माझी मराठी, माय मराठी

आज मराठी राज भाषा दिन..  याचनिमित्ताने हे एक विचारमंथन.. माझी मराठी माय मराठी

 मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. 

मुळात हा दिवस का साजरा केला जातो त्या प्राथमिकपणापासून ही सगळी सुरुवात करुया.. 'लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी। ', होय माझ्या मराठीचा सोहळा..  म्हणजे 27 फेब्रुवारीला..  हो त्याला कारणही तसेच आहे. अगदी जगभरातील मराठी भाषकांकडून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. जागतिक मराठी अकादमीने याकामी पुढाकार घेतला. अर्थात हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण पुढचा त्यालाच जोडून येणारा विषय पहिल्या टप्प्यावर समजून घेऊया. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार..

पण मुळात अभिजात म्हणजे काय, आणि ते सरकार ठरवणारे कोण.. तर अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत. भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे,  भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत, प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा.. हे निकष समजून घेतलं की मग सरकार पातळीवर काय सुरु आहे ते समजून घेऊया.


अभिजात भाषेचा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. भारत सरकारने आत्तापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली. 

मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे. यासारखी अनेक कामे होणार आहेत.. आजपर्यंत अभिजात कधी होणार म्हणून फक्त मराठी चळवळ आणि राजकीय पक्षांनी घेतलेली भूमिका आपण समजून घेतली का याचे उत्तर नकारात्मक का येते..

दरवेळेला मराठीचा जागर करायचा आणि राजकारण्यांच्या सोयीस्कर भुमिकांना तोफेच्या तोंडी द्यायचा यापल्याड आपण आणि आपली भूमिका यावर निदान आपल्या पातळीवर संवेदनशील बनण्याची वेळ आलीय. मला माहितीय आजचा विषय तसा ट्रेंडीग नाहीय का कुणाला पिंजऱ्यात उभा करणारा नाहीय. पण तरीही आपण आपल्यासाठी थोडं विचार करण्याचा हा विषय आहे.. मराठी जगवायची जबाबदारी कोणाची.. राज्य सरकारची, साहित्य मंडळाची,  ठाकरे बंधूची.. केंद्र सरकारची कि वाचक म्हणून आपली.. ही अशी ठिपक्यांची रांगोळी आहे की एका कणाने ठिपका बनतो.. आणि ठिपक्याने रांगोळी बनते.. आज आपण आपल्याला विचारुया.. की मी मराठीसाठी काय करु शकतो.. 

आज मुंबईच्या आझाद मैदानात मराठी शिक्षक आपल्या हक्कासाठी रडतोय, त्याचवेळी त्याच आझाद मैदानावर  मुंबईत मराठी माध्यमाचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकांना नोकरीच्या हक्कासाठी लढावे लागतेय. सीमेवर असणाऱ्या बेळगावच्या मराठी माणसाला महाराष्ट्र आणि मराठी बोलण्यासाठी लढावे लागतेय. ना सीमेवरच्या मराठी माणसाची लढाई कळली ना आपल्याला वळ समजले. आज कोरोनानंतर बदललेल्या जगात सिनेमागृहात मराठी सिनेमांनी कुणाच्या पाठबळावर सिनेमे प्रदर्शित करावे, नाट्यगृह केव्हाच सज्ज झालीय. पण टाळ्यांवर रंगणाऱ्या नाट्यप्रयोगाला आपला मानसिक आधार तरी आहे का.. दुसरीकडे ऐमेझॉनसारख्या एका बलाढ्य परदेशी सेवेशी लढताना माझा पक्ष कोणता आणि माझ्या पक्षाच्या भुमिकेवरुन माझी भूमिका ठरवणारे आपण या सगळ्यात मराठी आपली आहे, आपल्या सगळ्यांची आहे हे का विसरतो. असे खुप सारे विषय आहेत आणि ते आपल्या परीने विचार करण्याची वेळ आलीय. 

एका राजकीय भुमिकेसाठी संपूर्ण मराठी पत्रकारीतेला एका राजकीय व्यवस्थेकडून टार्गेट करण्यात आले त्यावेळी मराठीमधल्या एका दर्जेदार परंपरेला आपल्या चष्म्यातून पाहणार्यांशी वाद नाहीय. कारण तुमच्या भूमिका उद्या सत्ता आली की बदलतील. पण मुद्दा मराठीचा काय हा कायम राहिल. मागच्या सत्तेच्या काळात दर मराठी राजभाषा दिनाला यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असे वाटायचे पण ती पाच वर्षही गेली आणि मागच्या दोन वर्षात याची साधी चर्चाही नाही याचीही नोंद घ्यावीच लागेल ना.. मुळात मराठीपणाची ही लढाई मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट बघून किंवा केवळ अभिमान गीत हेडफोनने ऐकून नाही सुरु होणार. प्रत्येकाने आपआपल्या पातळीवर लढायलाच हवी. 

