स्मरण वसंतरावांचे , ध्येय कृषी संपन्नतेचे !

आज १ जुलै.. महाराष्ट्र कृषी दिन ! कृषिप्रधान महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न क्रांतीला नमन करण्याचा आणि प्रेरणा घेण्याचा ऊर्जा दिवस. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

आजचा दिवस आणि महाराष्ट्रातील कृषी आलेख समजून घेतानामाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा कार्य आलेख समजून घेणे हे जास्त महत्वाचे आहे. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. त्या बिजाच्या संपन्न परिपूर्ण शासकीय मानसिकतेमुळे आज कृषी क्षेत्र आणि प्रशासन यात एक समन्वय निर्माण झालाय. आणि हाच आलेख संपूर्ण महाराष्ट्राला प्रगती पथावर नेतोय.

असे म्हणतात की, ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५  मध्ये घेतलेल्या वसंतरावांच्या गतिमान आणि समन्वयी भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने कृषी पर्वाची सुरुवात झाली.वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. 

वसंतराव मुख्यमंत्री होतेच पण त्यांची खरी ओळख म्हणजे हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे  विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापनाश्रेय हे वसंतराव नाईक यांचेच ! 

मुळात शेती हा विषय तुम्ही अभ्यासाला घेतला की कष्ट आणि सुबत्ता या दोन्ही पातळीवर तुम्ही सक्षम होता. १९७२ चा दुष्काळ महाराष्ट्राची परीक्षा घेणारा होता. वसंतरावांनी १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. १९७२ सालच्या  दुष्काळात त्यांनी अभुतपूर्व काम केले. लागोपाठ तीन वर्षे अवर्षणाचे असल्याने नागरीकांच्या आणि जनावरांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी त्यांनी देशात पहिल्यांदाच रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबविण्याचे धाडस केले. सुमारे सात हजारावर विहीरी खोदल्या, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदली. त्यामुळे त्याकाळी ५० लाखावर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला होता.

आपदा मे अवसर हा शब्द महाराष्ट्राला १९७२ मध्येच गवसलाय. वसंतरावांनी नियोजनबद्ध प्रशासन राबवत शेतकऱ्याला धीर दिला. त्यांनी सगळ्यात प्रथम जर कुठले काम केले असेल तर ते म्हणजे राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. दुष्काळ परिस्थितीत मोडून पडलेल्या शेतकऱ्याला एक नवा कृषी विचार दिला. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. १९७२ नंतरची वसंतरावांच्या योगदानाची यशोगाथा आजही महाराष्ट्राला अखंड स्मरणात आहे

शेतीसोबत कष्टकरी माणसाला श्रमाला ओळख मिळवुन देणारी रोजगार हमी योजना म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा पाया ! रोजगार हमी योजनेच्या दुरदृष्टीतून केलेल्या विचारांचा आजचा प्रवास आज प्रशासनाची धोरणात्मक शक्ती दाखवतो.

शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे हा त्यांचा विचार नव्वदच्या दशकापूर्वीचे विचार म्हणून समजून घेताना वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीची ताकद समजते. वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शेतीसाठी अनेक योजना केवळ कागदावर आखल्या नाहीत आणि तर स्वतः लक्ष देऊन पूर्णत्वास नेल्या. कार्यान्वीत केल्या. 

वसंतराव नाईक यांचा राजकीय प्रवास हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपरिषद अध्यक्षपदापासून सुरू होतो. वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ म्हणजे ११ वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिले. या सगळ्या बदलत्या जडणघडणीत त्याने महाराष्ट्राला कृषी संपन्नतेचा मार्ग दाखवला.

वसंतराव नाईक यांनी एप्रिल १९५७ ते १९६० दरम्यान  कृषिमंत्री म्हणून चांगल्या प्रकारे कार्य केले. दरम्यानच्या काळात वसंतराव नाइक यांनी कृषि विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरीत वाणांचा अभ्यास करून तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पिक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यामुळे पुढे प्रत्येक जिल्ह्यात कापूस जिनिंग, सुतगिरणी, प्रेसिंग, तेलघाणी आदी सहकारी उद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे नगदी पैसा येऊ लागला.

१९७२ चा दुष्काळ, कोयना भुकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत विचलीत न होता. धैर्याने तोच देऊन महाराष्ट्राचा गाडा सुरळीत केला. महाराष्ट्राचे सीमा प्रश्न, कृष्णा-गोदावरी पाणी वाटवापर केंद्राला योग्य ती जाणीव करून दिली. एकाधिकार कापूस खरेदी, रोजगार हमी योजना, ज्वारी-तांदूळ खरेदी इ. अनेक उपक्रम धडाडीने कार्यान्वीत केले. शेतीचे आधुनिकीकरण केले.


नगरपरिषद ते मुख्यमंत्री हा फक्त राजकीय आलेख असला तरी वसंतराव नाईक यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी करून रोजगार हमी योजना देशभरात राबविली हा मुद्दा वसंतरावाचा राष्ट्रीय व्यापकपणा सिद्ध करतो.  

आज पुन्हा एकदा शहरे कोविडमुळे ठप्प झालीयत. मंदी आणि नोकरकपातीमुळे कृषी क्षेत्राकडे तरुण पावले वळतायत. या तरुण हाताना बळ देण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकजूट दाखवली पाहिजे. तरच महाराष्ट्र या ठप्प झालेल्या अर्थकारणातही वेगाने सरसावले.. आज कृषी दिनाचया वसंतराव नाईक यांचे पुण्यस्मरण करताना बळीराजाला ताकद देऊया आणि खऱ्या अर्थाने कृषीदिनाला मनामनात हिरवाई रुजवूया !

Comments