क्वांलटाइन

तो शांतपणे पाहत होता, त्याला सगळं ठाऊक होता म्हणा..

शांतपणे शेजारतीची गर्दी पाहत बसला होता. आज सगळ्यांनाच दाटून आले होते.. प्रत्येकाच्या डोळ्यातून जणूं चंद्रभागा वाहत होती.. राम राम हरेला तर फक्त हंबरडा फुटायचा बाकी होता.. आरतीचे ताट फिरवलं जात होतं. त्या तवेवरची ती आच पापण्याला लागताच दोन थेंब घळकन ओघळायचे.. 

हा हा म्हणता सगळी गर्दी पांगली.. तो शांतपणे दगडी डोळ्यांनी हे सगळं पाहत होता.. आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याने तो आवाज ऐकला.. कर्करकर..आवाज पार सगळ्या आसमंताला छेदत नजरेसमोरचे दार खडकन बंद झाले.. दाराला ना आतून कडी नव्हती ना बाहेरून कडी होती.. पण आज आपणच चालवत असलेल्या जगापासून खूप दूर लोटला गेला होता..

संपूर्ण राऊळ पहिल्यांदाच रिकामे झाल्यासारखे तो पाहत होता.. डाव्या बाजूच्या खिडकीला पाहिलं तर नाथांच्या पायरीवर सुने सुने होते.. आणि उजव्या बाजूच्या खिडकीत चंद्रभागा मात्र तशीच वाहत होती.. एरवी कधी खळबळ न करणाऱ्या त्या पात्रात आज अनामिक हट्टीपणाचा सूर होता.. 

तेवढ्यात लक्षात आलं, आपला पण एक संसार आहे.. आईसाहेब तशाच उभ्या होत्या.. शांतपणे कावरा बावरा झालेला जीव पाहत त्याही आता शांत होत्या.. त्यांनाही हे नवखे होते.. आईसाहेब आईसाहेब म्हणत त्यांच्या पायालाही बसणारा वेढा कितीतरी वर्षांनी आज बसत नव्हता.. पण तरीही त्यांनी पतीदेवांना 'जरा घरी शांत बसा' याची फक्त जाणीव करून दिली. त्यांना पक्के माहीत होतं, ह्यांना दटावले नाही तर आमचे हे लगेच रूप बदलून जातील तिकडे मंगळवेढ्याला नाहीतर तिकडे कुठेतरी गायी चरायला.. कसला कसला म्हणून विश्वास नाही या माणसाचा.. लोकांना वाटत हे इथे अठ्ठावीस युगे उभे आहेत.. मला माहित आहे ना, यांचा पाय कुठे घरात थांबतो.. जरा कुठे कोणाच्या मनात कालवा झाला की हे निघाले लगेच तुळशी हार घालून.. काहीच काम नसेल तर अगदी कळसावर चढून चंद्रभागेपल्याड उभ्या असणाऱ्यांना दर्शन देत बसतील.. काही काही कळत नाही, आता आपल्याला दर्शनासाठी लोक रांगा लावतात.. तर आमचे हे ज्यांना दिसत नाही त्यांच्या दर्शनाला काय काय पराक्रम करतील देव जाणे..

आईसाहेबांचा राग आज जरा सात्त्विकच होता, पण शेवटी रागच तो.. त्या मुकेपणाने बोलत होत्या.. आणि तिकडे स्वारी हो ऐकतोय, नाही कुठे जात मी म्हणून शांतपणे मुकेपणाने उत्तर देत होत्या.. आणि सगळा मौनांचा खेळ पाहत कोण होत तर त्या प्रासादातील दगडी खांब.. एरवी कोण आलं तर दमून आलास का रे असे म्हणणारे ते स्तंभ लोकांसाठी देव बनले होते.. तो सोळखांबी खांब तर माऊलींच्या भेटीनंतर प्रत्येकासाठी माऊली म्हणून गळाभेट द्यायचा.. आज तोही एकटा होता..

