माझीया बोलीची कवतिके


'मातृबोलीच्या उगमाकडे ओढताना'
फेसबुक वर पोस्ट लिहायला चालू केलं. मराठी दिनानिमित्त बोलीभाषेतील उगम आणि भविष्य असलं काहीतरी भारी लिहायचा बेत होता..  तिसरा परिच्छेद लिहायला घेतला.. मी असे करतो प्रकार.. काहीकाही वेळा अगोदर शेवट लिहितो आणि मग मला कधीतरी सुरुवात आठवते.. तसच आजही होत होतो.. खांद्यावर सॅक आणि हातात मोबाईलवर टाइप करत मी चालत होतो..

तेवढ्यात ग्रीलचा आवाज ऐकून आला. दार ओढून घेण्यात आले.दुपारी बाराचा ठोका झाला आणि दर्शन बंद झाले, एवढ्या दुरून आलो आणि दर्शन बंद झाले..

पुण्यक्षेत्र आळंदी ! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी ! संजीवन शब्द जिवंत करणारी आळंदी ! उण्यापुऱ्या आयुष्याची किंमत सांगणारी आळंदी ! काशीवारणासी पेक्षाही कदाचित काकणभर जास्त पुण्य देणारी ज्ञानराज माऊलींची भूमी !

आज खूप वर्षांनी मंदिरात आलो होतो.. पण नेमका रांगेत आलो आणि दर्शन बंद झाले..तासभर कोण थांबणार या रांगेत..म्हणत पुन्हा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आळंदीच्या दर्शन मंडपातून पुन्हा बाहेर पडणे हा अनुभव म्हणजे पाय जड करत स्वताच्या देहापासून स्वताला दूर लोटत नेणे असते.. देहाला जडत्व येणे म्हणजे काय हे तिथे समजते.. पाय मोठे करत त्याच रांगेतून पुन्हा मागे जायचे.. कुठं चाललाय बाबा या म्हाताऱ्याच्या प्रश्नाला आपणाकडे उत्तर नसते.. पण मी बाहेर आलो.. मंदिराच्या बाहेर त्या फेरी मारून त्या अजान वृक्ष परिसरात येऊन शांत बसलो.. 

ही जागा विलक्षण शांत आहे.. डोक्यावर ऊन असले ना तरी पानाच्या सावल्यांचा मांडव तुमच्या डोक्यावर असतो.. मी शांत बसलो, सॅकमधून पाण्याची बॉटल काढली.. भूक लागली पण उठवत नव्हते.. अचानक मिनिटापूर्वीची चित्र आठवली.. बॅगेत पाण्याच्या बॉटलखाली खाजाची पुडी तशीच होती.. जत्रेत घेतलेली सॅक मध्ये तशीच राहिली होती.. सगळ्यांना वाटूनही का आणि कशी उरली ठाऊक नाही.. पण उरली.. पुडी फोडली आणि एक खाजाची कांडी खाल्ली.. खूप वर्षांनी खाल्ली.. इतरांना देण्याच्या नादात खूप वर्षात खाजे खाल्लंच नव्हते.. या टळटळीत उन्हात, गूळ पाणी हा योग खाजाने जुळवून आणला.. मी स्वतःशीच हसलो..

खूप वर्षांनी पाकिटातले खाजे फोडून हातात घेऊन तसाच बसलो.. बाजूला पठण सुरूच होते.. डोळे मिटत होते.. तेवढ्यात कानावर आवाज आला 'खाजे'..

