हृदयी 'वशाट' फुलताना !

गोष्ट पहिली : भेजा

लग्न होण्यापुर्वीचा किस्सा आहे. एकेदिवशी डब्याला काय न्यावं हा विचार सुरु असताना एक फालतुगिरी सुचली.. चार पिकी केळी  कापलं, त्यात दूध ओतलं, साखर गूळ वेलची टाकली. झाला डबा रेडी. आणि कॅंटीनला चपात्या घेतल्या. वृत्तनिवेदक भुषण करंदीकर जरा जवळचा मित्र.. तो आणि मी एकदम जेवायला जायचो.. त्याला सांगितलं बघ, आज अजिबात खोबरं नसलेला आयटम आणलाय.. हा आपण पहिल्यांदाच बनवलाय. त्याने पहिला घास घेतला आणि हसत सुटला.. ऋषा याला 'शिकरण' म्हणतात.. 
मी म्हटलं "मला काय ठाऊक, आपण कसलं आयुष्यात खाल्लंच नाही ना".. 

गोष्ट दुसरी : रगती
लग्न झाल्यानंतरचा किस्सा आहे. वृत्तनिवेदक मित्र अजित चव्हाणच्या घरी आम्हा सगळ्या एंकर मित्रांला जेवायला बोलवलं होतं. सगळा नाशिक स्टाईल काळ्या मसाल्यातला प्रकार होता म्हणा.. अजितने जेवायला पगंत बसवली, आणि स्वत वाढायला आला. आम्ही जेमतेम जेवणारे.. अजित म्हणाला आज जरा स्पेशल आहे.. आणि मोठ्या चमच्यातून लेगपीस काढू लागला. काळ्या मसाल्यातल्या चिकनची चव ठाऊक होती.. पण पहिला घास घेतल्यावर जाणवलं हे काहीतरी वेगळं आहे.. अजित म्हणाला हे जरा आज शाकाहारी स्टाईलने चिकन आहे.. मी म्हटलं याला काय म्हणतात.. तो शांतपणे म्हणाला, "तुपातलं चिकन".

आयुष्यात चमचाभरही तुप न खाणारा माणूस मी ताटातल्या दोन मोठ्या वाट्या काळ्या चिकनचा रस्सा आणि पाच लेग पीस माझ्याकडे बघून हसत होते. 

आयुष्यात चिकन हा आवडता प्रकार असूनही मनाने नाकारलेला तूप हा प्रकार हा अक्षरश मला खात होता. त्या दिवशी अजितच्या धमकीने ते सगळ ताट संपवताना मला आयुष्याचा पावसातला वडखळ नाका झाला होता.. संपता संपत नव्हतं.. 

या दोन गोष्टी लिहायचे कारण जरा वेगळं आहे. म्हणजे गोष्टी आणि त्याच्या शिर्षक जशी वेगळी आहेत त्यापेक्षाही मुळ लेखाचे शिर्षक त्यापेक्षाही वेगळं का आहे? असे अनेक प्रश्न या क्षणाला उपस्थित झाले असतील म्हणा. पण एक नक्की की असं काहीना काही वेगळं नक्की घडलं असेल.. आपल्याला ते ठाऊक नाही याच्याकडे तुम्ही कसे बघता यावर अनेक गोष्टी कुतूहल किंवा नकार म्हणून पाहत असता.. 

सुरुवात नावापासून करुया,  मागचे काही दिवस वशाटबद्दल प्रचंड चर्चा सुरु आहे.  वशाट म्हणजे काय तर बकऱ्याचे मटण.. वशाट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पुरोगामी विचार मांडणारा मंच आणि सोबतीला मटणाच्या नळ्या असा सगळा बेत असतो. तुम्हीही वाचलं असेल आणि त्याच वेळेला वशाटच का असाही एक मोठा प्रश्न आला असेल म्हणा.

