|| तोचि योगी जाणावा ||

कर्ली नदी शांत वाहत असते. अगदी स्वतःला जमेल तसे.. माडपोफळीच्या बागा न्याहाळत अगदी शांतपणे.. उगमपासून ते अगदी समुद्रात जाऊन मिळेपर्यंत दोन्ही बाजूला हिरवाईची श्रीमंती वाहणारी कर्ली आपल्याच नादात वाहत असते.. पण तेच खळाळले पण त्या क्षणी 'गोडसेंचा साना' दिसतो तेव्हा अगदी शांत होते जणू काही स्तिमित होते..

कवठी गाव..कुडाळपासून शेवटच्या टोकावरचे गाव म्हणा ना..  सातेरी महादेवाच्या आशीर्वादाने जगरहाटी चाललीय अशा विश्वासात जगणारे सहा वाड्याचे आणि 900 माणूस वस्तीचे गाव असेल..जगाने गाव कूस जोडली पण कवठी  अजूनही कर्लीच्या तीरावर श्रीमंत आहे.. कर्ली नदी अजूनही त्या गोडसेच्या साण्यावर येते ना तेव्हा त्या घराच्या खुणा पाहते.. ती पावले पुन्हा दिसतील या भ्रमात तरी वरून चालत यायला बघते आणि पुन्हा पाण्यात घसरून पडते.. कधीतरी शांत किनाऱ्यावर बसा.. पाणीच पाण्यात घसरून पडते तो आवाज तुम्हाला कर्लीच्या शोधात नेईल.. आणि मग कर्ली नदीच सांगेल,  किनाऱ्यावरच्या एका योगगंगेचा आभाळभर पसरलेला श्वासडोह ! 

त्या 'गोडसे साण्यावर' एकदा कर्लीत ओले होऊन मी विचारलं कर्ली नदीला, 'मला नाही माहीत तू असे का वागते.. पण दे उत्तर, जन्मल्याबरोबर वाहणे हे त्याचं प्राक्तन आहे. त्या नदीला स्थिरावण्याचा का मोह होतोय? कोणाला आणि का शोधतेय या गोडसेच्या साण्यावर " ? 

माझ्या प्रश्नावर कर्लीच्या थेंबातून आवाज आला, ' ब्रम्हलीन परम पूजनीय परमहंसपरिवज्रकाचार्य योगमूर्ती श्री जनार्दनस्वामी'
कोण आहेत हे योगमूर्ती ? सिंधुदुर्ग जिल्हयातील असून कोणालाच माहीत कसे नाही ? भारत खंडात योग प्रसार करणारा अवलिया आहे तरी कोण ? नागपुरात योग म्हणजे श्री जनार्दन स्वामी असे का म्हटले जाते ? अगदी गडकरी आणि फडणवीस यांना माहीत असलेलं नाव मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून मला का ठाऊक नसावे..?

माझे प्रश्न सुरू होते, आणि कर्ली नदी फक्त हसत होती.. तिने उत्तर द्यायला सुरुवात केली..

समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने।
योगमेवाभ्यसेतु प्राज्ञ: यथाशक्ति निरंतरम्॥

माहितीय का याचा अर्थ ? कर्ली नदीने मला प्रश्न विचारला. मी नकारात्मक मान डोलावली.. कर्ली बोलू लागली.. "निरोगी जीवन, समाधान आणि सौख्य यांच्या प्राप्तीसाठी शहाण्या माणसाने आपल्या शक्तीनुसार निरंतर योगाचा अभ्यास साधना करावा" आणि हा जगाला संदेश देणारे योगमूर्ती जनार्दन स्वामी यांचे हे कवठी गाव आणि त्याच्या उरलेल्या घराच्या अवशेषात मी तो काळ आठवतेय.. कर्ली अखंड बोलत होती..