मी डोळे उघडले.. मस्तपैकी कानावरचा आवाज जेवढा गोड होता तेवढ्याच देखण्या चेहऱ्याचा एक सातवी आठवीतला पोरगा समोर उभा होता.. मी म्हंटलें, "नमस्कार माऊली, शेवकांडी घेणार का " तो पोरगा परत गोड हसला.. "अंह, शेवकांडी नाही हे खाजेच ना"

मला गंमत वाटली.. इथे मुंबईत भल्या भल्याना खाजे म्हणजे काय ते समजाऊन सांगताना जीव येतो आणि इथे हा पोरगा मस्तपैकी मला खाजे म्हणून दाखवत होता.. पण मला अप्रूप वाटले की वारकरी संप्रदाय शिक्षण घेणाऱ्या मुलाला खाजेबद्दल डिटेल कसे ठाऊक ?
चालू द्या तुमचे म्हणत तो निघत होता, तेवढ्यात मी त्याला थांबायला सांगितले.. काहीतरी इंटरेस्टिंग वाटत होते हे प्रकरण.. मी म्हटलं जरा बसा इथे म्हणून झाडायला काहीतरी शोधू लागलो.. तेवढ्यात परत आवाज आला "काय हिराची झाडू शोधताय?"

या वाक्यांनंतर माझी दुसरी विकेट पडली.. मला एकवेळ माझा अपमान केला तरी चालेल पण मालवणीत कोणी माझी विकेट पाडली की मी सैरभैर होतो.. तो बसला आणि बसताना पुन्हा ओवी पुटपुटला..
"अस्थींचे नळे निरपे । शिरांचे #हीर ओरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥ " अध्याय सहावा, ओवी २३४ वी.. ती माऊली म्हणजे तो मुलगा हसून म्हणाला.. यातला जो शिरांचे हीर म्हणजे तुमच्या हिराची झाडू असते ना ते हीर ! 

तो बोलत होता आणि मी ऐकत होता.. हीर ज्ञानेश्वरीत इले खयन हा टिपिकल मालवणी प्रश्न डोक्यात घोळत असताना त्याने खाजाची पिशवीकडे बघून मला विचारले.. "खूप गोड असते का हो हे खाजे ?" मी म्हटले असते रे, पण साधेसेच.. "नाही काहीतरी यात वेगळेपण गंमत असेल ना.. 

"हेका खाजा खावचा असतला, आणि ह्यो बरोबर पिंपळाच्या खाली भर दुपारी मागूक इलो हा" असला नापक विचारही येऊन गेला.. घसा कोरडा पडला होता.. "खयचो तरी गोडो देव , गोडो भक्ष मागता " म्हणत मनातल्या मनात स्वतःची समज घालत मला दरदरून घाम फुटला.. मी विचारले "कोण आहेस? तुला काय हवंय "?  तो खाजे म्हणायला, आणि डोक्यावर पान पडायला एकच वेळ झाली.. मी फुल्ल घाबरलो ना.. तो म्हणाला अहो मला खायचे नाही, बघायचे आहे फक्त.. मी विचारले असे का ? 

तो ते खाजे हातात घेत म्हणाला, "जैसा वायसीं चंद्र नोळखिजे। तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि #खाजें । चकोरांचे .. अध्याय सहावा, ओवी २९ वी" तो मुलगा पुढे बोलला..ज्ञानेश्वर माउलींनी लिहिलेला शब्द खाजे हा शब्द मी वाचला तेव्हाच मनाला गोडी वाटली, साक्षात माउलींनी लिहिला म्हणजे किती अवीट गोडीचा असणार?

त्या प्रश्नात मी आजपर्यंत इतरांना खाजे वाटताना मला का ठेवला नाही या प्रश्नाचे उत्तर कदाचित असेल म्हणा.. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला "तुम्ही मालवणी आहात ना ? मी मगाशी मंदिराबाहेर तुम्हाला फोनवर मालवणी बोलताना ऐकले होते.. आवडते मला मालवणी ऐकायला.. मस्त मधाळ आहे.. अगदी ओवी गुणगुणावी तसे मालवणी ऐकायला छान वाटते..." 

