लमाणवाटा

या क्षणाची एक मोठी बातमी येतेय..

'ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचे निधन'

बातमी डोळ्यांनी वाचून, मेंदूला बधिरता येईपर्यंत पुढची कमांड आली, सुमित राघवन आहेत फोन वर त्यांची प्रतिक्रिया घे. आमच्या क्षेत्रात तुम्ही रिऍक्ट व्हायचच नसतं म्हणा.. 

मी सुरू झालो,"आपल्या सोबत आहेत सुमित राघवन, सुमित पुढच्या काही पिढ्या लागू म्हणजे सुमित राघवन असे वाटेल असा एवढ्या प्रतिभावंत आयुष्य साकारलेला कलाकार आज निघून गेलाय, काय भावना, काय आठवणी ?"


सुमित बोलला, पण उत्तरा अगोदरचा त्याचा पॉझ अगदी फोनवरून त्याने गिळलेल्या आवंढयासह कळवा एवढा न बोलता समजलं..मला सुमितच्या शब्दातले श्रीराम लागू ऐकायचे होते.. सगळे शब्द आठवत नाही.. पण जाताना तो एवढंच म्हणाला, "लागू म्हणजे एक विचार आहे आणि विचार कधी मरत नाहीत"..


सुमितची आठवण लिहून मला पुढे जाणे भाग आहे. कारण आजही गुगलवर सर्च करताना सुमित राघवनचा श्रीराम लागू म्हणून फोटो सारखा दिसून येत होता.. काही दिवसांपूर्वी अयोध्येला गेलो होतो. तिथे श्रीरामाचा फोटो काढायला मनाई आहे. मग बाहेर बाजारात अरुण गोविल यांचे श्रीरामाच्या रूपातील फोटो विकतात आणि लोक श्रद्धेने घेतात. आपल्याला जे दाखवलं जाते तेच विकत घेत त्यातच अस्सलपण जपणारी आपण माणसं आणि त्या अरुण गोविल यांच्या राम फोटोला पुजणाऱ्या माणसामध्ये फरक कुठाय ?

श्रीराम लागू म्हणजे तेच जो नाना पाटेकर यांनी चित्रपट केला ना त्याचे पूर्वी नटसम्राट नाटक केलं होतं ना, तेच ते श्रीराम लागू.. किंवा ' आणि डॉ काशिनाथ घाणेकर मध्ये जे घाणेकर यांना सतत पाण्यात पाहायचे ना ते ते डॉक्टर लागू.. डॉक्टर घाणेकर हे ग्रेट होतेच पण डॉक्टर लागुना चित्रपट पाहून कमी लेखणार असाल तर निदान अत्र्याएव्हढे मोठे व्हा.. आता निदान अत्रे कोण हे शोधायला गुगल वर नका जाऊ !

श्रीराम लागू यांच्या कारकिर्दीबद्दल लिहायला आपण फार छोटे आहोत. पिंजरा चित्रपटापासून तर ते सूर्य पाहिलेला माणूस या नाटकापर्यंत एक रेघ ओढायची आणि त्यात आपण फक्त लोंबकळायचे, बस्स.. 

लागू डॉक्टर आहेत, आणि तेही खऱ्या पदवीसह.. त्यांचा कॅनडा वास्तव्यातला एक किस्सा त्यांच्या लमाण आत्मचरित्रात त्याने लिहिलाय.. कबीर सिंग नावाच्या सिनेमात शाहिद कपूर दारू पिऊन ऑपरेशन करतो. काल्पनिक कथा पण तरीही अंगावर काटा आला. पण दारू प्यायलेली असताना ऑपरेशन केलं नाही तर जीव नक्की जाईल अशा परिस्थितीत ऑपरेशन करण्याची वेळ आलेल्या एका डॉक्टरांनी त्या मुलीच्या श्वसन यंत्रावर ऑपरेशन करून खरंच जीव वाचवला होता.. आणि त्या ऑपरेशनची लेखी कबुली वाचायची असेल तर लमाण वाचा.. ऑपरेशन झाल्यावर ढसाढसा रडणारे डॉक्टर लागू यांचे त्यावेळच्या भाबडेपणाला आणि पिंजरातील बंद दाराआड लपून राहणाऱ्या मास्तरांना तुम्हाला शोधावेच लागेल

त्यांचे उदात्तीकरण नाही करायचंय, पण मानवी स्वभाव आणि वैद्यक धर्म याला जागत डॉक्टरांना शोधताना त्याच्या 'देवाला रिटायर्ड करा' हे वाक्य उच्चारताना मागील घटनांचा शोध आपण घेऊ त्याक्षणी तुम्हीही कदाचित तसेच म्हणाल.

असो पण पण डॉक्टर लागू म्हणजे एक विचार होते.. जोपर्यंत देव ही संकल्पना डोक्यातून जात नाही तोपर्यंत अंधश्रद्धा मिटणार नाही ही गोष्ट आज लागूंच्या निधनानंतर चर्चात्मक कार्यक्रमात आपल्याला कदाचित पटत जाईल. पण अभिनेता म्हणून डॉक्टर लागूंना शोधायला गेल्यावर तुम्हाला सूर्य पाहिलेला माणूस स्पष्ट समजत जाईल..

