पहिले पाढे पंचावन्न


शिवसेना आज 55 वर्षांची झाली..

शिवसैनिकांच्या दृष्टीने 'कट्टर हिंदुत्ववादी विचार' पन्नास वर्षांचा झाला.

सहयोगी पक्षांच्या दृष्टीने 'एक प्रादेशिक पक्ष' तगून आहे..

राष्ट्रीय पक्षाच्या नजरेतून 'बाबर सेना, सोनिया सेना, चिऊ सेना, शिळी सेना' आणि भरपूर काही नावं असतील ती सगळी मिळून, 'आणखी एक राजकीय आत्महत्येचे आणखी एक वर्ष' सुरु झालं. किंवा 'हा शेवटचा वर्धापनदिन बहुतेक' अशा कुत्सित नजरेच्या जमेल तशा प्रतिक्रिया !


आणि हो, ज्यांचा राजकीय जन्मच 2014 नंतर झालाय अशा कोवळ्या राजकीय विश्लेषकांचा, सोशल मीडिया किंगचा एक भारी डायलॉग 'बाळासाहेबांची शिवसेना आता नाही रे राहिलीय' किंवा मग सोयीस्कर 'शिवसेना सत्ते आड गुंडगिरी करणारा पक्ष' अशा विधानाने हा पक्ष दरवर्षी समोर येतो.. अर्थात तुमची जेवढी राजकीय प्रगल्भता असेल तेवढी या सगळ्या विधानाने तुमच्या पोटात मुरडा येईल तो भाग वेगळा !

शिवसेना 2019 ला संपलीची हाकाटी  ते शिवसेना 2024 ला सोबत घेण्याची अपरिहार्यता हा 2021 पर्यंतचा स्केल आता गाफील आणि विश्वासघाताचा न राहता एका अस्तित्वाचा प्रश्न बनलाय इथपर्यंत शिवसेनेचे राजकारण बदलत गेलय ! कट्टर हिंदुत्व हा विषय शिवसेनेन जेव्हा जेव्हा उचलला तेव्हा तेव्हा शिवसेना सरळ प्लस मध्ये राहिली. आणि आता तर सेना वाटेपेक्षा फायओव्हर पण शोधतेय म्हणा !


आज विमानतळाच्या नावावरुन शिवसेना अडचणीत येईल अशी एक परिस्थिती आहे. रामुच्या 'सरकार राज मध्ये क्रिएट झालेली परिस्थिती आणि शिवसेनेची आताची एक लढाई यात तसा काहीच फरक नाहीय.. सेनेचा हा मुद्दा फसलाय पण तुम्ही चुकलाय हा सांगणारा राष्ट्रीय नेता स्पष्ट नसल्याने वर्तुळ खूप छोटे का आहे यावरून मोठी झालेली शिवसेना समजेल !

पण या सगळ्यात शिवसेनेचा हुकुमी मतदाराशी पंगा घेऊन , जो मतदार आपल्याकडे कधी आलाच नसता त्याच्यासाठी मानखुर्दचा उड्डाणपूल चे 'ख्वाजा' नामांतर करण्याचा अट्टाहास करणारी शिवसेना बदललीय की शिवसेना आता हुकुमी पत्त्यांची गणिते का मांडतेय याचे उत्तर शोधायलाच हवं ! अनेकांना वाटत होतं की अन्य दोन पक्ष शिवसेनेचे हिंदुत्व खातायत, पण सरकत चाललेल्या काळाबरोबर हे क्लिअर झालय की सेनाच त्यांचे 'ध्रुवीकरण' गिळतेय ! ही उत्तर मिळाली की नवी मुंबई पालिका निकाल आणि मग मुंबई महापालिका निकाल अशी कॅंडी क्रश नेक्स्ट लेव्हल बरोबर समजत जाईल ! 


शिवसेनेची महत्वाची ताकद ही आहे की प्रत्येकाला ती स्पेस हवीय. काहीना सेमी शिवसेना बनवायची होती, काहींना सेमी शिवसेनाप्रमुख बनायचं होते, काहीना सेना स्टाईल सेमच्या सेम कॉपी करायची होती. पूर्वी अनेकांना बाळासाहेब बनायचं होतं आज अनेकांना संजय राऊत बनायचं आहे एवढा सगळा हा प्रवास आहे..