तो बोलत होता आणि माझ्या मनात नवा प्रश्न जन्म घेत होता.. साधारणपणे सातशे वर्षांपूर्वी रचलेला ज्ञानेश्वरीग्रंथ.. 
त्याच्या लेखनाचा काळ आणि भौगोलिक प्रदेश विचार केला तर त्यात कोकण कुठेच नव्हते.. मग त्यात खाजे आणि हिर कसे.. म्हणजे ज्ञानेश्वरीतील अनेक मराठी शब्द ही आता वापरात नाहीत. पण आजही मालवणी शब्द मात्र ज्ञानेश्वरीतही आहेत आणि वापरातही आहेत..
ही गोष्ट काल्पनिक आहे म्हणा.. हे इथे सांगायला हवं.. कारण पुन्हा आपण माऊली शोधायला जाऊ आणि माऊलींची मालवणी दूर राहील!पण ज्ञानेश्वरी या मराठीच्या आभाळातील ही मालवणीची नक्षत्रे आपण पाहायला हवी.. ओळखायला हवी..

मुडा गवत आणि गवताचे वेठ वापरून बांधलेली पेरणीसाठी ठेवलेल्या भात बियांची मोटली.  त्याबद्दल नवव्या अध्यायात ३९ ओवीत माऊली म्हणतात
#मुडा फोडून बीज काढिले । मग निर्वाळलीये जागी पेरले। तरी ते सांडी विखुरी वाया गेले । म्हणोचि नये॥..

बिरडे म्हणजे दोरीची सरकती गाठ हा फार जुना शब्द आहे. तो ही आढळतो , "म्हणे कैसे हे #बिरडे फिटेल । कैसा स्वामी भेटेल ।युगाहुनी वडील । निमिष मानी॥" अध्याय १३ वा,ओवी ३७८

गोरवा हा अस्सल गुरे ढोरे बद्दल वापरणारा शब्द , त्याचाही उल्लेख आहे
आणि प्रजा जे झाली। ते वसती कीर आली। #गोरुवें बैसली । रुखातळीं॥।....अध्याय १३,ओवी ५९६

कानी म्हणजेच लहान दोरी बद्दल बोलताना माऊली १४ व्या अध्यायात १५८ व्या ओवीत म्हणतात, "ऐसे सत्त्व सुखज्ञानी । जीवासी लावुनी #कानी । बैलाची करी वानी । पांगुळाचिये॥...

अजगराला आर फक्त मालवणी मुलुखातच म्हणतात.. त्यावर माऊली म्हणतात..
अंत्यु राणिवे बैसला । #आरें धारणु गिळिला । तैसा गर्वे फुगला । देखसी जो॥...अध्याय १३ वा आणि ओवी ७२४ 
ऐलाडी आणि पैलाडी या शब्दांचा उल्लेख ही माऊली घेतात. प्रवृत्ती माघौती मोहरे। समाधी #ऐलाडी उतरे। आघवे अभ्यासे सरे । बैसता खेवो॥ अध्याय ६,ओवी १९१
आणि
मग समुद्रा #पैलाडी देखे । स्वर्गीय आलोचू आइके।मनोगत ओळखे मुंगियेचे ॥ (अध्याय ६,ओवी२६९

कोलती किंवा कोलीत म्हणजे काय हे मालवणी मुलुखाला सांगण्याची गरज नाही. माऊली त्याचाही उल्लेख करतात.
हे बहु असो झडती । अंधारे भोवंडिता #कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार.

ज्ञानेश्वरीतील हे मालवणी बोलीतील भाषा वैभव आपण जपले पाहिजे.. ही शिव्यांची भाषा नाहीये. मालवणी ओव्यांची बोली आहे.. ओवीराज ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये दाखले म्हणून देण्यात आलेली ही रूपकांची बोली आहे... आज सहज सर्च करताना हे अमाप वैभव समोर गवसलंय.. अजूनही खूप असेल म्हणा.. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की हे वैभव ठेवायचे कुठे आणि जपायचे कोणी ?

आपला ऋषी देसाई
जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा

Comments