पौर्णिमेचा गिरान

आज ड्युटीवरून घरी येताना एक अस्वस्थपणा आहे. तुम्ही कितीही पत्रकार असला तरी तुम्ही सत्तेत नाही आहात, किंवा सत्तेत असता तर मग प्रशासनात नाही आहात किंवा प्रशासनात असता तर तुम्ही निसर्ग  नाही आहात याची एक अस्वस्थता आहे ! कालपर्यंत समुद्र काठचे म्हणून पटकन बुडून मरु याची भीती,  एक नदी बघितल्यावर किती खोटी होती हे जाणवलं. अगोदर फक्त सावित्रीची भीती होती आता त्यात वाशिष्ठीची भर पडलीय.तशा खूप गोष्टी मेल्यायत म्हणा अमावस्या वाईट असे शिकवणाऱ्या माझ्या कोकणी मनाला आजची रात्र पौर्णिमाही वाईट वाटेल !

नेहमी त्या परशुरामाच्या घाटावरून मुंबईला जाताना वळण घेत असताना रातराणीत वाकून मागे पहायची सवय होती.. रात्रीत चिपळूणच्या लाईट्स आणि मग एक रेष दिसायची..  चांदणे असले तर मग नदी तेवढे पांढरी दिसायची.. आज जर मी परशुराम घाटातून मागे पाहिलं तर वाशिष्ठीची रेघ नाही तर चिपळूण भर पसरलेली अक्राळ विक्राळ चांदणे गिळालेली तो नद दिसेल !

परशुरामाच्या घाटातुन चिपळूण साधारण किती असेल ? सात किलोमीटरचे अंतर आज सातशे किलोमीटर पेक्षा लांब झालं. एका बाजूला डोंगरावरन घरंगळत येणारे कोयनेचे पाणी दुसऱ्या बाजूला वाशिष्ठी नदीचे पाणी आणि वरुन कोसळत असलेला 600 मिली पेक्षा जास्त पाऊस.. पाऊसकोंडी म्हणजे वेगळं काय असेल ?  सकाळी सात पासून फक्त चिपळूण या एका विषयावर चॅनलला अपडेट देतोय..

माझा रिपोर्टर निसार शेख, त्याचे घर पाण्यात होतं. तो सुखरूप आहे. मग मी जमेल तसे मुंबईत बसून एक एक दृश्य जमवत बातमी ब्रेक करत गेलो. पाऊस आणि भयाणता वाढवत गेली तशी कुठल्याही चॅनल सोबत माझी स्पर्धा संपत गेली.. फक्त बातमी दृश्य न बघता सांगत गेलो.. पाऊस बंद पडू दे, पूर ओसरू दे एवढंच मनातल्या मनात बोलत राहतोय !

उद्यापासून पूर ओसरेल ते राजकीय घाणेरडे मेसेज फिरत राहतील. मग दोन चार शिव्या आम्हालाही असतील.. चालायचचं ! पण आज पाणी नेमकं कस वाढेल याचे उत्तर फक्त पाऊस देइल.  चिपळूणमध्ये आलेला पूर हा कोयना धरणाच्या कोळसेवाडीतून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नसून नवजा भागात पडलेल्या प्रचंड पावसाच्या पाण्यामुळे आहे हे सत्य स्वीकारायला मग कागद कुणाला तपासायचे आहेत.. 

त्यात आज पुनवेची रात, भरती उतरायला कोणतेही लॉजिक नाहीय. तिथे आता पाण्याला प्रचंड ओढ आहे !! धरण नावाची गोष्ट जलचक्र म्हणून समजून घेताना कोयना ही महाराष्ट्राची भाग्यभवानी आहे.  कोयनेचा जो कॅचमेंट एरिया आहे त्यातील ३० टक्के भाग कोकणात येतो आणि ७० भाग पश्चिम महाराष्ट्रात जातो. त्यामुळे स्थानिक आणि जाणकार म्हणतात त्या नुसार ३० टक्के भागातील नवजा येथे प्रचंड पाऊस पडला त्याचे पाणी चिपळुणात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. आजवरच्या इतिहासात कधी त्या भागात इतका पाऊस पडला नाही. त्यामुळे हे नैसर्गिक पाणी आहे. 

मान्य आहे की आता हे पाणी म्हणजे पाऊस आहे की नदीचे पाणी आहे की डोंगरावरचे पाणी यावर कितीही विलगीकरणं केलं तर बुडालेले चिपळूणचे दायित्व कुणीच स्वीकारणार नाही. आणि राजकीय पोष्ट मांडण्याची मला फेसबुक ही जागा वाटतं नाही. पण एक नक्की की चिपळूणचे पाणी उतरेल ना तेव्हा जो चिखल असेल ना त्याचा काला खूप वाईट असेल !

बाकी माझ्या टेरवच्या भवानीला काळजी, तिची लेकरे ती नाही वाऱ्यावर सोडणार !

Comments

  1. देवाकच काळजी

    ReplyDelete
  2. भरती सगळ्याचीच .... अजीर्ण होणारच.
    औषध मात्र शोधायलाच पाहीजे.

    ReplyDelete
  3. Dada madtisathi valid samprka sang..

    ReplyDelete
  4. निसर्ग प्रकोप ...
    भयानक पन सत्य ..
    देवा सुखरूप ठेव ....

    ReplyDelete

Post a Comment