हारी पडलो आता, संकट निवारी

आज आंगणेवाडीच्या आई भराडीची जत्रा.. खरतर मिटल्या डोळ्यासमोर जी उभी राहते, आज ती डोळे मिटूनही दिसत नाहीय. कारण पाणावलेल्या डोळे घट्टही मिटता येत नाही आणि एकाग्र नजरेनं तिला आज शोधताही येत नाही ! ती तिथंच आहे, आणि या क्षणाला मी त्या लाखो भविकांपैकी एक आहे, जे आई दिसत नाही म्हणून आज काळजातून साद घालतायत !
आंगणेवाडीच्या जत्रेचा लेख लिहिताना शब्द ना नेहमी त्या धामापूरच्या तळ्यातल्या परडीसारखे भरभरून येतात. फुल सोडावीत आणि फक्त सोने यावं. इतरांना कितीही वाटा , आपली ओंजळ नेहमी भरुन उरतेच. एवढी वर्ष जत्रेवर  लिहितोय, पण शब्द सुचत नाही असे कधीच होते नाही. यंदा मात्र जत्रेच्या स्तब्धपणाची गोपुरे उभी झालीयत..घंटेचा निनाद आत खोल काळजात टणत्कार बनून स्वतःलाच भेदतोय.. एका यात्रेला न जाणे , कैक वेळेला पाहूनही यावर्षी देवीला न पाहणे ह्या व्यथा ज्या जीवाला जाणवतायत त्या अनाम जीवांची आज खरी भक्तीगाथा आहे.

कोविड वाढतोय, प्रशासन हतबल आहे, देवस्थानची भूमिका सगळं सगळं मान्य करायलाच पाहिजे. त्या सगळ्याचं समर्थनही करतो. तेवढा मनाचा मोठेपणा आणि वर्तमानची जाण आहे. पण मनातल्या लेकराला काय समजावायचं. कारण ती आंगणेवाडीची देवी अखंड त्रैलोक्य सत्ताधीश आहे.. पण 'आई' म्हणून तिचे आणि फक्त तुमचे नाते आहे.. आई आणि मुलाच्या नात्यात मध्यस्थ कोणी असू शकतच नाही.. एक वर्ष जत्रेला न जाणे हे भाविक म्हणून समजू शकतो. पण एक वर्ष आईला न भेटणे हे रितेपण आज लाखो काळजाच्या उरात आहे त्यावरचा प्रश्न त्याकडे आहे ना त्याच्याकडेच त्याचे उत्तरही आहे.
दरवर्षी मुंबईत सगळे एक प्रश्न नेहमी विचारतात, "एका वर्षी नाही गेलास जत्रेला तर नाही का जमणार" ? दरवर्षी फक्त 24 तासाची सुट्टी एडजस्ट करून जत्रेला जाऊन परत मुंबईला येतानाही कसली दगदग नाही व्हायची, पण यंदा सुट्टी असूनही जी दगदग होतेय ती त्यापेक्षाही त्रासदायक आहे.

ही जत्रा ना लोकांची नसतेच मुळी.. आंगणेवाडीची जत्रा ही माणसाची असते. आपल्या माणसांनी आपल्या माणसाला भेटायची ती एक तिथी असते. एकाच आईच्या लेकरांचा तो कौटुंबिक सोहळा असतो. ज्यांना ज्यांना आंगणेवाडी शब्द ठाऊक असतो त्या प्रत्येकाला या जत्रेला आज इथे प्रत्यक्ष यायचे असते. पंढरीच्या कळसाला पाहून जे सुख मिळते तेच सुख इथं कळस दर्शनाला पाहून मिळते. मंदिर, भक्ती, नियोजन, राजकीय नेते, पोलीस, प्रशासन , एसटी महामंडळ आणि बाजाररहाट यांचा हा सरळरेखीय आलेख असतो. आणि त्याच आलेखावर लाखो बिंदू 'भक्त' म्हणून स्वतःला ओवतात ना त्या उत्कर्षरेखेला खऱ्या अर्थाने जत्रा म्हणतात.
हे होणे 'अनपेक्षित' होते अशातला भाग नाही, पण हे असले 'अपेक्षितपणे' स्वीकारणे नाही ना जमत आम्हाला ! मागच्या वर्षी एक गणित मांडले होते, साधारण दहा लाख भाविक 24 तासात हा जरी हिशेब घातला तरी फक्त सेकंदात किती भाविक दर्शन घेतात याचा हिशेब घाला आणि त्याचे उत्तर मांडले की मग त्या 24 तासात पुन्हा पुन्हा दर्शन घेणाऱ्यांचा आकडा गुणा.. कितीही आणि कसाही हिशेब घाला, उत्तर एकच मिळणार, "अगदी मनाप्रमाणे दर्शन झाले, मनातला सगळा मागलय देवीसमोर, मस्तच झाला दर्शन".. 

