जयदेव जयदेव रिलोडेड

 
ऑफिस सुटले, घरी निघालो.. तेवढ्यात लक्षात आलं आज कृष्णा काडवे बुवांनी एक गाणं दिलंय.. त्या गाण्याच्या ओळी मला चॅनलला एका मोंटाज ला वापरायच्या होत्या.. गाणं मोबाईलमध्ये प्ले केलं. खरंतर हल्ली मी हेडफोन नाही युज करत.. पण आज केले.. तेही वनसाईड !

आरती प्रेमाने तुजला ओवाळीन भावे..
आरती प्रेमाने तुजला ओवाळीने भावे..
अगोदर बुवाचा आवाज आणि त्यानंतर कोरसचे जबराट सुखकर्ता दुखहर्ता.. समोर अंधेरी होती पण नजरेत मालवण उभं राहायला सुरुवात झाली होती

अंधेरीवरून जसजसा पुढे सरकत गेलो तसतसा पाऊस हलका होता.. पण गर्दी मात्र मुसळधार होती.. लोक गावी  जायला जमत होती. रायगडवाले, रत्नागिरीवाले आणि सिंधुदुर्गवालेही...बोरीवलीहून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत.. खुप दिवसांनी नजरेत आस दिसत होती प्रत्येकाच्या.. सलग सलग अगदी सलग .. सगळंच असेच दिसत होते.. मालवणवरून निघताना नाही का कुंभारमाठ, चौके, कट्टा, कसाल, कणकवली, तरळे गर्दी असते ना अगदी तसे.. पाऊस वगैरे काहीच जाणवत नव्हता.. आता डोके पुसेन ते घरी जाऊनच असा जणू काही चंग बांधला होता..

पुढे आला तोपर्यंत कलानगरीचा ब्रिज आला.. पाऊस मोठा आला. बाजूच्या फुटपाथवर एक आजी आपल्या कुटुंबाला सावरत सामान झाकत होते. मुसळधार पावसात ती एकटी दहा हत्तीचे बळ घेवन सगळ्या सामानावर ताडपत्री फिरवत होती. मगासपासून कुठेच थांबलो नव्हतो आता थांबलो. पाऊस वाढला होता....बारकी मुले स्वेटर घालून भिजत होते, आणि मोठे  छत्री ऊघडल्यावर भिजेल या चिंतेत होती बहुतेक

मी सलग आजीकडे गेलो.. "आजी कुठले गाव ?"आजी बोलली "रत्नागिरी".. तिच्या एका शब्दात गावाचे नाव, आतुरता, आत्मीयता, तळमळ, हुरहूर, भीती, आस, तगमग, आणि गणपतीही होता.. तिच्या त्या एका उच्चाराने अंगावर पडणारा पाऊस आता डोळ्यात उतरला.. 

आजी बोलली, "मागच्या वर्षी नाही जमलं, यंदा जातेय नातीला गणपती दाखवायला".. पावसातही तिचा आवाज कातर जाणवत होता.. मी विचारलं एक फोटो काढू का.. टीव्ही साठी ?  हुंदका हसला.. मी दूर जाऊन शूट करायला गेलो  पण स्क्रीनवर पाणी पडत होते, नाही जमलं ! फक्त फोटो काढला.. आजीला बोललो सावकाश जावा.. वळणार तेवढ्यात ती बोलली..

"घेतील ना गावाला, मिळेल ना पूजायला ना गणपती यंदा तरी" 

 माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते.. माझ्या उत्तराकडे ते सगळं कुटुंब आशेने पाहत होते.. आता मी फक्त वर पाहिले पडणारा पाऊस डोळ्यात ओतला.. 

मी ही हुंदक्यातून हसलो.. शब्द नव्हतेच कसले. बाय केलं आणि निघालो

तोपर्यत लटकलेल्या हेडफोनमधून बुवांचा कोरस टिपेला जाऊन गात होता

"दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना"

- ऋषी श्रीकांत देसाई
भाद्रपद शुक्ल तृतीया

#जगणेशोत्सव2021

Comments