पिर्रलहा

ग्रेटा थनबर्ग
वय वर्ष अवघे सोळा !

खरतर हे नाव तुम्हाला माहित असलंच पाहिजे असे काही नाही.. पण खरच जर हे नाव माहीत नसेल तर तुम्ही जगाच्या कोसो दूर आहात हे नक्की..
होय, ही अतिशयोक्ती नाही, हे खरं आहे.. हा जो एवढंस पासून एवढालेसे पर्यंतचा जो विलक्षण प्रवास आहे ना, त्याचे नाव आहे ग्रेटा थनबर्ग !


एक सोळा वर्षाचे नाव टाईम मासिकाच्या यादीत झळकलं आणि सोळावं वरीसाचे हे नाव दुनियेला धोक्याची जाणीव करुन देण्यात आपलं आयुष्य़ घालवतय याची दुनियेला जाणीव झाली.

ग्रेटाचे 'नाव छापून आलं', 'तिचा फोटो छापून आला' म्हणून किशोरवयीन पालकांच्या टिपीकल कौतुकमिश्रीत आनंदसोहळ्यापेक्षा स्विडनमधल्या या मुलीची गोष्ट फार जगावेगळी आहे. ग्रेटाचे नाव यात एका चिमुकलीचे नाव नसून तिच्या नावामागे ठामपणे असणा-या पर्यावरण चळवळीचे नाव आहे, आणि म्हणून याचे कौतूक फार मोठे आहे.  ग्रेटाने ही वसुंधरा सावरण्यासाठी सर्वशक्तीमान असणा-या ट्रंप यांनाच आव्हान देत तिच्या मोहीमेच्या धडका रोवल्या यातून तिची धडाडी उठून दिसतेय.


पर्यावरणाच्या बदलाने होणाऱ्या समस्येवर आवाज उठवणाऱ्या 16 वर्षीय स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला टाईम मॅगझिनने २०१९ चं ‘पर्सन ऑफ दी इयर’ ने देखील गौरवण्यात आलं आहे. ग्रेटा थनबर्गला ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला याआधी देखील एमेन्सटी इंटरनॅशनलचा सर्वोच्च पुरस्कार, द राइट लाईव्हहूड पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर ती आता टाइम मॅगजीनच्या कव्हर पेजवर झळकलेली आहे.

ग्रेटा थनबर्गने गेल्या वर्षी हवामानबद्दलच्या मोहिमेला सुरवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर तिने निदर्शने केली. तिच्या या मोहिमेची जगभर दखल घेण्यात आली. हे सगळं केवळ तिला अवघ्या सोळाव्या वर्षात मिळालंय.. मग प्रश्न पडतो याची सुरुवात झाली तरी कधी ?

ही सुरुवात झाली स्वीडनमध्येच.., ग्रेटा तीन वर्षाची असल्यापासून.. एका माहितीनुसार बहुतेक तीन वर्षांची असताना  ग्रेटाने  शाळेत एक ग्लोबल वॉर्मिंगसंदर्भात एक डॉक्युमेंटरी पाहिली आणि ती त्यात गुरफुटून गेली.. त्या स्क्रीनवर दिसत गेलेल्या प्रत्येक फ्रेमचा तिच्या मनावर आघात झाला. आणि तीने तिचे बालपण बाजूला सोडलं आणि ग्रेटाने पर्यावरण विषयक वाचनात, त्या कुतूहलात स्वताला झोकून दिलं.. पुढची पाच वर्ष ती फक्त संशोधन करत राहीले.. अर्थात बालवयात विचार करणा-या मेंदूची प्रक्रिया आणि जागतील समस्येच्या या  दाहकतेची तिच्या कोवळ्या मनाने घेतलेला धसका याचा विपरीत परिणाम तिच्या आरोग्यावर झाला. आणि एक्सपरर सिंड्रोम या जीवघेण्या व्याधीत तीने हा लढा सुरु ठेवलाय.

