एक होता जॉर्ज

 
‘मी निवृत्त होईन तेव्हा मुंबईत जाईन, युनियनकडून दोन खोल्यांचे घर घेईन आणि फक्त वाचत बसेन. माझ्या मृत्यूनंतर त्या खोल्या युनियनच्याच.’ हे उद्गार होते देशाचं संरक्षण मंत्री पद भूषवणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांचे. जॉर्ज यांचा आज स्मृतिदिन.. म्हणून आज हे वाक्य आठवलं !

खरंतर शीर्षक एक होता की एक होते करावे या विचारात असताना ज्या अरेतुरेत राज कपूर बसतो, ज्या अरेतुरेत धर्मेंद्र बसतो, अगदी त्याच एकेरी संबोधनच्या यादीत जॉर्ज नावाचा भला माणूस बसतो.. 

विस्कटलेले केस, हिरवा खादीचा सदरा या वेशात असलेला हा माणूस अनेकांच्या संतापाचे प्रतीक, रागाचा एल्गार होता. धनिकांच्या मुंबईला थांबवणारा तो पहिला बंद सम्राट होता.. जॉर्ज हा जॉर्ज होता. 

तुम्हाला मी हे सगळं लिहिताना अजूनही हा माणूस अनोळखी वाटेल..पण मी एक सांगू का, 'प्रत्येक माणूस त्या क्षणापर्यंत अनोळखी वाटतो, ज्या क्षणापर्यंत तुम्ही त्याला ओळखत नाही'.. माझे लिहिण्याचे आणि जगण्याचे हे तत्वज्ञान आहे. संजय राऊत याच जॉर्ज वर पुढचा बायोपिक आणतायत यावरून हा समाजवादी व्हाया हिंदुत्ववादी विचार किती वाचनीय जगला असेल हे समजून येईल..

जॉर्ज ज्या काळात मुंबईत मोठे झाले तो काळ आणि राजकारण भन्नाट होते. हा पहिला नेता होता की ज्याने मतदारांना असे काही आवाहन केलं की बंद झालेल्या आशा नव्याने पल्लवित झाल्या. “होय, तुम्ही सका पाटलाला पराभूत करू शकता” या एकाच ओळीच्या जोरावर प्रचार करणाऱ्या जॉर्ज यांनी सन १९६७ च्या निवडणुकीत एकेकाळी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या स.का.पाटील यांना चारीमुंड्या चित केलंत. तुम्ही जिंकू शकता या सुरुवातीसाठी तुम्हाला तो काळ वाचावा लागेल !

संरक्षण मंत्री असताना त्यांनी पोखरण अणु चाचणी केली. ते देशातील एकमेव संरक्षण मंत्री ठरले ज्यांनी ६,६०० मीटर उंचीवरील सियाचीन ग्लेशियरचा १८ वेळा दौरा केला. पोखरण अणूचाचणी स्फोटात त्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही..

आज ज्या कोकण रेल्वेचे स्वप्न नव्हे सत्य म्हणून जगतोय ना, त्यांच्या प्रवासात मधू दंडवते यांच्यानंतरच्या निर्माण झालेल्या खोल राजकीय दरीत इ श्रीधरन यांना पुढे नेणारा सर्वात उंच खांब जर कुणी असेल तर ते म्हणजे फक्त जॉर्ज फर्नांडिस.. 

जॉर्ज यांची कुणकेश्वर जत्रेच्या वेळची सभा, मालवणच्या टोपीवाला ग्राऊंडवरची सभा, त्याच्या त्या अंधुक आठवणीत आता कोणाला फारसा इंटरेस्ट नसेल म्हणा.. तेव्हा कुठे मोबाईल होता म्हणा? बातम्यांचे स्क्रीनशॉट जपून ठेवायला? सगळ्यांनाच सोयीस्कर अल्झायमर झालाय, जॉर्जच्या अखेरच्या दिवसासारखा. मागच्या वर्षी याच दिवशी जेव्हा जॉर्ज गेलं तेव्हा कळलं की ते सहा वर्षे अल्झायमरशी लढत होते.. कदाचित बंद दारातून स्वताशीच संप पुकारून एक आयुष्य जगत होते..

पण हा अल्झायमर खूप वाईट असतो राव, काहीच आठवत नाही, सगळेच अनोळखी वाटतात. एक वर्ष उलटून गेल्यावर निदान चेहरे तरी आठवतात.. नंतर नंतर तेही विसरायला होतील.. जमलं तर ही माणसे ह्या आठवणी जपल्या पाहिजेत.. बाकी काही नाही हो, माणसे न ओळखता येणे, काळ न ओळखता येणे यालाच तर अल्झायमर म्हणतात ना ?

- ऋषी श्रीकांत देसाई

#श्रद्धांजली
#स्मरण #चिंतन

Comments