कोकण.....स्त

'तुम डरे हुए नदी के किनारे खड़े हो... 
जबकि कहानी पानी के नीचे की दुनिया में पड़ी हुई है"..

मानव कौलच्या या ओळी आता विखारी वाटू लागल्या आहेत. प्रश्न समुद्राकडून आलेल्या वशिष्टीचा किंवा डोंगरावरून कोसळलेल्या सवित्रीचा नाहीय.. प्रश्न अखंड लांब ओढलेल्या रेघेने आमच्या मरणाचा आहे. एका हायवेच्या अखंड कामाने संपूर्ण कोकणचा बट्याबोळ केलाय.. खारेपाटण पासून ते अगदी बांदापर्यंत, सगळंच गळ्याभर पाणी ! पळा कुठे पळायचय ते !!

प्रत्येक निवडणूकीत माझ्या वाट्याला अलिबाग, महाड, चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी कणकवली असतेच! 2009 पासून महाडच्या पूर पातळीनंतरचे विस्थापन आणि पुनर्वसन हा प्रश्न विचारतोच विचारतो.. आता या पुरानंतर तो प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही उरलीय..

पूर सांगली कोल्हापूर मध्येही आहे. २०१८ होता तसाच.. त्यावेळीही जयंत पाटील आणि सतेज पाटील होते. त्यावेळी ते विरोधात होते आज सत्तेत आहेत पण दोन्हीवेळेला पक्षाचे झेंडे घेऊन ते मैदानात नव्हते.. 'श्रेय तुम्ही घेणे' आणि 'लोकांनी तुम्हाला श्रेय देणे' यात एक जमीन अस्मानाचा फरक आहे. राजकीय पक्षाकडून मदतीची अपेक्षा गरजेची आहे. राज्य आणि केंद्र कोणीही सत्तेत असुदे, आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या तुमच्या प्रामाणिकपणाला कर्तृत्वाची जोड द्या. आज युथ फॉर डेमॉक्रोसी, राष्ट्र सेवा दलासारखे सामाजिक चळवळ ज्या झोकाने उभे राहतायत त्याला मदत करण्याची गरज आहे.
एकसंघ नेतृत्वाचा अभाव आणि राजकीय पक्षात उर्वरित महाराष्ट्रासारखा आपल्या प्रांतात एकीचा अभाव नाहीय त्याचा पुरेपूर फायदा प्रशासन घेते. प्रथमेश राणे सारख्या मुलाला स्वतःच्या पैशाने सगळ्या कोकणात फिरून नुकसान भरपाई मागणे म्हणजे भीक नाही ही गोष्ट सांगावी लागते. चिपळूणला पूर आल्यानंतर मालवणची पोरे पदरचा पैसा टाकून चिपळूणला निघतात. कुठल्याच राजकीय पक्षाला वाटत नाही की, या  मुलांना काही मदत करावी. मागच्या तौक्ते चक्रीवादळात हंड्रेड इडियट ग्रुपची पोर 'ट्री कटर' घेऊन घरावरची झाडे तोडत बसली होती. स्वतःच्या पैशाने अशी श्रीमंतगिरी करायला रक्तात फकीरगिरी असणे आवश्यक आहे. मुंबईत प्रतीक पाटील, अमेय तिरोडकर,  मित्र वाळके, नितीन नाईक तिकडे वैभव गावडे , ₹ मालवणातून सेवांगण, वुई फॉर यु सगळे सगळे कामाला लागलेत. ह्या मुलांचा प्रॉब्लेम एकच आहे, यांच्याकडे लोकांना द्यायला सगळे आहे फक्त स्वतःकडे 'ढोल' नाहीयत.
कुणाची मदत किती मोठी,  किती लहान हा मुद्दा गौण आहे. तुम्हाला कोकण जर भौगोलिक पाठ असेल तर कोण लवकर आलं आणि कोण उशिरा आलं हा प्रश्न इतरांना सोडा स्वतःलाही विचारायचा मूर्खपणा करणार  नाही. या पुराने निदान मला एवढं शिकवलय की एरवी परशुराम घाट ते चिपळूण सात किलोमीटर असते आणि जेव्हा पूर येतो तेव्हा हेच अंतर सातशे किलोमीटरच्या अंतराएवढे असते.. कुणाला दोष देणार सगळेच कार्यसम्राट आहेत आणि आपण हतबल आहोत..
कोकणातला पाऊस कालही तेवढाच होता आजही तेवढाच आहे. लहान असताना फक्त भंगसाळच्या पुलावर तेवढे पाणी साचायच.. आता भंगसाळ पुलावर पाणी साचलं म्हणून हेडलाईन्स येणे बंद झालंय. मोठा पूल झालाय..पण नदीचे जे पाणी होते ना ते खारेपाटण पासून वागद्यापर्यंत, वागद्यापासून पावशीपर्यंत आणि पावशीपासून बांदयापर्यंत घराघराची पाशीट बुडवत निघालेय.. 
बाकी तुमच्या स्मरणशक्तीचे मला ठाऊक नाही, पण एक वाचलेली गोष्ट  सांगतो.. पाण्याला ना एक  स्मरणशक्ती असते..ती भेटलेल्या जागी पुन्हा येते.. सखल वाटा तिला सांगाव्या लागत नाही.. कारण तिच्या वाटा तुम्ही तयार करता.. आता जर वाटा तुम्हीच तयार केली असेल तर भेट अटळच असेल ना ?

Comments