तुझा तु वाढवी राजा

संकट प्रत्येकाच्याच वाट्याला येतात, पण जबाबदारी अंगावर पडल्यावर सातत्याने संकटाची मालिका येणे हे खूप वेगळे आहे.  राज्यशकट हाकताना अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे करतायत त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे वेगळेपण अधोरेखित करतात. एरवी वाढदिवसाच्या शुभेच्छा या एका व्यक्तीला अभिष्टचिंतन करणाऱ्या असतात पण उद्धव ठाकरे यांना आज मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देताना वर्तमानाचे दायित्व आणि भविष्याच्या जबाबदारीचे पालकत्व अशा दुहेरी पातळीवर पहावे लागते. संकटात खरं का बोलावं आणि खरं का असावं याची जाणीव देणारे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाराष्ट्रातील तमाम राजकारण्यांपेक्षा वेगळे ठरतात.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' या एका ओळीतही हा लेख संपला असता आणि यापुढे कितीही वर्तमान मांडणाऱ्या ओळी लिहिल्या तरी तो अपूर्णच राहील एवढा व्यक्तिआलेख उद्धव ठाकरे यांनी उंचावला आहे हे मान्य करावेच लागेल. लोकप्रिय घोषणा करुन तात्पुरती मलमपट्टी करणे जनतेचा रोष मिटवणे, हा चुकीचा रस्ता टाळून आपत्ती हीच राज्य बांधणीची इष्टापत्ती हे समजून काम करण्याचा वेगळा पर्याय निवडणे हे फार मोठं आव्हान त्यानी स्वीकारले आहे. 


या क्षणाला उद्धव ठाकरे तुम्हाला हवा असलेला कुठलाच निर्णय घेत नाही हे विधान करताना त्यांचा प्रत्येक निर्णय हा काळाच्या कसोटीवर योग्य ठरणारा का ठरतो याची अभ्यासू सारादार विचारशक्ती आपण करत नाहीच. 'कोमट पाणी, किंबहुना, फेसबुक लाईव्ह' अशा टिकांचे ओझे सहन करणारा तोच माणूस आहे की,ज्यांनी देशात पहिल्यांदा लॉकडावूनचा निर्णय घेतला. दुसऱ्या लॉकडावूनला अगोदर मदत आणि मग बंद हा निर्णय घेतला. हा तोच माणूस आहे जो आपत्तीत मी लगेच काही घोषणा करणार नाही असे थेट लोकांना सांगतो पण ज्यावेळी घोषणा होते तेव्हा काल घडलेल्या परिस्थितीवरून आजचा नाही तर उद्याचा विचार झालेला असतो.. अर्थात या गोष्टी आज जरी मान्य करण्याची राजकीय सहजता उरली नसली तरी उद्धव ठाकरे यांची काठिण्यपातळी वेगळी आहे

शिवसेनेसारख्या मुंबईवर राज्य करणाऱ्या संघटनेला आणि जिथे पक्षातल्या आमदार खासदारांपेक्षा शाखाप्रमुख यांचा विचार जास्त होतो त्या संघटनेत लोकांची मत थेट पोहोचणाऱ्या पक्षाचे नेतृत्व करत असताना मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री हा सर्व्हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाहीय अशी टीका दुसऱ्या बाजूला सहन करत मुख्यमंत्री म्हणून उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर त्यांना फक्त स्वतःला सिद्ध करावे लागतेय.. आज  २०१४ नंतर राजकारणात फक्त प्रसिद्ध होण्यासाठी काम करावं लागतं या प्रचलित राजकारणाच्या मर्यादांची त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची काठिण्यपातळी रुचणे अवघड आहे


मुळात मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो हा निकष बाजूला ठेवूनच आपणच आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही ओळख जपत असताना त्याचा गैरसमज दूर करण्याचा कामही उद्धव ठाकरे यांना करावे लागतेय. सत्तेत येईपर्यंत विरोधी लढणारा पक्ष ही ओळख जपणारा पक्ष आज सत्तेत आल्यावर 'आम्ही सत्तेतला पक्ष' याचा कुठेही मिजास उद्धव ठाकरे नावाचा पक्षप्रमुख महाराष्ट्राला दाखवत नाही तेव्हा मागच्या काही वर्षात 'एक पक्ष म्हणजेच देश' ही संकल्पना ठिकऱ्या ठिकऱ्या करते. मुळात उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा विचार करता त्यांनी शिवसेनेचा कारभार हाती घेतल्यापासून फार व्हिजनरी कारभार आहे. कुणी मान्य करो अथवा न करो त्यांचे राजकारण शिवसेनेला भावनिक करणारे नाहीय पण कधी भावनिक होऊन शिवसेनेचे राजकारण करावे ही नेतृत्वकला विचारापल्याड आहे.


संकटाची मालिका आणि जबाबदारीचे भान तुम्ही हेलिकॉप्टरमधून दौरे करावेत की पूर आलेल्या बाजारातून चालत जाऊन लोकांचा रोष सहन करत जावं यातला फरक स्पष्ट करणारा आहे.. उद्धव ठाकरेंच्या राजकारणातला आजचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा आहे की विरोधकांच्या टीकेला उत्तर न देणे आणि मग त्या विधानाना वक्त्यासह बालिश ठरवणे, अर्थात ही उद्धव यांची सत्तेतील एकमेव राजकीय खेळी आहे.
मुख्यमंत्री कोकणाला काय देणार या प्रश्नावर चहूबाजूने टीका होत असताना, मुख्यमंत्री महाड आणि चिपळूणसाठी एक पूर्ण दिवस घेऊन दौऱ्यावर आले होते.. तुमचा जाहीर कार्यक्रम आणि तुमचा फिल्डवरचा कार्यक्रम हा विरोधकांना चकवा देणारा असला पाहिजे या खूप साऱ्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीवर विरोधकांची टीका आणि सरतेशेवटी 'बोलणारा अभ्यास' हा जो मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा प्रवास आहे तो दैदिप्यमान आहे. 