रुढार्थाने गावकुसाबाहेरच्या जगण्याच्या गप्पा किंवा टिपीकल व्यवस्थेला छेद देत मांडलेला हा विचार असं याचे ढोबळ स्वरुप आहे. मुळात दही तुपाला कडवट विरोध ही राजकीय भूमिका समजून घेतली तर टिपीकल वशाट का हे सगळं समजून जाईल म्हणा. पण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या वशाटच्या निमित्ताने काही गोष्टींचे आवर्तन करण्यासाठी आता बोलतं होण्याची गरज आहे. विचार थोडा वेगळा आहे. पण खुप काही रिकॉल करणारा आहे.. बकऱ्याचे मटण खाणं एवढंच हा मर्यादित विचार नाहीय, मुळात ज्याला किचनच्या बाहेरचं खाणं हा विचार अजून पडवीतच का शिजवला जातोय. तो घरच्या किचनमध्ये का आणला गेला नाहीय. ही जी मानसिकता आहे ना त्याचाच हा पुण्यातला उरुस आहे.

विचार करा, की या लॉकडाऊनमध्ये तुम्ही अनेकजणांना मालवणी रेसिपीची व्हीडीओ आणि त्याचे यु ट्युब चॅनेल प्रमोशन करताना पाहिलं.. पण त्यात कोणी 'चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेले कोंबडीच्या काळीजची' रेसिपी किंवा 'नळ्यात भाजलेला सुखट' असे काही ऑफबीट दाखवलं होते का?  हे ही खाद्यच आहे ना. आणि प्रत्येकाच्या घरात कोण ना कोण तरी खाणारा असतोच ना.. पण तरीही आपण नाकारलं कारण त्याला प्रतिष्ठा नाहीय. कुठल्या खाण्याला कोणी प्रतिष्ठा द्यावी, हा मुद्दा का मोठा झालाय कारण आपण माणसाच्या खाण्यावर त्याची जात ओळखणारी माणसं झालं आहोत. 

आता परत यात मोठी गंमत ही आहे की आम्ही ती माणसे आहोत की, कोंबड्याचे आणि बकऱ्याचे यालाही मटण म्हणतो. चिकन वेगळे आणि मटण वेगळे हे आम्हाला शहरात आल्यावर समजते. आणि याच शहरात आम्हाला ओरडून ओरडुन सांगावे लागते की मोरी नावाचा एकमेव मासा आहे की ज्याचे फक्त मटण होते.. 

मी स्वतहा वन्य जीव कायद्याचे समर्थन करत असलो तरी गावसंस्कृतीच्या रेट्यातून काही गोष्टी नमूद कराव्याच लागतील. हा लेख इथपर्यंत छान छान आहे. या पुढे वाचताना मात्र स्वताच्या रिस्कवर वाचा. कारण मत्स्य संस्कृतीच्या माझ्या जिल्ह्यात तब्बल २२ तलाव क्षेत्र असताना आणि नदीतल्या पाण्याचे वाहते जलाशय असताना गोड्या पाण्यातले मासे खाता येतात यासाठी नव्याने पुढाकार घ्यावा लागतोय. अर्थात समुद्रातल्या मासे खाणाऱ्यांना नदीचे मासे पटत नाही, आणि नदीवाल्याना तळ्यातले पटत नाही. कारण चव माहित नाही. 

ढोबळ मानाने चिकनमध्ये सागोती आणि सुखा अशा या प्रकारात चविष्ठ होताना त्यात खोबरे हा प्रकार प्रचंड जिवंत असतो.. अर्थात ओल्या नारळाच्या वाटपांच्या गंमतीपेक्षा सुक्या गुडगुड्याचा वळा भारी असते म्हणा. पण या सगळ्यात बकरा मटण हा तेवढासा चर्चिला जाणारा प्रकार नसला तरी तेलापेक्षा खोबऱ्याच्या वाटपातलाही तेवढाच खतरनाक प्रकार आहे. 

बकरा मटण हा विषय एकदा का चर्चेला घेतला ना की मग सुरुवात रगतीने होते, आणि खुराला जावून चर्चा संपते. त्यात किती ते प्रकार सांगावे. रक्ती, वजरी, कलेजी, गुरदा, कपुरा, सीना, चरबी, चाप, तिळ, नळी, पाय, मुंडी, रक्ती मुंडी, खिमा, खुर...आणि किती रे लिहायचं.. संपता संपणार नाही.

