला पुन्हा होऊच शकत नाही ना.. अगदी तसंच पुन्हा बापू नाही होऊ शकत !

खरतर माझ्या प्रत्येक पोस्टची नावे आणि एंड याच गणित पक्क ठरलेलं असते. पण आज मात्र मी लिहितांना त्या सगळ्याची वेदना काळजाच्या आरपार आहे. तुम्ही गारंबीचा बापू वाचला असेल पण बापू  म्हणजे माझ्यासाठी अक्षरशः आरंभीचा बापू आहे.

तिसरी चौथीत नटसम्राटची स्वगत बसवून घेणे हे फक्त त्यालाच जमू शकलं असते. पप्पानी सांगितले , प्रफुल्लने सायकलवर बसवून नेलं आणि बापूने घाम फोडला या सगळ्यातून मी घडत गेलो.. नटसम्राट, कौंतेय, इथे ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच, छावा, रायगडाला जेव्हा जाग येते, वाहतो ही दुर्वांची जुडी , थँक्यू मिस्टर ग्लाड असे सगळी प्रकार पायावर वळ खाऊन सगळं शिकलोय. मी प्रफुल्लची सायकल आणि बापू या सगळ्याचा साक्षीदार आहे..

बापूला अगदी सुरुवातीला पाहिलं ते कन्या शाळेच्या रंगमंचावर पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी एकांकिकेत. जेलर म्हणून बापू जो काय मिरवायचा ना, ते पाहणं हे कायच्या काय क्लास होता. विवेक देऊलकर, प्रफुल्ल देसाई अशी भारी स्टारकास्ट होती. त्या एकांकिकेनंतर तेवढ्या ताकदीचा मी पुन्हा परफॉर्मन्स पाहिला नाही. ती एकांकिका पुन्हा होणेही नाही..

त्यानंतर बापूने प्रफुल्लच्या दिग्दर्शनात कुरुक्षेत्र केली. श्रीकांत देसाईंची ती स्क्रिप्ट आणि स्वतः बापू.. दर प्रयोगाला भलतच सुचायचं.. दरवेळेला बक्षीस गुटाळून घरी यायचो.. पण प्रत्येक प्रयोगाला बापुची विंगेतील अस्वस्थता तीच असायची..

पप्पानी साधारण नव्वदच्या सुमारास 'त्यांच्या आभाळात चंद्र कधी उगवत नाही' अशी एक मोठी नाव असलेली एकांकिका लिहिली होती.. आणि हीच मग एकांकिका नाव बदलून आली.. जिवंधोंडा नावाची स्क्रिप्ट फक्त बापू साठी थांबली होती. फक्त लंगोट लावून बापू स्टेज वर वावरायचा.. शेवटी आग पेटून मी आणि बापू मरायचो.. पण तोपर्यंत बापूने संपूर्ण प्रेक्षकांना मी बापू नावाच्या वणव्यात पेटवलेलं मी पाहिलंय..

बापू म्हणजे मास्टरपीस आहे..तो येणार एकांकिका बसवणार आणि जाणार . अंगकाठीने प्रभावळकरांच्या पेक्षाही बारीक असणारा हा माणूस पहाडी आवाज काढतो तरी कुठून हा प्रश्न असायचा ? नाटक बसवताना अस्वस्थ , नाटक सादर होताना अस्वस्थ आणि झाल्यावर मी कुठल्याही श्रेयाचा धनी नाही येतं तरी कुठून हे सगळं भारलेपण ? काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पंत, नाट्यसंपदा, गोवा हिंदू असोसिएशनचे नाव ऐकल्यावर जी एक पिढी वेड लागल्यासारखी जगते ना बापू त्या पिढीचा आहे..

त्यावेळी मालवणात गोरे, आजगावकर आणि बापू असे तीन मेकअपमन प्लस दिग्दर्शक होते. पण रंगभूषेपेक्षा दिग्दर्शक टच वाला माणूस होता.. तो , त्याचे शर्टच्या बनियनच्या आतले गोल गळ्याचे टी शर्ट , त्याची व्हेस्पा, आणि हो त्याची ब्रिस्टॉल.. आयुष्यात एवढे दिग्दर्शक पाहिले पण फक्त वडापाववर तीन अंकी नाटक बसवणारा एकटा बापूच आहे..

बापू वस्त्रहरणच्या पहिल्या हजार प्रयोगात अर्जुनाचे काम करायचा. त्याच्या घरात ती एक मोठी फ्रेम होती. कधीतरी मोठेपणी बापू एवढे बनावं असे लहानपणी वाटायचे. मोठे झालो पण बापू बनायचं मात्र राहूनच गेलं... आणि आता तर या जन्मात शक्यच नाही..