कोल्हापूरच्या पावसात तीन दिवस तुमचे घर पाण्यात असल्यावर रेशन देणारे सरकार आणि ज्या जिल्ह्यात पूर तिथे सरसकट दोन महिने मोफत रेशन ही गोष्ट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, आर्थिक म्हणून तात्काळ निर्णयक्षमतेची असते. महाड तळइ दुर्घटना नैसर्गिक असली तरी आजपर्यंत अनेक सरकार आली आणि गेली पण कागदपत्रे नसली तरी मदत करणार हे सांगायला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नावाचा राज्यकारभार न कळणारा मुख्यमंत्री यावा लागला हेच उद्धव ठाकरे यांचे वेगळेपण आहे. 

आज जिथे तुम्ही जिवंत आहात ते तुमच्या हयातीच्या दाखल्यावर सिद्ध होते तिथे कागदपत्रांचा बाऊ नकोय हे ठणकावून सांगणारा मुख्यमंत्री हा  पेपरलेस गव्हरमेंटचा मापदंड ठरतोय. कृष्णा पंचनगंगेच्या पुरावर एक महिना अगोदर कर्नाटक सरकारशी चर्चा करणे याला धोरण आणि नियोजन म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे हे त्यांनी पश्चिम महाराष्ट्राला दाखवून दिलंय. खुद्द विदर्भातील गोसिखुर्द प्रकल्पाला संजीवनी देऊन जी विरोधकांच्या गडाला शह देऊन मात केलीय त्याला तोड नाहीय..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाने   मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर त्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी  मुख्यमंत्र्यांनी जो दौरा केला त्या  दौर्‍यानंतर विरोधकांनी टीका टिपणी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामातून उत्तर देत केंद्र शासनाचे निकष बदलून जिल्ह्याची जी ४५ कोटी ४९ लाख रुपयाची नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्या सगळ्या पंचनाम्यावर सही करत ४५ कोटी ४९ लाख मिळालेयत आणि तेही थेट खात्यात !
तीन पक्षांसोबत समन्वयी सरकार  चालवताना कॅलेंडरमध्ये फक्त 2019 हे एकच वर्ष नसते तर 2022, 2024 आणि त्यापुढेही अनेक पाच वर्षानंतर येणारी अनेक वर्षे आहेत. महाराष्ट्रांच्या राजकारणात ते उद्धव ठाकरे यांना अगदी बरोबर समजलंय. 


आजघडीला महाराष्ट्र एका भल्यामोठ्या संकटातून जाणवतोय. लॉकडावून हटवलेल्या केरळवर जितम जीतम करणाऱ्याना पुन्हा केरळवर आलेली वेळ समजणार नाही. पण आता मात्र जगणं आणि अर्थव्यवस्था याचा साकल्याने विचार व्हायला हवा. एरवी भावनिक राजकरण न करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आज जगण्यासाठी फक्त स्वास्थ्य गरजेचं नाहीय त्याला पैसा हवाय अशा वर्तमानात आपण जगतोय याचे भान ठेवण्याची गरज आहे.  तुम्ही घरात बसून राज्य चालवता याचे आनंद आहे, पण आम्ही घरात बसून रोजीरोटीचा प्रश्न आता निकाली नाही काढू शकत ना ? बळीराजा, नोकरदार, उद्योग कामगारवर्ग आणि बाजारपेठ आज एका अपेक्षेने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तुमच्याकडे पाहतायत. अर्थात तुमचे कपडे भगवे असले तरी तुम्हाला झोळी घेऊन हिमालयात जाणे असले तुमचे राजकारण नाहीय आणि म्हणून इथेच राहायचे असेन तर या सगळ्याची जबाबदारी तुम्हालाच स्वीकारावी लागेल.

आजचा दिवस तुम्हाला शुभेच्छा द्यायचा आहे, महाराष्ट्र घडवायची पक्षप्रमुख म्हणून पक्षाची आणि कुटुंबप्रमुख म्हणूनही तुमचीच जबाबदारी आहे. नैसर्गिक आणि तेवढयाच निर्माण केलेल्या राजकीय संकटातून आज हा महाराष्ट्र तुम्हाला सावरावाच लागेल कारण तुम्ही उद्धव ठाकरे आहात, किंबहुना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात.. आणि किंबहुना या शब्दाचा माझा राजकीय मराठी अर्थ आहे 'अटळ पर्याय' !
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

Comments

  1. ऋषी अतिशय न्याय्य लिहीला आहेस.
    नैसर्गिक आपत्तीपेक्षा अनैसर्गिक आपत्तींना उद्धवजीनी लावलेला षटकार फारच
    कौशल्यपूर्ण जीवघेणा आहे.
    मा.उद्धवजी ठाकरे साहेब
    यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी
    हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  2. जे आहे ते असं आहे.. छान शुभेच्छा

    ReplyDelete
  3. मा.उद्धवजी ठाकरे साहेब
    यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी
    हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर आणि सत्य लिखाण ..
    सन्माननिय उद्धवजी आपल्या ला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा💐🎂

    ReplyDelete

Post a Comment