पण या सगळ्या प्रकारापेक्षाही मुळ वशाटच्या निमित्ताने जो विषय चर्चिला जातोय,  तो विषयही तेवढाच वेगळा आहे. तुम्ही रानडुक्कराचे मटण खालय का. पारधीच्या निमित्ताने गावाहून एसटीने स्टीलच्या डब्यातले ते मटण गावाच्या सगळ्या वाडीला, आणि वाडीच्या घरच्या मुंबईच्या पाहूण्यांनाही पुरायचे म्हणा. अगदी कालपरवापर्यंत तुम्ही कसे काय डुकरांचे मटण खाता हा प्रश्न नव्या पिढीला पोक पिझ्झा मागवताना पडत नाही. कारण त्याचे रुप बदललय. बदलणाऱ्या रुपात आता खाण्यावरुन तुमची जीवनशैली नाही तर स्टॅडर्डं लाईफचा स्वॅग दाखवतो म्हणे.. सगळ्यालाच मीठ मसाला आणि वाटप लावून खाणं म्हणजे पुर्णत्व असेल तर आमच्याकडे रेकोबाच्या धयकाल्याला जो फक्त मसाल्याच्या पाण्याच्या चिकनमधला बांगो हा प्रचंड तिखट असूनही दुसऱ्या दिवशी का बाधत नाही हे अगम्य आहे. सगळ्यानी एकत्र बसलेला गवळदेव डोंगरकपारीत प्रत्येकाला जमीनीवर बसवतोच ना.. ही गंमत फक्त तुमच्या भुकेत नसते तर त्या क्षणाच्या निसर्गाच्या संमोहनाचीही असते कदाचित.

गावकुसवात असे 'रटमटणारे' किती प्रकार आहेत.. निषिद्ध ठरले तरी काही भागात वागळाचे मटण शोधून खाणारे आहेतच की,  आणि नियमबाह्य असलं तरी, जीवात मारुन खाणारे वाडीवस्तीत आहेच ना.. कुवाकोंबडा खातात, बदक खातात, ससा खातात, खाणारे खातात, बदक खातात, तितर खातात , कासव खातात, घोरपड आणि साळींदर पण खातात. बर त्याच्या स्पेशल रेसीपीही असतात. अर्थात हे सगळं लिहिणे वन्यजीव कायद्याच्या विरोधात आहे. मी याचे समर्थन करत नाही. पण म्हणून वास्तव नाकारुन कसे चालेल म्हणा.

अगदी चुलीत भाजून फक्त मसाला मीठ लावून कोंबडी खाणारे एका बाजूला आणि आता मालवणी बार्बेक्यू म्हणून चिकन भाजून खातानाचे इंस्टावर फोटो पोस्ट करणारे एका बाजूला.. अर्थात मुद्दा खाणे योग्य की अयोग्य हे नाहीय. हे फक्त ज्यांना आपण नागरी समाज मानत नाही ते खातात अशातला मुद्दा नाहीय. मुळात यावरुन एक गोष्ट आठवली की, हुमल्याची चटणी नावाचा एक प्रकार असतो. नेटवर जाऊन सर्च मारा, कोरोनावर औषध म्हणून प्रमाणित करताना शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवणारी हुमल्याची चटणी प्रचंड चर्चेत आलीय. तुम्हाला खा किंवा अगर नको खा, पण एकदिवस असे काहीतरी तुमच्याकडून कोणी खायचे का याचे उत्तर नकारार्थी पेक्षा ठावूकच नाही हे आलं तर कठीण आहे.

हे सगळं वाचून तुम्हाला जर तुमच्या मांसाहाराबद्दल शुद्धपणाबद्दल खात्री असेल तर काही गोष्टी सांगतो, आठवतायत का पहा.. शाकाहारी पदार्थांची काही कमालीची कॉम्बिनेशन सांगतो. तुमचे वशाट बद्दल मत बदलून जाईल. बांगड्याची उडीदमेथी, किंवा हळदीच्या पानातला बांगडा हे कायच्या काय आहे.बोंबीलाची पोपटी ठाऊक आहे का, राजेळी केळी, बटाटा आणि बोंबील हे असलं वेगळंच काहीतरी असते. बर ते मेथी बोंबील कालवण तर यापेक्षा वेगळंच असते. त्यापुढे जाऊन बोंबलाचा सांजाची रेसिपी पाहिली तर तुम्हाला वाघळे खाणाऱ्यांची पण दया येईल.  हे एवढं ऐकून मन तयार झालं की बोंबील - वाटाणा कालवण, आणि झालंच तर मेथी - बोंबील वाचतानाही तुम्हाला आता काहीच वाटणार नाही म्हणा. मग प्रश्न हा उरतो की वशाट म्हणजे फक्त मांसाहारी की शाकाहारीही होते ?  हे वर नमूद केलेले प्रकार हे आजचे नाहीत खूप जुने पारंपरिक आहेत असे सांगितले तर तुमचा भेजा हा रकतीभेजा होईल ना ? सगळं वाचून कंटाळा आला तर एक सोपी भाजी सांगतो, गोड आहे. अननसाफणसाची भाजी आणि त्यात वरून आंब्याचा रस ओतायचा. खाल्लं का ही गोड मिट्ट भाजी ? प्रश्न परत तोच आता सांगा वशाट म्हणजे नेमकं काय ?