शिवसेनेबद्दल लिहिताना एक कायम लक्षात घ्या, शिवसेना संपली का नाही याचे एकमेव कारण म्हणजे सेना संपवायला निघालेल्या पावलांनी आपल्याच पायवाटेवर मांडलेली चुकीची पावले जेव्हा इतरांना कळत गेली आणि तिथेच शिवसेना मोठी झाली. एक काळ असा होता की ज्या जिल्ह्यात शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेत जिंकूनच येत नव्हती तिथे आता निवडणुकीच्या आदल्या दिवशी घाम फोडतेय.. तिथे शिवसेना वाढलीय हे उत्तर नसेल कदाचित, पण शिवसेना 'अस्वस्थ' बनवण्याच्या खेळात माहिर झालीय!


शिवसेना चूक की बरोबर हे हे शोधताना चिराग पासवान, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, ओमर, मुफ्ती, स्टॅलिन, कमल हसन अगदी रजनीकांत या सगळ्यांच्या प्रादेशिक पक्षाची आजची परिस्थिती समजून घेणे जास्त गरजेचे आहे.. पक्ष खिळखिळे होणे आणि तसा मेसेज राजकारणात जाणे यातला हा फरक आहे..


प्रत्येकाची एक राजकिय भूमिका असते आणि असलेल्या भुमिकेत बाकी कुठला पक्ष असो वा नसो शिवसेनेबद्दलची एक भूमिका नक्की असते. आज राजकारण सोशल मीडियावर खेळवले जातेय. मुळात सोशल मीडिया म्हणजे तरी काय एक आभास निर्माण करणे जे व्यक्तिगत प्रभावी असते. आणि शिवसेना हाच खेळ व्यापक खेळते.. शिवसेनेचे राजकारणात भव्य दृश्यात्मकता असते.. ती शिवसेनेच्या शपथविधीत दिसली, ती मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात येताना दिसली आणि अगदी पंतप्रधान भेटीवेळेस दिसली.. त्यांना जी दृश्य दाखवायची असतात ती शिवसेना भन्नाट स्केलवर मांडते.. मुळात शिवसेना प्रत्येक गोष्ट एवढी पद्धतशीर मांडते की ती पद्घतीशीर आहे याचाही थांगपत्ता लागू देत नाही !


शिवसेना एक पुरता राजकीय पक्ष आहे. मुंबईची ती गरज आहे हे बिंबवण्यात त्या पक्षाने बनवलेली मानसिकता एवढ्यात तोडणे फार कठीण आहे. मुळात आजही संपूर्ण देशाच्या राजकारणात अगदी तृणमूलचा विचार केला तरी महिला कार्यकर्ते यांच्या संख्याबळाचा विचार करता शिवसेनेची प्रादेशिक पक्ष म्हणून ताकद मोठी आहे. प्रबोधनकारानी एक विचार दिला. शिवसेनाप्रमुखांनी ती संघटना बांधली, उद्धव ठाकरेनी त्याचा पक्ष केला, आणि भविष्यात आदित्य ठाकरे त्याची ऑर्गनायझेशन स्तरीय बांधणी करतील कदाचित !


शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेक वादळ आली, पण ती सगळी वादळ बाजूला आणि मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावरची संकटे याचा विचार करता आता पक्ष हाताळणे ही मोठी जबाबदारी आहे.. पक्ष म्हणून मुठ्या आवळणे वेगळे आणि सत्तेत आल्यावर हात जोडणे खूप वेगळं असते.. ते आता शिवसेनेला जमू लागलंय !


पहिले पाढे पंचावन्न म्हणजे सगळे विसरणे असा मूळ अर्थ असेल कदाचित पण शिवसेनेच्या अभ्यासक्रमात ही एक म्हण त्यांना बोर्डात आणते हे वास्तव आहे. त्यांचे मूळ रूप हीच त्यांची ताकद आहे, आणि ती ताकद असेपर्यंत हे प्रत्यंचा दोलायमानच राहणार !

आज पंचावन्न वर्ष झाल्यावर पुढे काय हा प्रश्न शिवसेना सोडून बाकी सर्वानाच पडतो.. दरवेळेला एक हाकाटी येते शिवसेना संपली… शिवसेना संपली आणि तोपर्यंत पुन्हा जून महिन्याची १९ तारीख येते ! 


Comments