प्रत्येकाला देवीसमोर गाऱ्हाणे मांडायला अपेक्षित वेळ तुमचा तुम्ही  मोजा आणि त्या सेकंदात उरलेल्या नऊ लाख नव्याण्णव हजार उरलेल्या लोकांचा हिशेब घाला.. मी पुन्हा सांगतो, तुमची आकडेमोड हरेल पण श्रद्धा जिंकेल !

यंदा जत्रेला फक्त आंगणे उपस्थित राहतील. मंदिरही सजलेलं आहे, रोषणाई तशीच असेल, गाभाराही तसाच सजवला असेल, मोठा  मंडपही असेल कदाचित.. पण समोरचा भरलेला मळा मात्र नक्की रिकामा असेल.. आंगणेवाडी रस्त्यावर वाहनांची कसलीच गर्दी नक्की नसेल.. बाजूला कसलीच दुकानेही नक्की नसतील . बाईक, कार हवी तिथे पार्किंग करा, जागाच जागा नक्की असेल.. दरवर्षी आभाळात गेलेला प्रकाश नसेल की तो दूर वरून येणारा आवाजाचा कल्लोळही नक्की नसेल.. आणि बाजूला कितीही कल्लोळ असला तरी नेहमी 'जय जय भराडी देवी' असा ऐकू येणारा जपाचा आवाज मात्र तसाच स्पष्ट असेल..

यंदा माझे शब्द हरलेत. कारण आंगणेवाडी जत्रा फिरायला खिशात पैसे नसतील तरी चालते पण जत्रा तोच मांडू शकतो जो शब्दाने श्रीमंत आहे. आणि शब्दश्रीमंती त्याच्याकडेच असते जो जत्रेला फिरलाय, ती जत्रा जगलाय.. त्या गर्दीच्या भवतालात स्वतःला झोकून स्वतःचा शून्य करून घेण्याचा हा पूज्य अनुभव असतो. 
तुमच्या हातात खाजची पुडी असली तरी समोर दिसणाऱ्या माणसाने तुमच्या हातात आणखी एक प्रसादाची पुडी जबरदस्तीने ठेवायची आणि घरी गेल्यावर तुमच्या साठी अगोदर दोन पुड्या आणखी कोणीतरी ठेवलेल्या असतात.. तुम्ही त्या खाता कीती आणि वाटता किती हा प्रश्न नाहीय, मुंबईला आल्यावर त्या अनेक पुड्यापैकी एकही पुडी स्वतःला खायला एकही मिळत नाही ना तेव्हाही इतरांना मिळालं ना हे समाधान तुम्हाला पुन्हा जत्रेला साद घालते..

यंदा हे सगळं नसूनही आहे आणि असूनही नाहीय. पण आपण जत्रेला जायला न मिळाल्याचे दुःख उगाळताना लाखो भाविक ज्या आंगणेवाडीच्या घराघरात जेवायला जातात त्या चुलीला आज तुमची आठवण येत असेल का ? ती मायमाऊली जी घरची जत्रा असूनही तुमच्यासाठी रांधून चार घास बनवत असेल तिलाही तुमची आठवण येत असेल का? आणि तो देवळासमोरचा पोलीस बेरिकेट जो अन्य दिवशी लोखंडी असतो. पण त्या दिवशी कळसाला पाहून मंदिराबाहेर अनेक म्हाताऱ्या कोताऱ्यासाठी डोके ठेवायची एक श्रद्धेची जागा असते त्याच्या देवपणांचे मानाचे काय ? आणि आठवतेय ती म्हातारी जी 'खण नारळ आणि वेणी घेऊन जा रे झिला' असे म्हणून त्या क्षणाला मायेची हाक घालते ती कुठे असेल ? आणि हा, ते नारळ, ती साखर, तो गूळ जो यंदा वाट बघत होता , ज्याला यंदा तुलाभराच्या तागडीत बसायची हौस होती, त्याने कुणाकडे पहावे ? आणि ते भाताच्या गोणीतले तांदूळ जे देवीच्या ताटातुन देवीचा प्रसाद म्हणून तुमच्याकडे यायची वाट बघत होते, त्यांनाही नसेल का काहीच वाटत ?ही फक्त तुमची गोष्ट नाहीय , त्या अनेकांची गोष्ट आहे ज्यांना तुमच्यापेक्षाही जास्त जत्रेची ओढ होती..

दरवर्षी देवाच्या जत्रेला सुट्टी मिळत नाही म्हटल्यावर सगळ्या ऑफिसशी भांड भांडणारा मी यंदा कोणाशी भांडणार ? आजपर्यंत देवीकडे मागत गेलो, देवी न मागता सगळं देत गेली. यंदा पहिल्यांदाच आपण काहीतर मागण्याच्या पल्याडही 'शांतपणे पाहणे असते' हे समजलंय. यावेळेला तिच्याकडे काहीच नाही मागत, यंदा तुमच्याकडे मागतोय "याक लाना ठेवशाल काय ओ माझा देवीच्या पुढ्यात ? फक्त याक लाना?"

-ऋषी श्रीकांत देसाई

Comments

  1. आमच्या कडून एक लाना देवीक वाहशाल काय...

    ReplyDelete

Post a Comment