स्वारी आज हलली असती तरी पाहणारे कोण होतं म्हणा.. पण स्वारी हलली नाही.. त्यांना वचनाची आठवण आली. ते फक्त एकासाठी वचन नव्हते ना.. त्या एका वचनामुळे अठ्ठावीस युगे लोटली..पण किती जण इथे येऊन याची मोजदाद नाही.. काहीच देत नाही तरीही लोक रांगा लावून भेटायला येतात.. नुसते गावाचा नाव उच्चारले तरी त्यांना मिळणारे अनामिक सुख त्यांना मोठं असते.. 

आज ते प्रासादातील सुख रिते झाले होते..आईसाहेबांना सगळं कळत होते..  त्यांनी मुकेपणांनी संमती दिली. स्वारी सगळ्या प्रासादात फिरली.. रिकाम्या मंदिरातही तो जय जय रामकृष्ण हरी नाद अनाहत घुमत होता.. सकाळी एका माऊलींच्या हातातले एक तुळशीचे पान जमिनीवर पडले होते.. बरोबर लक्षात होते स्वारींच्या.. अलगद ते पान उचलले आणि मस्तकाला लावले.. 

थोडं पुढे एका खांबावर मिठी मारताना एकाचा मस्तकाचा बुक्का आणि चंदनकण खांबाला चिकटला होता.. तेवढाच अलगद चंदन कण बोटाने टिपला आणि आपल्या माथ्यावर लावला.. काही वेळापूर्वी उतरताना माथ्यावरचा एक कण घरंगळत गेला होता, अगदी त्याच जागी तो कण अलगद नेऊन ठेवला.. आणि तो बुक्यांचा कण बरोबर खळीत दडवला.. 

कधी लक्ष जात नाही, पण आज त्या दानाच्या हुंडीकडे लक्ष गेले.. विश्वासाने हुंडीत हात घातला.. मूठ गच्च भरली.. हात बाहेर यायला तयारी नाही. थोडी मूठ हलकी केली.. हात अलगद बाहेर काढला.. मूठ मोत्यांनी भरून गेली होती.. मुठीत मोती होते, मोती होते.. झबले टोपरे घातलेल्या एका पोराने माय पैसे टाकताना बघून हातातल्या चुरमुरेच्या पिशवीतून मूठभर चुरमुरे त्या दानपेटीत टाकले.. स्वारींनी त्या पैशांच्या हुंडीतून तेवढे पांढरेशुभ्र मोती तेवढे घेतले.. कितीतरी दिवसांनी चुरमरे प्रसाद म्हणून खाल्ले.. अगदी त्या काल्याची आठवण झाली..

स्वारी पुढे चालत आली.. अचानक दाराजवळ थबकली.. दार बंद होते.. हे दार उघडणे अशक्य अजिबात नव्हते..  आठवत का जन्मवेळी सात कडी कुलुपाचे दरवाजे उघडून स्वारी यशोदेकडे गेली होती.. पण स्वारी आज दार उघडणार नव्हती.. कारण दाराला कडी कुलूप नव्हते ना.. आणि ही कडी कुलूप नसणारी दार उघडणे खूप कठीण असते म्हणा.. 

स्वारी दुरदूर नजर टाकत कुणाला तरी पाहत होती... ती आता देवाला शोधत होती.. होय देह नावाच्या मंदिरात राहणाऱ्या देवाची.. ते जेव्हा देव आता भेटायला येतील तेव्हाच दार उघडेल म्हणा.. स्वारीना विश्वास होता, देव पुन्हा भेटायला येईल.. 

स्वारी पुन्हा होती तशीच उभी राहिली, अगदी हसत हसत... त्याचवेळी चंद्रभागेच्या स्वरांनीही टाळाचा नाद घेतला होता, आणि काठावर बसून कुणीतरी कळसाकडे पाहत गात होता
..
..
"अरे कोंडला कोंडला.."

- ऋषी श्रीकांत देसाई

Comments

Post a Comment