बापूचे आणि स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे वेगळे नाते आहे.. इवल्या इवल्या घरट्यात, करियर, या एकांकिकेला पिन ड्रॉप सायलेन्स होता..महाविद्यालय म्हणजे हुल्लडबाजी या प्रकाराला श्रीकांत देसाई लिखित आणि बापू कोयंडे दिग्दर्शक जोडगोळीने 80 चया दशकात चक्क रडवलं होते.. ती स्नेहसंमेलन म्हणजे नाटक आणि कलाकार घडवणारी फेक्टरी बनली होती..

बापू या सीजनात बिझी असायचा त्याच्याघरी सध्या गणपतीशाळे चे काम जोरदार सुरू असायचे.. बापू, काकी आणि मुलगा लवराज तिघेही या गणपती शाळेत व्यस्त असयाची..देवाची पण गंमत आहे ना, बापूकडून मेकअप करून घ्यायला त्यालाही आवडतं असेल बहूदा ! फक्त एकच प्रश्न ते पण शांत पाटावर बसतात की त्यांच्यावरही डोळे दटावतोस ? हा प्रश्न माझा अनुत्तरित राहिलाय..

बापू आज तू गेलास.. मला नाही वाटत अंगणातल्या चिकण माती व्यतिरिक्त तू काही ठेवून गेला असशील.. तुझ्या घराकडे, मामा वरेरकर नाट्यगृहात तुझा फोटो पाहताना तू आठवत राहशील.. स्वराध्या संस्थेच्या एकांकिका स्पर्धेत तुला जीवन गौरव पुरस्कार मिळाला. नेमकं मलाच तुझ्यावतीने आणि तुझ्याबद्दल बोलायला लागलं. मराठी रंगभूमीत तुझ्यासारख्या कलावंतांनी केलेल्या पदरमोड, हौस, आणि रंगसेवा यातून गावागावातील ऐतिहासिक, सामाजिक नाट्यकलाकृतीचा प्रवाह मी मांडला. थोडा अर्धवट राहिला होता म्हटलं तुझ्या नागरी सत्काराला बोलू.. अरे डायलॉग पाठ नसले तरी एन्ट्री आणि एक्झिट न चुकवणारा तू आज जायची घाई का केलीस ?

आज अनेक गावच्या देवळातील पडदे, बांबू , बॅरल, आस लावून बसलेले असतील बापू येतलो मा हा नाटकाक, त्याची उत्तर आज तूच त्यांना दे! बालगंधर्व पाहताना अनेकांना  स्वताच्या खिशातून पदरमोड करून भपकेबाज नाटक अनेकांना अप्रूप वाटले पण आम्ही हे पाहिलंय रे बापू.. तोंडवळी, तारकर्ली , देवबाग मसुरे कितीतरी ठिकाणी तुझ्या ऐतिहासिक नाटकात हा भरजरीपणा तुझ्या खिशातून येताना पाहिलाय.. पण आता तिसरा पडदा पडलाय..

बापू, काहीही कर पण निदान नाट्यगृहात धूप घातल्यावर, तिसरी घंटा वाजल्यावर फक्त अंगात येऊ नकोस.. तुला विंगेत बगायची सवय झालीय रे बापू.. कारण जेव्हा तू अंगात भिनशील आणि तुझ्या सवयी प्रमाणे जिथली वस्तू तिथे नसेल तर काय होईल तुझे तुला ठाऊक आहे..आणि हो मेकअप लावून थिएटर बाहेर गेलो तर ओरडायला ये हा बापू..

बापू आठवतंय का रे , आपलं वाक्य होतं.. "मरणानंतर प्रत्येकाचा जीवधोंडा ठरलेला असतो.. त्या दगडात जाईपर्यंत आपण श्वास घ्यायचा असतो".. आज तू फसवलंस माणसांना दगड बनवून तू गप्प मजा बघतोय.. बापू तूच शिकवलं होत ना ग्लिसरीन न घालता रडता यायला पाहिजे.. येऊन बघ आज जमतंय मला.

बापू, तूच सांग तुला कुठे शोधू ? अंधारात की प्रकाशात ? विंगेत की प्रेक्षकांत?  डोळे बंद करून माझ्यात ? की तुझ्या कुठेही न सापडणाऱ्या जीवधोंड्यात ?

ऋषी श्रीकांत देसाई
आदित्य थिएटर्स, मालवण

Comments