ज्यावेळी ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर आपल्याला खुप काही करायचय, हा तिचा समज पक्का झाला तेव्हा ती स्विडनच्या संसदेबाहेर शाळेचे दफ्तर वॉटरबॅग घेऊन बसली. पहिल्या दिवशी तिच्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झालं पण दुस-या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांनी तिच्या लढ्याविषयी बातमी दिली तेव्हा संसदेनं तिला सभागृहात बोलावलं.. आणि तिथपासून सुरु झालेला प्रवास तिला अगदी नोबेल पुरस्काराच्या शिफारशीपर्यंत घेऊन जाणारा निघाला.


ग्रेटा जगभराच्या मिडीयाच्या नजरेत आली ती मार्च २०१८ मध्य़े. त्यावेळी तीचे वय अवघ १५ वर्ष होतं. पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रेटाने थेट शाळा बंदचीच हाक दिली. आणि ही गोष्ट फक्त तिच्य़ा एका शाळेची नव्हती तर जगभरातल्या १०५ देशातल्या शाळांच्या मुलांनी रस्त्यावर उतरत मोर्चे काढले. त्यावेळी अगदी भारतातील काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी तिला या मोहीमेत साथ दिली. सोशल मिडीयावर  #fridayforfuture आणि #schoolstrike4climate  या मोहीमेने ग्रेटाच्या चळवळीसोबत अवघ जग जोडलं गेल.  जलवायु परिवर्तनासंदर्भात चुकीच्या धोरणांचा फटका आज जगाला सहन करावा लागतोय ही गोष्ट सांगताना ग्रेटाच्या डोळ्यातील लालबुंदपणा आणि चिमुरडीची तळमळ पाहणेही शब्दांच्या पलिकडे जाऊन पोहोचते.

ग्रेटा एकाचवेळी रस्त्यापासून व्यासपीठापर्यंत सगळीकडेच आपले मुद्दे ठामपणे मांडतेय. नोव्हेंबर २०१८ मध्ये टेडएक्सस्टॉकहोममध्ये तीला भाषणासाठी आमंत्रित केलं होते. २०१८ मध्येच संयुक्त राष्ट्र परिषदेच्या क्लायमेंट चेंज कॉन्फरन्समध्ये बोलावण्यात आलं. जानेवारी २०१९मध्ये तीला दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तिला तिची मत मांडण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. २०१९ मध्ये २२४ शिक्षणतज्ज्ञानी समर्थन देत एक ओपन लेटरवर स्वाक्षरी केली. एवढंच काय तर संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिया गुटेरिस यांनीही या लढ्याचे कौतूक केले.


रॅली आणि शक्तीप्रदर्शन म्हणजे व्यापक चळवळ असा जगाचा असलेला जनसमज ग्रेटाला मान्य नाही. पर्यावरणासाठी केवळ रॅली काढून नाहीतर प्रत्येकाकडे आपल्या लढ्याचे मुद्दे हे ठोस असले पाहिजे या ग्रेटा थनबर्गच्या विचारसरणीने आज अनेकजण प्रभावित झाले आहे. ग्रेटाची विचारसरणी ही केवळ वाचिक नाही तर थेट आत्मसात करण्यास भाग पाडणारी आहे. पर्यावरणाचा विचार हा सुरुवातीपासून झाला तरच या लढ्याला संघर्षाला एक बळ मिळेल म्हणून ग्रेटाने आपल्यासोबत आपल्या कुटुंबालाही बदलवलय.. घरच्यांना शाकाहाराकडे प्रवृत्त करताना त्यांची पुर्ण जीवनशैली बदलवून टाकलीय . केवळ ग्रेटामुळे आज अनेकांनी हवाई प्रवासाला नकार देण्याची भुमिका स्विकारलीय.. विमानामुळे कार्बन उत्सर्जनाचा मांडलेला विचार एवढा प्रभावी आहे, कि स्विडनच्या जनमानसावर नो एअर ट्रॅव्हलिंग मोहीम जनसमर्थनीय बनलीय.