मी दरवर्षी आठवणीने कासारटाक्याला जातो. कासारटाका हे फक्त ठिकाण आहे. पण या सगळ्याच्या निमित्ताने तुम्ही फक्त देवाला अगरबत्ती लावायला नाही जात ना.. ते कोंबडं सोलणे, ते शिजवणे, चुलीत चिकनचे तुकडे शिजवणे असो किवा मग तंदूर फ्रॉन्झचा वेगळा प्रकार असतो. या सगळ्यात जे सामिषपण असते ते फक्त खाणं नसतं तर त्या खाण्याला जोडून आलेला एक संवाद असतो तो तुम्हाला तुमचे वेगळेपण कासारटाक्याच्या मुख्य रस्त्यावर आणून सोडतो. आणि तुम्ही त्या कासारटाक्याच्या पाण्यात उतरता तेव्हा फक्त माणूस असता. आणि मोबाईलची रेंज नसलेल्या मित्रांच्या जगात असतं.. त्या खाण्यात कुठलाही सो कॉल्डपणा नसतो.. पण प्रचंड प्रामाणिकपणा असतो.. मला वाटत ते सगळचं वशाट असते..

या तिखट खाण्याच्या प्रकारावरुन आणि त्याच्यावरुन आपण ठरवलेल्या लिव्हिंग स्टॅडर्डवरुन एक गोष्ट फार आठवतेय. फार वर्षापुर्वी आमच्या घराशेजारी एक म्हातारा राहायचा.. तो आणि त्याची बायको.. लक्ष्मण त्याचे नाव.. तो फक्त चिकन कापण्यात एक्सपर्ट होता. म्हणजे त्यानी कापलेल्या चिकनची चव वेगळीच लागायची.. डोळ्यानी दिसायचा नाही पण एक धारदार कोयता घेऊन यायचा. आणि हो सोकाटण.. सोकाटण म्हणजे चिकन बारीक कापण्यासाठी लाकडाचा वापरण्यात येणारा एक भाग. त्याच्यावर चिकन बारीक बारीक कापलं जायच. वीस- पन्नास घ्यायचा.. खुप वर्ष झाली. गेला असं ऐकलं होतं. प्रश्न फक्त एकच आहे, त्याचा तो कोयता आणि त्याचे सोकाटण कुठे असेल.. ते मिळायल हवं.. त्याला चव होती.. कदाचित त्या कोयत्याला गंज आली असेल म्हणा.. आणि सोकाटण भिजून भिजून पुन्हा अळंबी घेऊन जगलं असेल कदाचित

आपण अजुनही खाण्यावरुन त्याची बौद्धीक पातळी काढणारी वैचारिक क्षमता बनत चाललोय. पुण्यातल्या वशाटच्या निमित्ताने खाणे आणि वैचारिक क्षमता हा मुद्दा वेगळ्या अर्थाने चर्चिला जातोय. पण असं काही नसतं हो.. आज काँक्रीटचे जंगल झालय. पण आपण प्रत्येक जण एक गाव सोडून शहरात आलोय. आणि आपली मुळं तिथं त्या डोंगराच्या खबदाडात, पाण्याच्या डोहात, आणि तीन दगडाच्या आत धुमसणाऱ्या लाल निखाऱ्यावर आत घट्ट रोवून बसलीय... शाकाहारी आणि माशांहारीच्या पल्याड जे एक खाण्याचे जग आहे ना त्यात एक 'वशाट' असतो. आणि हा कायमच वशाट बनून मरत राहतो,  तुम्हा आम्हाला जगवत राहतो..

- ऋषी देसाई

Comments

Post a Comment