शेतकरी आंदोलन हिंसक कोणी बनवले ?

आज प्रजासत्ताक दिन. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन दिवसांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक म्हणजे १५ ऑगस्ट १९४७, या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९. या दिवशी राज्यघटना समिती स्वीकृत केली गेली आणि तिसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५० अर्थात प्रजासत्ताक दिन. या दिवसापासून राज्यघटनेतील सर्व कलमांची अंमलबजावणी सुरू झाली. ज्याप्रमाणे आपण धार्मिक सणवार मोठ्या उत्साहाने साजरे करतो त्याच उत्साहाने प्रत्येक भारतीय काही राष्ट्रीय सणही साजरे करत असतो. त्यापैकीच प्रजासत्ताक दिन हा एक दिवस. आपण या वर्षी भारतीय प्रजासत्ताकाचा 72 वा उत्सव साजरा करत आहोत.


आज प्रजासत्ताक दिन.. म्हणजे देशातल्या प्रत्येकासाठी झेंडावंदन करण्याचा आणि त्यानंतर घरोघरी येऊन टीव्हीसमोर दिल्लीच्या राजपथावरचा भारताच्या विराट लष्करी सामर्थ पाहण्याचा हा दिवस असतो. आज सकाळी दिल्लीच्या राजपथावर दोन रॅली निघाली. एक रॅली होती, भारतीय इतिहासाच्या अभिमानाची  अर्थात लष्करी परेडची आणि दुसरी रॅली होती शेतकऱ्यांची. एकीकडे राफेलच्या धडाकेबाज वेगाने मन आभाळभर झालं. आणि त्याचवेळी त्याच टेलिव्हीजन सेटवर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीची दृष्ये समोर आली.  एकीकडे प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर परेड सुरु होती.. या परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हजेरी लावलीय. तर दुसरीकडे इथून अगदी काही किलोमीटर अंतरावर दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडालेली पाहायला मिळाली. 
दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष सुरु होता.. आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या न‍ळकांड्याचा वापर करण्यात आला. तसेच पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकर्त्यांनी काही ठिकाणी तलवारी उपसल्या. तर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात अनेक पोलिस आणि शेतकरी जखमी झाले आहेत.

मागील दोन महिन्यांपासून दिल्लीजवळ शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. आज प्रजासत्ताक दिली दिल्लीतील आंदोलनातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. यात पोलिस व शेतकऱ्यांमध्ये जारदार धुमचक्री सुरु झाली. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली दिल्ली बाहेर थांबवण्यासाठी पोलिसांनी रस्ते पॅक करुन बॅरिडेड्स‌  लावले होते. पण शेतकऱ्यांनी ते बॅरिकेड्स काढून दिल्लीत प्रवेश केला. यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये झटापटी झाल्या. पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. 

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागल.  या आंदोलनादरम्यान दिल्लीतल्या आयकर कार्यालयाजवळ  एका आंदोलकाचा मृत्यू झाला. गोळी लागल्यानं या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा दावा उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येतोय. हा गोळीबार पोलिसांकडून करण्यात आल्याचाही दावा आंदोलकांनी केला आहे. दीन दयाळ उपाध्याय मार्गावर हा दुर्दैवी प्रसंग घडलाय. या मार्गावर एक ट्रॅक्टरही पलटलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृत शेतकरी ट्रॅक्टरवर स्वार होता, असं सांगितलं जात आहे. आयकर कार्यालयाजवळ पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांकडून मोठा गोंधळ घालण्यात आला. आंदोलनकर्त्यांकडून एका डीटीसी बसची तोडफोडही करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच याच भागात काही आंदोलकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला घेरल्याचा एक व्हिडिओही समोर आलाय. काही आंदोलनकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेरल्याचं व्हिडिओत दिसतंय. परंतु, काही आंदोलकांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला. आयकर विभागानंतर दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्यामध्येही काही आंदोलनकर्ते ट्रॅक्टर घेऊन घुसल्याचं समोर आलं. तसंच काही आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर चढून झेंडा फडकावला. आंदोलकांवर नियंत्रण मिळवणं आता पोलिसांना कठिण होऊन बसल्याचं दिसतंय. शेतकरी आंदोलना दरम्यान सोमवारी रात्री लोनी रोड येथून सुमारे 300 ते 400 शेतकऱ्यांनी जबरदस्तीने दिल्लीच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या ट्रॅक्टरनी सीमेवर असलेले बॅरिकेड्स तोडले. परिस्थिती पाहून दिल्ली पोलिसांकडून तत्काळ जादा पोलीस फोर्स तैनात करण्यात आली. नवी दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग सील करण्यात आले. शेतकऱ्यांना पुन्हा भोपापुराकडे गाझियाबाद सीमेवर पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळीच थांबले होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सिग्नेचर ब्रिज आणि शाहदरा यमुना पूल सील केला.