" गोष्ट १८९२ ची आहे.. तारीख सांगते,  १८ नोव्हेंबर १८९२ रोजी झाला. स्वामींचे मूळ नाव जनार्दन वामन गोडसे. याच कवठी मध्ये स्वामींचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, तीन मुले आणि तीन मुली. जनार्दन हा दुसरा मुलगा. बाकी भावंडांची लग्ने झाली. परंतु जनार्दन अविवाहित राहिला. अत्यावश्यक प्राथमिक शिक्षण घरातच घेऊन, जवळच्या गावातील वेदपाठशाळेत त्याने अभ्यास सुरू केला. पुढे कसबा-संगमेश्ववर आणि आंजर्ले या गावांमधील पाठशाळांतून वेदाध्ययन पूर्ण केले. नंतर कोळप या गावी आचार्य नित्सुरे गुरुजींकडे मग सांगलीच्या श्रीमंत पटवर्धन पाठशाळेत ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद, व्याकरण, न्याय आणि ज्योतिष या पाच विषयांचे अध्ययन त्यांनी पुढे चालू ठेवले.  दशग्रंथ, जटा-घनपाठ, सामवेद यांचे जनार्दनशास्त्रींनी १५ वर्षे वेदाध्ययन करून ते वेदशास्त्रसंपन्न झाले. 

जगण्याची परिक्रमा वेदाकडून तीर्थक्षेत्री आणि तीर्थ क्षेत्राकडून योगाकडे नेणारी ठरली.. इंद्रिय निग्रह म्हणजे काय असावा याचे परमोच्च उदाहरण बनणारा प्रवास सुरूच होता.. एकदा द्वारकेहून परत येताना श्रीक्षेत्र सिद्धपूरगावी शिवमंदिरात मुक्काम करून, पुढील एका वर्षात दर दोन दिवसाला एक याप्रमाणे ऋग्वेदाची १०८ पारायणे केली. त्यानंतर अष्टादश पुराणांचे वाचन सुरू केले. ऋग्वेदाची १०८ पारायण म्हणजे बुद्धितेज समजून जा..

याच जगण्याच्या प्रवासात सिद्धपुरच्यामंदिरातील ती घटना आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.. सिद्धपूरच्या मंदिरात एकदा एक संन्यासी मुक्कामाला आले. जनार्दनशास्त्रींची उपासना बघून ते अत्यंत प्रसन्न झाले. आपल्याला अवगत असलेले योगाविद्यारहस्य स्वीकारण्यासाठी सुपात्र सच्छिष्य मिळाला, याचा त्यांना आनंद झाला. त्या संन्यासी महात्म्याने जनार्दनस्वामींना योगशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. चातुर्मास चालू होता. अवघ्या चार महिन्यांत शिष्याने गुरूकडून संपूर्ण योगविद्या आत्मसात केली. स्वामींच्या जीवनाला पुढे फार मोठी कलाटणी मिळणार होती. ते संन्यासी त्यानंतर लगेच गायब झाले, ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. असे म्हणतात की ते साक्षात पतंजली मुनी होते की काय! जनार्दन स्वामी स्वत: ‘महाराज’ बनले नाहीत किंवा लोकांकडून त्यांनी आरतीही ओवाळून घेतली नाही. 

योगाचे शिक्षण घेतल्यानंतर स्वामीजी जिथे कुठे मुक्काम असेल तिथे योगासनांचे महत्त्व सांगून, स्वत: आसनेसुद्धा करून दाखवत. संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर होशंगाबाद येथे एका दत्त मंदिरात तीन वर्षे राहून त्यांनी योगप्रसार केला. नंतर बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, इत्यादी राज्यांमध्ये फिरताना त्यांनी ते कार्य चालू ठेवले. प्रत्येकाच्या व्याधी विचारून त्यानुसार आसने शिकवणे, हे काम अवघड होते. त्यातून अपेक्षा तर काहीच नव्हती. हळूहळू लोकांचे सहकार्य मिळत गेले. लोकांना चांगला गुण येत होता, दु:ख-वेदना कमी होत होत्या. जोडीला स्वामीजींकडून तत्त्वज्ञान आणि बोधपर कथाही ऐकायला मिळत होत्या. 

