लीलाधर कांबळी.. आकाशगंगेतला चंद्र

मालवणी रंगभूमी ही जर एक विशाल धर्मगाथा असेल तर रेवंडी या धर्माची वाराणसी आहे.. मच्छिंद्र कांबळी, दिलीप कांबळी, लवांकुश कांबळी, अविनाश कांबळी, मंगेश कांबळी, अरुण कांबळी आणि लीलाधर कांबळी ही नावं म्हणजे रेवंडीने रंगभूमीला दिलेली बाप माणसे आहेत..  नाटक नावाची गोष्ट रेवंडी जगली म्हणून माझ्यासारखी कैक पोरं मालवणी या चार अक्षरावर श्वास छातीत भरून उरलेल्या स्पेसवर अखंड मालवणी बोलत राहतात.. ही माणसे मोठी आहेत..मोठी राहतील पण त्यांना आम्हाला मोठं केलंय.. म्हणून या रेवंडीचे आणि कांबळीचे एक नाते आपल्या प्रत्येकाशी आहे.. या नात्यात लीलाधर कांबळी कायम जिवंत राहतील म्हणा..
मोहन तोंडवळकर, श्रीराम लागू आणि बाबूजी या तीन शिखरांबद्दल बोलताना लीलाधर कांबळी आपण मात्र कायम देवळाजवळच्या पारावर बसून देऊळ आणि कळस बघत बसायचे.. शुद्ध मालवणी आणि शुद्ध  मराठी बोलणारा हा कलावंत इंग्रजी रंगभूमीवरही तेवढाच गाजला. फनी थिंग कॉल्ड लव्ह’ या भरत दाभोळकरांच्या इंग्लिश नाटकात दोनशेच्या पार केलेला प्रयोगाचा टप्पा हा प्रत्येक मालवणी माणसासाठी तेवढाच महत्वाचा मानला जातो.

नाटक करणे यापेक्षा नाबाद शतकी आणि द्विशतकी प्रयोग करणे म्हणजे लीलाधर कांबळी यांची खासियत होती. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या वात्रट मेले या नाटकाने दोन हजारांचा टप्पा पार केला होता. काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, दुभंग, राम तुझी सीता माऊली, वात्रट मेले, केला तुका नि झाला माका, अखेर तू येशीलच, लेकुरे उदंड जहाली, बे दुणे पाच, चाकरमानी, हसवाफसवी, फनी थिंग कॉल्ड लव्ह, वस्त्रहरण, शॉर्टकट, प्रीतीगंध, प्रेमा तुझा रंग कसा, एक दिवस येईलच, वन रूम किचन, सासू पाहून लग्न करा, आमच्या या घरात, चला घेतला खांद्यावर, जिथे फूल उमलते, कथा नव्या संसाराची, नयन तुझे जादूगार, सगळे मेले सारखेच, विमानहरण, चला घेतला खांद्यावर, शहाण्यांनी खावं बसून, अशी ही फसवाफसवी, लफडं सोवळ्यातलं, चंपू खानावळीण अशी न संपणारी नाटकांची यादी लीलाधर कांबळींच्या खात्यात जमा आहे.

नाटकापेक्षाही दूरदर्शनवर त्यांच्या गाजलेल्या मालिका यांचा प्रवास मोठा आहे. भाकरी आणि फूल, गोटया, बे दुणे तीन, पाऊस मृगाचा पडतो, कथास्तु, पोलिसातला माणूस, गिनीपिग, हसवणूक, सोनबाची शिदोरी, मेवालाल (हिंदी), नन्हे जासूस (हिंदी), महाबली, कॅलिडोस्कोप, मिसळ, हाऊस-मौज, कॉमेडी डॉट कॉम, थोरला हो, सांजभूल, दिशा, चला बनू या रोडपती, ही चाळ कुरूकुरू, एक वाडा झपाटलेला, गंगुबाई नॉन मॅट्रिक, भाग्यविधाता, गुण्यागोविंदाने, एक झोका नियतीचा टेलिफिल्म्स गणूराया, काज, कॅप्टन परत आलाय, धर्मा रामजोशी... आणीही बरीच असतील.. टीव्हीवर सुखावणारा मालवणी आवाज ही ओळख त्यांनी कायम ठेवली.

चित्रपटातही  सिंहासन, हल्लागुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाय, श्वास, बीज (हिंदी), सविता बानो, हंगामा, वन रूम किचन, सुकन्या असा दमदार प्रवास सुरु होता.

कलावंत असणे आणि कलावंत म्हणून वैभवशाली खिताब यांच्या ग्रहणात हा चंद्र सापडला होता.. सुरुवातीपासून व्यावसायिक नट हा शिक्का बसला आणि राज्य नाट्य स्पर्धेपासून त्यांना नेहमी दूर राहावे लागले.. ही एकच खंत त्यांना सलत होती.. पण त्याच वेळी ही लीलाधर कांबळी नावाचा कलावंत फक्त एक दुसऱ्या नाटकात झळकून स्वतःला तारा नाही समजत राहिला.. तो एक एक तारा या अंधारात उजळत गेला.. आणि त्याची आकाशगंगा बनली.. तीही कायमची.. पण तरीही एक गोष्ट मात्र आभाळात कायम राहील.. रेवंडीच्या आभाळात एक प्रखर सूर्य होता, आणि एक तेवढाच तेजस्वी चंद्रही !!

- ऋषी श्रीकांत देसाई

Comments