दरम्यान हा सगळा हिंसाचार सुरु झाल्यावर लाल किल्यावर झेंडा फडकवणारे आपले कार्यकर्ते नव्हते असा दावा आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय. एवढच नाही तर,  आजच्या ट्रॅक्टर रॅलीतल्या हिंसाचाराबद्दल सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.  शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केलेल्या दाव्यानुसार, 'जे लोक अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते राजकीय पक्षांचे लोक आहेत. हे लोक आंदोलनाची छबी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत', शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर अद्यापही शेतकरी नेत्यांचं नियंत्रण आहे असेही राकेश टिकैत म्हणाले. 

एक लक्षात घ्या की काल महाराष्ट्रात पाहिलेला शांत मोर्चा आणि आज दिल्लीचा मोर्चा या दोघात जमीन आस्मानाचा फरक आहे. कालच्या मोर्चालाही अडवण्यात आले. त्यालाही भेट मिळाली नाही.. पण त्यांनी शांतपणे विरोध करत, आझाद मैदानाची वाट धरली.. मग जे महाराष्ट्रात मुंबई पोलीसांना जमलं ते दिल्ली पोलीसांना का जमलं नाही.. दिल्ली पोलीसांवर नियंत्रण दिल्ली सरकारचे नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मग आज असे नेमकं काय घडले की पोलीस आक्रमक झाले.. अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या. सौम्य लाठीमार झाला.. आंदोलक हिंसक बनले.. उत्तर कुणाला ना कुणाला तरी द्यावेच लागणार.
अर्थात सरकार पातळीवर आता हालचाली घडू लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात सुरू असलेली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  बैठकीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अनेक संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यास सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी अजूनही हिंसाचाराची शक्यता वर्तवली आहे.