सन १९४८मध्ये ते अमरावतीला आले. तिथल्या लोकांना स्वामीजींचे ज्ञान, कार्य आणि व्रतस्थ जीवनाची पुरेपूर कल्पना आली. एकवीरा देवीच्या मंदिरात राहण्यासाठी जागा मिळाली. तिथेच लहान-थोर लोकांना आसनांचे प्रशिक्षण सुरू झाले. रात्री ‘योगसाधने’वर त्यांची प्रवचने होत. अन्यत्रही वर्ग सुरू झाले. अमरावतीत दोन वर्षे हे कार्य अविरत सुरू राहिले. स्वामीजींनी १९५०मध्ये तिथेच एक योगसंमेलन भरवले. त्याच संमेलनात भारतीय योगभ्यासी मंडळाची स्थापना झाली. एक प्रकारे योगाभ्यासाचा सुवर्णकाळ सुरू झाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आले. त्याला आवश्यक अशी पुस्तके स्वामीजी तयार करू लागले. शिस्त आणि ठरलेल्या वेळेचे पालन यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यांचे वागणे-बोलणे सहज, सुलभ असायचे. यज्ञयागादि कार्यक्रमांना उपस्थिती सुरूच होती. 

नंतर स्वामीजी नागपूरला आले. उद्देश हाच, की तिथे दुसरे योगसंमेलन भरवावे, आणि उत्साही लोकांचा परिचय व्हावा. त्यांनी १९५१मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली. सहा आणि सात नोव्हेंबर १९५१ रोजी तिथे दुसरे भारतीय योगसंमेलन भरवले. आता नागपूर हीच त्यांची कर्मभूमी झाली.

कर्ली अखंड बोलत होती.. स्वामी नावाची गोष्ट सांगत होती.. विद्यावाचस्पती आणि जबरदस्त प्रज्ञावैभव असलेला योगमूर्तीचे आज भौतिक गोष्ट समोर नव्हतीच.. कवठीच्या तरिवर नागपूरकर मंडळी पुन्हा स्वामींचा मठ उभारतायत.. सध्या काम सुरू आहे.. आणि फडके गुरुजी देवपूजा करत आहेत.. जमलं तर एकदा या जाऊन..
ही सगळी माहिती शोधताना रवींद्र गुर्जर यांच्या शब्दांच्या ओळी मी जशाच्या तशा घेतल्या.. कारण कवठी गावच्या शिवसेना उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर यांच्या तुटक माहितीवर आणि रवींद्र गुर्जर यांच्या अफाट प्रज्ञासाधनेच्या दरम्यान मी जनार्दन स्वामींची गोष्ट मी सांगतोय.. आणि हे सांगताना माझ्या हातात कर्लीच्या ओल्या पाण्याशिवाय काहीच नाहीय..

आज संपूर्ण नागपूर ज्या नावाला शिरोधार्य मानते ते नाव आपण शोधायला हवं.. आज कवठीमध्ये एका छोटा मठ उभारला जातोय. नागपूरच्या योगाभ्यासी मंडळ, रवींद्र गुर्जर,  डॉ. श्री. भा. वर्णेकर ही फक्त नाव नाहीत, आपल्यापर्यंत जनार्दन स्वामी यांचा विचार पोहोचवणारा देवध्वनी आहे.. या नावांमुळे परमपूज्य जनार्दनस्वामी आपले आहेत ते समजले.. 

नागपूर खूप दूर आहे, पण कवठी जवळ आहे.. आणि कवठी पेक्षाही जवळ आपला देह आहे.. एकदा देह समजला की योग समजेल.. आणि योग समजला की जनार्दन स्वामी समजतील..  ब्रम्हलीन परम पूजनीय परमहंसपरिवज्रकाचार्य योगमूर्ती श्री जनार्दनस्वामी !

ऋषी श्रीकांत देसाई

२१ जून : योग दिन

Comments

  1. छान माहिती दिलीत 💐💐💐

    ReplyDelete
  2. मस्त ऋषी, धन्यवाद. कोकणात असे किती महापुरुष होऊन गेले त्याची गणना च नाही

    ReplyDelete

Post a Comment