१६ नोव्हेंबर १९२७ मध्ये सातारच्या मातीचा रांगडेपणा ल्यालेला आवाज अस्सल श्रीमंती मिरवत राहिला. लागू यांची स्वतंत्र शैली होती पण त्यांच्यावर असलेले हॉलिवूड अभिनेता पॉल मुनी, स्पेन्सर ट्रेसी, इंग्रीड बर्मन इथपासून मराठीतील नानासाहेब फाटक, केशवराव दाते , मामा पेंडसे यांचा प्रभाव मात्र डॉक्टर स्वतःअन्य करायचे. स्वतःच्या अभिनेत्यावर डॉक्टरी अँपन चढवलेल्या लागू यांना वयाच्या ४२ व्या वर्षी फुटलाईटच्या प्रकाशातील इंद्रधनुष्य दिसले.

डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे नटसम्राट हे पहिले नाटक असा अनेकांचा गैरसमज आहे. डॉक्टर लागूंचे पहिले नाटक होते, इथे ओशाळला मृत्यू. त्या नाटकाला व्यावसायिक यश मिळाले.. पण नटसम्राट त्यांची वाट पाहात होते. १९७० मधील वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेल्या नाटकाने यश मिळवले, चमत्कार घडवला आणि एक संपूर्ण अभिनेता पारायण करायला ग्रंथ म्हणून दिला. अभिनेते काचेचा चंद्र, हिमालयाची सावली अशी नाटक सुरूच होती, अगदी गिधाडेतही लागू होते हे आठवून आठवून सांगावे इथपर्यंत !


पण १९७२ ला आयुष्याला पुन्हा कलाटणी मिळाली आणि एक चित्रपट प्रदर्शित झाला.. पिंजरा.. हे साल २०१९ असलं तरी कुठल्याच मराठी माणसाला पिंजरा चित्रपट हे काय प्रकरण आहे हे सांगावं लागण्याची वेळ येणारच नाही हेच पिंजराचे आणि त्यातील मास्तरांचे यश आहे ! त्यांनतर १९७४ चा सामना.. क्रूरपणाने साधेपणाला शरण जावे असला क्लासिक सिनेमा म्हणजे सामना.. निळू फुले आणि श्रीराम लागू एकमेकाला नडायचे आणि इथे बघणाऱ्याचा जीव जाणे म्हणजे सामना पाहणे.. त्यांनतर जब्बार पटेलांचा सिंहासन.. इथे आपण न लिहलेले बरं.. यातला एक एक अभिनेता म्हणजे अशी सगळी मोत्यांची माळ होती !

डॉक्टरांचे पदार्पण  इथे ओशाळला मृत्यू मध्ये झालंय हे जसे फार कमी जणांना ठाऊक आहे तसेच त्यांचा पहिला हिंदी सिनेमा ज्या बच्चन सोबत आहट होता हे ही अनेकांना ठाऊक नसेल. कारण तो रिलीजच नाही झाला.त्यामुळे मेरे साथ चल हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा असेल बहुतेक ! बच्चनसोबत लागू काम करतात या आनंदात हेराफेरी मुकदर का सिकंदर पण पाहिलाय.

पण मला लक्षात राहील तो लागूंचा घरौंदा सिनेमा. कॉलेजला सेकंड इयरला हिंदीला हे नाटक अभ्यासाला होते.  झरीना वहाब, अमोल पालेकर आणि साहेब असलेला मोदीच्या भूमिकेतील डॉक्टर लागू.. व्यावसायिक, नोकरदार आणि तरीही या महानगरीच्या पोटात लपलेली जी एक वृत्ती त्यांनी रंगवली होती ना त्याला तोड नाही.. नाट्यरसातील बीभत्स रस एवढा शांत असू शकतो हा अभ्यासक्रमाल प्रश्न पडावा असा तो लागू यांचा मोदी होता.. आज कॉलेज एवढी सोडून एवढी वर्ष झाली तरी कॉर्पोरेट आयुष्य जगताना ही वृत्ती, आणि डॉक्टर लागूंनी रंगवलेले मोदी दिसतच राहतात..


डॉक्टर श्रीराम लागू एक अभिनेते होते, पण त्यांचे महानपण त्याही पेक्षा ते विचारवंत होते यात कितीतरी जास्त पटीने मी पाहतो. घरच्या उंबऱ्यापासून ते अगदी लाईट आल्यावर पाया पडणाऱ्या देवभोळ्या महाराष्ट्रीयन समाजात अभिनेता म्हणून अढळपद मिळवताना त्यांनी समाजाचा विचार केला नाही.. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, देवाला रिटायर्ड करा यात जो ठामपणा होता ना तो आपण समजून घेतला पाहिजे..


डॉक्टर श्रीराम लागू यांचा रत्नागिरीमध्ये एक कार्यक्रम होता. मराठी साहित्यावर लोकसत्ता प्रायोजित होता बहुतेक. त्यात डॉक्टर लागू इंदिरा संत यांची कविता सादर करायचे. आणि ती कविता संपवताना आवाज घुमायचा आणि लागू फक्त एवढंच बोलायचे ऐक जरा ना.. ऐक जरा ना.. ऐक जरा ना! 


डॉक्टर श्रीराम लागू यांच्या आता आठवणी उरल्या आहेत..त्यांची वाचिक अभिनय आणि लमाण ही मोठी संपदा आपल्यासाठीच आहे.. ते सगळं एकदा वाचून काढा.. आणि मग एका शांत डोहाशेजारी जा.. एक खडा घ्या, पाण्यात टाका..

आणि अंगात शहारा आला ना तर तुम्ही जिवंत आहात ! 

एका दगडाला शेंदूर लागण्यापासून तुम्ही वाचवलात ना

हेच तर आहेत डॉक्टर लागू, तुमच्यात लपलेले

"ऐक जरा ना.. ऐक जरा ना..ऐक जर ना !"

Comments

Post a Comment