ग्रेटा आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यामध्ये सगळ्यात कमजोरीची भुमिका ठरणारी गोष्ट हीच तिचे बलस्थान ठरलीय. तीचे वय हा तीच्यासाठी, कमजोरी न ठरता उलट तीचे म्हणणे जगाने ऐकून घेण्यासाठी सगळ्यात प्रभावी ठरणारी गोष्ट बनलीय.  सप्टेंबर २०१९ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात तिने पर्यावरण विषयक आपली भुमिका कळकळीने मांडताना तिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना " how dare you" हा प्रश्न विचारला तेव्हा निरव शांतता म्हणजे काय याचा अनुभव अमेरिकेलाही आला. ग्रेटाचे भांडण उभ्या जगाशी आहे, मग त्यात व्लादिमीर पुतीन ही आलेच की ! पुतीन यांनी तिच्या लढ्यावर केलेली नकारात्मक टिप्पणी धाडसी ग्रेटाने स्वताच्या ब्लॉगची ओळख बनवली आणि अगदी पुतीनच्या शब्दात लिहिलं, "एक दयाळू, पण कमी समज असलेली मुलगी " ! दोन राष्ट्राध्यक्ष यांचा हा अपमान म्हणून न पाहता पर्यावरण धोरणावर ग्रेटाने केलेली ही टिप्पणी आहे.

ग्रेटाची लढाई मोठी आहे, आणि तिच्या लढ्याला नैतिक अधिष्ठान आहे. २०१९ मध्ये तिला नोर्डीक कॉन्सिल च्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी देण्यात येणारा पुरस्कार देण्यात येणार होता. तब्बल ५२ हजार अमेरिकी डॉलरची रक्कम असणारा सन्मान तीन नम्रपणे नाकारला. ते नाकारताना ती फक्त एवढंच म्हणाली की, "या चळवळीला पुरस्काराची गरज नाहीय, फक्त सरकारचे लक्ष वेधण्याची गरज आहे." भल्याभल्या मोठ्यांकडे नसलेला अलिप्तवादाच्या ठिपक्यातून ती एकसंघ जगाची रांगोळी काढतेय.

या मुलीला वेड लागलंय का हा आपला एक अनाकलनीय कौतुकमिश्रित प्रश्नाच्या पल्याड जाऊन ग्रेटा , तिची चळवळ समजून घेतली पाहिजे. पण ग्रेटा एस्पर्गर सिंड्रोम ची पेशंट आहे, एवढीच काय ती अनेक राष्ट्रप्रमुखांची चिंता आहे. तिला स्वतःबद्दल कसलीही फिकीर नाही. तिच्यातील सजगतेला आव्हान देताना भले भले खुजे झाले आहेत हे वास्तव आहे. आणि म्हणूनच तिचे मोठेपण आभाळभर झालेय. टाईम मासिकाने तिची दखल २०१९ मधील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून घेतलीय. पण मला वाटते अशी व्यक्ती ही शतकातील प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या यादीत बसली तरी कुठे वावगे ठरेल म्हणा !

ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांनी तिच्या चळवळीवर पिर्रलहा अशी खास पोर्तुगीज भाषेत टिप्पणी केली होती. पिर्रलहाचा अर्थ होतो वेडपट मुलगी! वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसाचं इतिहास घडवतात अशा वाक्यात इतिहास शोधणारी माणसे आपण वर्तमानही याच वाक्यात शोधायला पाहिजे हे विसरलो. हे शोधण्याची का गरज आहे याचं एक निमित्त ग्रेटा थनबर्ग ठरलीय. प्रत्येक टिप्पणीला ती स्वताची ओळख बनवत गेली. 'विश्वाचे आर्त' या पेक्षा तरी वेगळं काय असते म्हणा ?

Comments

  1. खूप भारी लिहिले आहेस, यातून माहीत नसलेल्या अनेक गोष्टी समजल्या
    Greata you are such a great

    ReplyDelete
  2. मस्तच लिहिलं आहेस ऋषी, सलाम ग्रेटा

    ReplyDelete

Post a Comment