ज्या ज्यावेळी मराठीच्या लढ्याची आणि हक्काची चर्चा होईल तेव्हा आपण मराठीचे मारेकरी कोण याच विषयावर चर्चा करुन नकारात्मक सूरावर आपण किती दिवस संपवणार आहोत. ही लढाई हिंदी विरुद्ध मराठी अशी नाहीय. ही अस्मिता माझी मराठी असेल तर त्याची वाट आणखी समृद्ध आहे. अर्थात चळवळ म्हटली की स्टार्ट एक्टीव्हीजम आणि स्टॉप एक्टीव्हीजम या पातळीपासून ते तुमच्या मुलांना निदान घरात एखादं मराठी गाणं म्हणायला अडवलय कोणी एवढ्या प्राथमिक प्रश्नापर्यंत येऊन ठेपलीय. अर्थात भाषा टिकवणं ही गोष्ट यामुळे लहान मुलांची भुमिकाच आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जी गोष्ट आपण सगळे मिळून राजकीय नेते मराठीपणाबद्दल काय बोलतात यावर जाऊन अकारण थांबतो. 

जगाच्या पाठीवरचा कुठेही सर्रास दिसणारा एक मुद्दा आपण सोयीने बदलवला आणि आज त्याच्याबद्दल इतरांना दोष देतोय. जगाच्या प्रत्येक बाजारपेठेत विक्रेता हा ग्राहकाच्या भाषेत बोलतो पण एकमेव मुंबई आणि त्यानंतर आता जवळ जवळ सर्वच ठिकाणी आपण आपल्या संवादाची भाषा बदललीय. भाजीवाल्याकडे असणारी लौकी कशी दिली या नादात घरुन आणायला सांगितलेल्या दुधी भोपळ्याचा विसर पडलाय. ही गोष्ट फक्त शब्दच्छलांची नाहीय, ही गोष्ट एका मोठ्या अभिसरणाची आहे. वाट तीच आहे, रस्ता तोच आहे आपण फक्त सीएसएमटी चलोगे म्हणत टॅक्सीवाल्यांच्या भाषेत बोलतो. आपण आपल्या बोलीतला संवाद विसरलोय. 

मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढाईला केवळ शिक्षणपद्धती आणि लाल फितीचा कारभार जबाबदार आहे हे जरी मान्य केलं तरी आपण या सगळ्यात उत्तम मराठी शिकण्यासाठी मानसिक तयार आहोत का याचे उत्तर पालकांनाच ठाऊक नसल्याने प्रत्येकाच्या घरापासून निघालेल्या वाटा या इंग्लीश मिडीयमच्या गेटवर जाऊन थांबल्या आहेत. कुंपणापलीकडच्या न दिसणाऱ्या विश्वात मुलांना लोटताना त्यांचे शिक्षण हे जरी इंग्रजी माध्यमातलं असले तरी तुमच्या मराठी संस्कारांना बाधा कोणी आणलीय की आपणच ठरवलीय. लक्षात घ्या हिंदी माध्यम, इंग्रजी शिक्षण या पल्याड आपल्याकडे मराठी संस्कार ठाम आहेत मग मराठी भाषाचा दिमाख आपणच का विसरतोय. 


मराठी नाटक, मराठी सिनेमा, मराठी साहित्य , मराठी शाळा, मराठी वेबसिरीज, हे सगळ तेव्हाच जगेल जेव्हा आपण या सगळ्याचा मराठी म्हणून आग्रह करेल. आज मराठी शाळांचा दर्जाबद्दल चिंता करताना अहमदनगरच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश मिळायला हवा म्हणून कॉन्व्हेंटचे पालक आग्रही आहेत हे विसरुन कसे चालेल.. उच्च द्या आणि उच्च बना या सिद्धांतावर आपण उच्चतमाचा आग्रह धरुया. साधारणपणे दहा कोटी मराठी भाषिक वाचकसंख्या एवढी जरी गृहीत धरली तरी अजुनही मराठीतल्या बहुतांश नव्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीचा आकडा फक्त दहा हजारच का असावा..

जास्तीत जास्त लोकांनी आपलं साहित्य वाचलं पाहिजे याचा आग्रह आता साहित्यिकांनी धरला पाहिजे. मोबाईल प्रत्येकाच्या हातात असताना मराठीतल्या वेबसिरीज माझ्याही जास्तीत जास्त स्क्रिनटाईम शेअर करतील हा विश्वास आता निर्माता दिग्दर्शकांना असायला हवा. 

सुरुवातीला व्टिटरवर हॅशटॅग म ने झालेली सुरुवात आज व्टिटर उघडल्यावर फक्क मराठीच मेसेज दिसेपर्यंत झालीय. इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या मराठी डायलॉग स्टेटसची भुरळ हिंदीत नाहीच आहे. ही गोष्ट तरुणाईला समजलीय, आता फक्त त्यांना ती पुढे नेत राहा एवढच आपल्याला जपत राहायचेय. विचारवंतानी काय केलं आणि राजकारण्यांनी का नाही केलं या पल्याड जे होतय. ते मराठीत जपूया.. मराठीत पुढे नेऊया.. हिमशिखरांवर जाणे लांब कधीच नसते, फक्त ते तुमच्या घराबाहेर पडणाऱ्या एका पावलांवर अवलंबून असते हे समजायलाच पाहिजे.

Comments