आणि मग जर सरकारने ही शक्यता वर्तवली असेल तर मग आता जबाबदारी कोण घेणार.. आज दिल्लीत नुकसानी झाली उद्या संपूर्ण देशात हेच चित्र घडण्याची वाट पाहणार का.. लक्षात घ्या शेतकरी संघटनानी हे आंदोलक आमचे नव्हते हीच भूमिका घेतलीय. मग प्रश्न हाच निर्माण होतो की हे हिंसक गुंडागर्दी करणारे नेमके कोण आहेत.. ही गुंडागर्दी नेमकी कोणी केली आणि या हिंसक घटनेची जबाबदारी आता नेमकी कोणाची. या पुढचे शेतकरी आंदोलन नेमकं कसे असणार यांची चर्चाही आता या चळवळीला करणं गरजेचं बनलय.
लोकसमुहाचे आणि आजपर्यंत वाचलेल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील लोकशाहीचे अवलोकन करण्याची वेळ आलीय. ‘लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी निवडलेले सरकार’ अशी लोकशाहीची पहिली व्याख्या अब्राहम लिंकनने केली व तीच पुढे सर्वमान्य झाली. प्रजासत्ताक हे ज्या पायावर उभे आहेत त्या संविधानाचा आणि कायद्याचा आपल्याला कधीही विसर पडता नये.. आणि त्या सगळ्या गोष्टी प्रशासन म्हणून कायद्याच्या बडग्यात आहेत त्याच्याबद्दल राजकिय विरोध असला तरी एका सभ्यतेनी त्या विचारांचा विरोध करायची भावनाही जगवली पाहिजे. लोकशाही असो किंवा प्रजासत्ताक या सगळ्या व्याख्येत शेवटी नागरिक हाच घटक प्रचंड मोठा ठरतो.. प्रत्येक वेळी सत्ताधारी किंवा कुठला तरी राजकीय पक्ष आपल्या विचारधारेला पटत नाही म्हणून आपण आपली अस्वस्थता समाजात मांडून त्याला समाजाची अस्वस्थता मांडणे हे चुक आहे. 
आज प्रजासत्ताक दिन... समस्त भारतीयांच्या अभिमानाचा दिवस.. आज काहीही घडलं तरी प्रजासत्ताक दिन प्रत्येकाच्या मनात प्रजासत्ताकच राहणार.. आणि शेतकरीही बळीराजाच राहणार,, आणि जो दिल्लीच्या रस्त्यावर दंग घालत होता तो शेतकरी नव्हता.. कारण शेतकरी असता तर त्याने पोलीसांवर तलवारी उगारल्या नसत्या.. पोलीसांवर लाठ्या उगारल्या नसत्या.. मुळात जो दोन महिने चाललेल्या शांत आंदोलनात अगदी पोलीसांनाच जेऊ खावू घालत होता आज तो त्यांच्यावर ट्रॅक्टर चालवणारा कसा असेल.. आणि या घटनेची दुसरी बाजू ही आहे की,  मुळात दिल्लीच्या राजपथावर आणि ठरवून दिलेल्या मार्गावरुन जाणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही का अडवलात याही प्रश्नाचे उत्तर दिल्ली पोलीसांना द्यावे लागेल.. 

लक्षात घ्या ही अमेरिका नाहीय.. केवळ संसदच नाही तर लाल किल्लाही आमच्या अभिमानाचा प्रतिक आहे.. त्याच लाल किल्यावरुन राष्ट्रध्वज कोणीही उतरवला नाही पण त्याला समांतर ध्वज लावायची गरज तरी काय होती.. आज हे जर हिंसक झालं नसते तर याक्षणाला आंदोलनाचीच वाहवा झाली असती.. हिंसेचे समर्थन करुच शकत नाही.. आणि आम्ही जसे मुंबई पोलिसांनाबद्दल कोणीही बोललेलं सहन करत नाही ना तसेच दिल्ली पोलीसांच्या जीवाला धोका निर्माण झाला तरी जाब विचारणारच... आजचे हिसेखोर आपले कार्यकर्ते नव्हते असा थेट पवित्रा जर आंदोलकांच्या आयोजकांनी घेतला असेल तर मग ते होते तरी कोण.. आणि यापुढेही असेचं होणार असेल तर मग दोन महिने शांततेला अर्थ तरी उरणार आहे का.. या हिंसेचे समर्थन ना शेतकरी नेत्यांनी केलंय. ना काँग्रेसने केलय. ना राष्ट्रवादीने केलंय .. ना शिवसेनेनं.. 
हिंसाचार आणि आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढण्यात आलेली ट्रॅक्टर परेड मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे. तसेच या परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या निश्चित आंदोलनस्थळी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.. जेवढे निघाले होते ट्रॅक्टर मागे परततील. दोन महिने शांत बसलेले आंदोलकही पुन्हा दिल्लीहून परतून पुनहा शांत मागण्यावर ठाम बसतील आणि प्रश्न पुन्हा तोच उरेल.. आज दिल्लीत हिंसा करुन या आंदोलनाला गालबोट लावणारे होते तरी कोण ? आणि याच उत्तर शेतकरी चळवळीलाच शोधावं लागणार आहे.. कारण ही चळवळ त्यांना उत्तरासाठी हवीय की नवे प्रश्न निर्माण करणारी..

Comments